शेतीपंपांचे ३४८ कोटींचे वीज बिल थकीत

शेतीपंपांचे ३४८ कोटींचे वीज बिल थकीत

सांगली - राज्यात वीज बिलाच्या थकबाकीने प्रचंड मोठा आकडा गाठला आहे. शेतकऱ्यांकडील थकीत ७० हजार कोटींच्या वीज बिलात राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकबाकी माफ करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांना बिल भरावेच लागणार आहे. जिल्ह्याचे ४१५ कोटींचे वीज बिल थकीत असून ३४८ कोटी रुपयांचे कृषीचे वीज बिल थकीत आहे. हे बिल तीन महिन्यांत भरावे लागणार आहे.

महावितरणची थकबाकी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. सरकार बिल माफ करेल या आशेने ते भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्र्यांनी माफी मिळणार नसल्याचे सांगून झटका दिला. त्यामुळे हे बिल भरण्याशिवाय गत्यंतर नाही. जिल्ह्याची थकबाकी ४१५ कोटी ४६ लाख असून कृषीचा वाटा ३४८ कोटी ५६ लाखांचा आहे. खालोखाल सार्वजनिक पाणी पुरवठा संस्थांची थकबाकी ३३ कोटी ५२ लाखांची आहे. पथदिव्यांची थकबाकीही २८ कोटी ८० लाख इतकी आहे. वसुली होत नसल्याने महावितरणची अनेक कामे प्रलंबित आहेत. 

प्रति युनिट नुकसान पाच रुपयांपेक्षा जास्त
शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरवलेली वीज आधीच पाच रुपये प्रति युनिटचे नुकसान सोसून दिली जाते. विजेच्या उत्पादन आणि पुरवठ्याचा दर सहा रुपयांच्या घरात जातो. मात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी स्वस्तात मिळावी या उद्देशाने ती पाच रुपये तोटा सोसून देण्यात येते. तरीही हे वीज बिल भरण्यास शेतकरी टाळाटाळ करतो. थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शेतकरी वीज बिल माफ होईल या आशेने बिल भरण्यास तयार नाहीत.

कृषीचा वाटा सर्वांत जास्त
जिल्ह्यात दोन लाख ३८ हजार ७४७ कनेक्‍शनचे ४१५ कोटी ४६ लाख रुपये बिल थकीत आहे. यात सर्वाधिक वाटा ३४८ कोटींचा कृषी वीज बिलाचा आहे. त्यांची एक लाख ८९ हजार ४६३ कनेक्‍शन आहेत. मात्र हे बिल वसुलीचे आव्हान महावितरणसमोर आहे. सर्वाधिक थकबाकी अर्थात दुष्काळी तालुक्‍यांतील आहे. जत तालुक्‍यात ३३ हजार ६०४ कनेक्‍शन्स आहेत. त्यांची थकबाकी ७५ कोटी रुपयांच्या घरात आहे. कवठेमहांकाळ विभागातील ६४५९६ कनेक्‍शन्सची १३८ कोटी ३६ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. त्याखालोखाल तासगावचे ४१ कोटी रुपये वीज बिल थकले आहे.

माफीच्या आशेने थकबाकी वाढली
दुष्काळी तालुक्‍यात शेतकऱ्यांसाठी सध्या वीज बिल माफीची कोणतीही योजना नाही. पाण्याच्या अभावाने पिकांचीही अवस्था बिकट झाली आहे. उत्पादन नाही. हातात पैसे नाहीत. अशा वेळी शासन दुष्काळ जाहीर करेल आणि किमान ३३ टक्के तरी बिल माफी मिळेल, अशा आशेनेही वीज बिले भरण्यास टाळाटाळ केली  जाते. ऊर्जा मंत्र्यांनी कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या आशाही मावळल्या आहेत.

वसुलीसाठी दररोजच मार्च
थकबाकी मोठी असल्याने सध्या महावितरणकडून दररोजच मार्च महिना समजून थकबाकी सुरू आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वसुलीचे आव्हान पेलणे अवघड आहे. ज्यांचे मोठे बिल जास्त काळ थकीत आहे. त्यांच्याकडून सध्या वसुली करण्यात येत आहे. वसुली झाली तरच नवीन कनेक्‍शन देणे शक्‍य होणार आहे.

एकवीस हजार कनेक्‍शन प्रलंबित
पाच वर्षांत जिल्ह्यातील घरगुती, कृषी, औद्योगिक, सार्वजनिक पाणी पुरवठा संस्था यांची कनेक्‍शन सुमारे २१ हजार प्रलंबित आहेत. त्यातील साडे तेरा हजार कनेक्‍शन्स कृषीची आहेत. कनेक्‍शन देण्यासाठी निधी नसल्याने कनेक्‍शन देण्यात अडचणी येताहेत.

विभागनिहाय कृषी, पाणी पुरवठा संस्था, पथदिव्यांची थकबाकी (कोटीत)
विभाग                       कृषी              पाणी पुरवठा संस्था              पथदिवे
                   कनेक्‍शन   थकबाकी    कनेक्‍शन   थकबाकी      कनेक्‍शन    थकबाकी

इस्लामपूर         २८५६२    ३१.७०    १२९      १.६५         ५२१      ७.३६
कवठेमहांकाळ    ६४५९६  १३८.३६    २४१       १.६९       ४१६       ८.१५
सांगली ग्रामीण    ४३९२०    ६९.२१    ११७       ३.८०       ४३७      ४.८०
सांगली अर्बन       १००८     ०.८९        ------                  ८८      ०.१४
विटा             ५१३७७    ७५.३९     २५५       ३.१४       ७३१       ८.३३
सिंचन योजना   -----       -----        -----      २३.२२       -----       -----
एकूण           १८९४६३  ३४८.५६    ७४३      ३३.५२     २१९३     २८.८० 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com