अक्कलकोट स्थानक प्रवाशांना अडचणीचे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

अक्कलकोट - अक्कलकोट तीर्थक्षेत्र असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोटला येतात. श्री स्वामी समर्थ, शिवपुरी, काशीविश्‍वेश्‍वर जेऊर, मारुती मंदिर गौडगाव (बु.), सैपन मुलूक ख्वाजा दर्गाह हैद्रा आदी तीर्थक्षेत्रांसाठी प्रसिद्ध आहे. या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी याच रेल्वे मार्गाची सर्वांना गरज पडते. यासाठी अनेक गाड्यांना थांबा नसल्याने सध्या मोठी अडचण होत आहे. 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात येणारे अक्कलकोट रोड स्थानक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवाशांना असुविधाजनक ठरत आहे. प्रवासी संघ व परिसरातील नागरिकांतर्फे प्रयत्न करूनही या स्थानकावर कोणत्याही नवीन गाड्यांना थांबा मिळाला नाही अथवा उड्डाणपूल होत नाही. या स्थानकावर यशवंतपूर एक्‍स्प्रेस, बसव एक्‍स्प्रेस, कुर्ला-बंगळुरू एक्‍स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्‍स्प्रेस, सिकंदराबाद-हुबळी एक्‍स्प्रेस आदी गाड्यांना वाढत्या स्वामी भक्तांमुळे आणि प्रवासी संख्येनुसार थांबा मिळणे गरजेचे आहे. 

त्याचप्रमाणे या स्थानकाच्या बाजूला असलेले रेल्वे गेट गाड्यांची संख्या जास्त असल्याने सतत बंद करावे लागते. गेटच्या दोन्ही बाजूंनी लांब रांग लागतात. त्यामुळे वेळ वाया जातो. २०१५ रोजी ३० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. त्यात प्रकल्प आराखडा आणि प्रारूप निविदा मंजूर आहे; परंतु एक किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलासाठी शेतकऱ्यांची संमती असूनही जुलै २०१६ला मान्यतेसाठी पाठवलेली भूसंपादन प्रक्रियेचा मंजुरी प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात अद्याप रखडलेला आहे. हा प्रस्ताव मंजूर होणे आवश्‍यक आहे. या स्थानकावर शुद्ध केलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. रेल्वे स्थानकात आत जाताना व बाहेर येताना अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने वाटेतच थांबून प्रवाशांची वाट अडवतात. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व बाबींकडे रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आदींनी लक्ष देऊन गैरसोय दूर करणे गरजेचे असल्याने नागरिकांमधून बोलले जात आहे. 

अनेक वेळा रेल्वेमंत्री, खासदार, आमदार व रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदने देऊन थकलो आहोत. अद्याप कुणीही प्रतिसाद दिला नाही. तरी संबंधितांनी या प्रश्‍नाकडे तातडीने लक्ष देऊन गैरसोय दूर करावी आणि परिसराच्या विकासाकडे लक्ष द्यावे.
- महेश पाटील, अध्यक्ष, अक्कलकोट विभाग प्रवासी संघ