न्यायालयीन कोठडीत आरोपीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

श्रीगोंदे - खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीतील आरोपी अनिल सावंत (वय 40) याचा आज दुपारी मृत्यू झाला. त्याला दुपारी पावणेचारच्या सुमारास उलटी झाली व तो हात-पाय झाडत असल्याचे इतर आरोपींनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले. सावंत याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

शहरातील भंगार जमा करणाऱ्या सुनील ऊर्फ ताराचंद दशरथ ससाणे (रा. श्रीगोंदे) यांचा खून केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी सावंतला अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतला त्रास होत असल्याचे पहारेकरी पोलिसांना सांगताच त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सावंत याचा भाऊ युवराज याने मात्र, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अनिलचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्याने अनिलच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे.

पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे म्हणाले, 'या प्रकरणाची प्रांत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे. मानवाधिकार, सीआयडी यांना घटनेची कल्पना दिली आहे. सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित करण्यात आले आहे.''

Web Title: accused death in court custody