अजून आहे तिथे... शांतता, दहशत, आठवणी आणि संताप!

कोपर्डी - पीडितेचे घर.
कोपर्डी - पीडितेचे घर.

"आई... माझ्यावर अत्याचार करून त्या तिघा नराधमांनी हाल हाल करून मला संपविले. मी गेले; पण माझे बलिदान तर व्यर्थ नाही ना गं गेलं? आता तरी गावातील माझ्या मैत्रिणी, तालुका, जिल्हा, राज्यातील अन्‌ देशातील माझ्या वयातील कोवळ्या कळ्या सुरक्षित आहेत ना गं?' ... असे प्रश्‍न विचारत आहे कोपर्डी येथील वयात येण्यापूर्वीच खुडली गेलेली "ती' कळी! कोपर्डीतील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या "त्या' घटनेला गुरुवारी (ता. 13) वर्ष पूर्ण होत आहे.

त्या दिवशीच्या घटनेने परिसरच नव्हे, तर अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. त्यानंतर विझलेल्या "त्या' पणतीने राज्यासह देशात व परदेशातही वणवा पेटविला. त्या वणव्याची धग वर्षानंतरही जाणवते आहे. कोपर्डीला आज भेट दिल्यानंतर गावकऱ्यांचा संताप, तेथील ठरावीक लोकांची दहशत अजूनही कायम असल्याचे चित्र जाणवले. मुख्यमंत्र्यांनी दिलेली काही आश्‍वासने पाळली; पण अनेकांना तिलांजली दिल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

कोपर्डीला मंगळवारी (ता. 10) भेट दिली असता, वर्षानंतरही तेच सुन्न करणारे वातावरण दिसले. कोवळी "छकुली' सायकलवरून आजोबांच्या घरी भाजीचा मसाला घेऊन रमतगमत चालली असतानाच "त्या' तिघा नराधमांनी तिला घेरले. तिच्यावर अमानवी अत्याचार केले. "ती' पट्टीची खेळाडू होती; परंतु तिचा प्रतिकार मोडून काढताना नराधमांनी तिचे हात निखळून टाकले. तिचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी तिच्या शरीराचे लचके तोडले. ते ठिकाण आजही त्या दिवशीच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या वेदना जागृत करते. तिचा प्रतिकार आजही त्या जागेवर जाणवतो. त्या जागेचा परिसर आजही ओरडून सांगतो, की ती गेली; पण तिने जागृती-प्रतिकाराची जी ज्योत पेटविली, ती विझू देऊ नका!

जागे झाले तेव्हा सारे
तिच्यावरील पाशवी अत्याचाराने सगळ्यांना झोपेतून खाड्‌कन उठविले. झोपेचे सोंग घेणारेही यात सहभागी झाले. मुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष, विरोधक, सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनीच कोपर्डीत येऊन त्या कुटुंबाचे सांत्वन करताना गाव व परिसरातील मंडळींच्या संतापाला आवर घालण्याचा प्रयत्न केला. "त्या' घटनेमुळे राज्यभर मोर्चेही निघाले, हा एक चांगला संदेश होता; परंतु या घटनेला वर्ष होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक प्रश्‍नही उपस्थित होत आहेत.

वर्षानंतरही "ती' आईला "पुढे काय झाले' हा प्रश्‍न विचारत आहे. घरातील मंडळींच्या जखमा आजही ताज्याच असल्याचे जाणवले. इतरांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून तिचे आई, वडील, भाऊ व बहीण दुःख लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. "पप्पाड्या, मला वडा-पाव अन्‌ मिठाई आण' हा तिचा "आदेश' आजही वडिलांच्या कानात घुमतो. शाळेतील गमती-जमती रोज सायंकाळी तिच्याकडून ऐकायला मिळत नसल्याची खंत बहिणीला आहे. चिकन, मटण, अंडी व मेथीची भाजी... हे सारे तिच्या आवडीचे. या पदार्थांची नावे कानावर पडली, तरी आईला अतोनात वेदना होतात. शाळेतल्या मैत्रिणींनाही, सर्वांना हसवणाऱ्या छकुलीचा विरह बेचैन करतो. शिक्षकांनाही तिच्या पाऊलखुणा अजूनही दिसतात.

आश्‍वासनांचे काय झाले?
मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी भेटीत राक्षसवाडी ते कोपर्डी या पाच किलोमीटरच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याचे दिलेले आश्‍वासन हवेतच विरल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. वर्ष उलटले तरी कोपर्डीपासून जवळच असलेल्या कुळधरणमध्ये पोलिस चौकी सुरू झाली नाही. कोपर्डीला आरोग्य उपकेंद्राच्या कामाला गती नाही. भय्यूजी महाराजांच्या पुढाकाराने गावात शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला; त्यासाठी सरकारने जागा उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. कोपर्डी ते कुळधरण गावची शाळा, अशी विद्यार्थिनींसाठीची बससेवा मात्र नियमित सुरू आहे. त्यामधून तब्बल 90 विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्रित जातात.

स्मृती दिनानिमित्त गुरुवारी विविध कार्यक्रम
'तिच्या' पहिल्या स्मृतिनिमित्त अंत्यविधीच्या जागेवरच तिचे स्मारक उभे केले जात आहे. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्मृती दिनानिमित्त गुरुवारी (ता. 13) सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान आर्वी (जि. धुळे) येथील वासुदेव आर्वीकर महाराजांचे कीर्तन होईल. त्यानंतर भय्यूजी महाराजांचे प्रबोधन व दुपारी दीड वाजता श्रद्धांजली सभा होणार आहे. या कार्यक्रमांसाठी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यभरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com