कोणाला मिळणार 'शब्द'; कोणाचे धरले जाणार कान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील नवीन सदस्यांचा सत्काराच्या निमित्ताने उद्या (रविवारी) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी इच्छुक असलेल्यांनी या दौऱ्यात दादांच्या माध्यमातून आपले नाव निश्‍चित होण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे ते कोणाला शब्द देणार, कोणाचे कान धरणार याविषयी उत्सुकता आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीला भरभरून यश दिले. त्यामुळे अजित पवारांचा उद्याचा सातारा दौरा यावेळेस अनेक कारणांनी गाजणार आहे. पहिला मुद्दा खासदार उदयनराजेंवर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा आणि त्यावर अजित पवार कोणते भाष्य करणार? दुसरा मुद्दा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान, राष्ट्रवादीतून अनेकांनी भाजपमध्ये उड्या घेतल्या. पक्षाच्या जीवावर पद, प्रतिष्ठा मिळविलेल्या अशा कार्यकर्त्यांवर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवनियुक्त सदस्यांचा सत्कारावेळी ते या सदस्यांना कोणता कानमंत्र देणार, तर पदासाठी इच्छुक असलेल्यांना ते कोणता सल्ला देणार याचीच उत्सुकता आहे. अजित पवार साताऱ्यात आले, की त्यांनी कोणावर खोचक टीका केली नाही, असे होत नाही. खासदार उदयनराजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी ते काय बोलणार बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर त्यांच्याकडून शेतकऱ्यांना कोणता सल्ला मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडी शनिवारी (ता. 1) होणार आहेत. त्यामुळे श्री. पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

रामराजेंसह आमदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार उद्या (रविवारी) दुपारी तीन वाजता येथील कल्याण रिसॉर्ट येथे अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील, तसेच पक्षाचे जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: ajit pawar satara tour