कृषी साहित्य खरेदी प्रकरणी सांगलीच्या कृषी अधिकाऱ्याचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

जिल्हा परिषदेतील बहुचर्चित चापकटर व कृषी साहित्य खरेदी प्रकरणी कृषी विकास अधिकारी रघुनाथ भोसले यांना अखेर आज निलंबीत करण्यात आले

सांगली : जिल्हा परिषदेतील बहुचर्चित चापकटर व कृषी साहित्य खरेदी प्रकरणी कृषी विकास अधिकारी रघुनाथ भोसले यांना अखेर आज निलंबीत करण्यात आले. "भोसले वाचले', या गेल्या आठवडाभरातील चर्चांना पूर्णविराम देत त्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मुंबईत मंत्रालयात सह्या केल्या. 

भोसले यांच्यासह खरेदी समितीचे अध्यक्ष, निलंबित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्यावरही फौजदारी दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कृषी विभागाने तशा सूचना ग्रामीण विकास विभागाकडे पाठवल्या असून सोमवारी त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे सुत्रांनी सांगितले. भोसले यांच्या निलंबनाचे पत्रही सोमवारी जिल्हा परिषदेत धडकणार आहे. याशिवाय, या प्रकरणातील अन्य दोषींच्या विभागीय चौकशीची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारात हात बरबटलेल्यांची पाचावर धारण बसली आहे. 

जिल्हा परिषदेत सन 2014-15 आणि सन 2015-16 मध्ये दोन वर्षात स्वीय निधीतून केलेल्या साहित्य खरेदी प्रकरणी कारवाईचा धडाका सुरु आहे. दिलीप पाटील यांच्यानंतर रघुनाथ भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करतानाच आता फौजदारी दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भोसले हे 31 मे रोजी निवृत्त होत असून त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा काहींचा प्रयत्न होता. तो आता फसला आहे. आता या खरेदी समितीतील अन्य सदस्य, तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी, तांत्रिक अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील दोन सचिवांची विभागीय चौकशी होणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई अटळ असेल, असे सुत्रांनी सांगितले.