अक्षयकुमारची एन्ट्री आणि जल्लोष

अक्षयकुमारची एन्ट्री आणि जल्लोष

कोल्हापूर - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच ३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण कार्यक्रमास इनशर्ट केलेला ब्लॅक ड्रेस, हातात काळा ‘गॉगल’ घेऊनच बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच एन्ट्री ‘जनगान’ उद्यानात झाली. त्याला पाहण्यासाठी तासभर कडक उन्हात थांबलेल्या चाहत्यांना त्याने हात उंचावून पोझ दिली आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

देशभक्तीपर गीतांची धून आणि मंगलमय वातावरणात ध्वज अनावरणाचा सोहळा सुरू झाला. आमदार-खासदार, माजी आमदार यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांच्या गराड्यातून अक्षयकुमार ध्वजस्तंभाजवळ असलेल्या छोट्या व्यासपीठावर आला. तेथे त्याच्यासह मान्यवरांच्या हस्ते तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. राष्ट्रगीत आणि सलामीने देशातील दुसरा आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाचा असलेल्या ३०३ फूट उंच ध्वजाचे अनावरण झाल्याचे जाहीर झाले.

पोलिस उद्यानातील सेल्फी पॉईंटवर अभिनेता अक्षयकुमार, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री पाटील यांच्यासोबत सेल्फी काढून सेल्फी पाॅईंटचे अनौपचारिकपणे उदघाटन केले.

व्यासपीठावर अक्षयकुमार येताच रसिकांनी शिट्टया व टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे जल्लोषी स्वागत केले. 

त्यानेही ‘मी पहिल्यांदाच कोल्हापुरात आलो आहे. सगळे मिळून बोलू ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती शाहू महाराज की जय!’ असा जयघोष केला.  

‘‘मी मराठीत बोलणार आहे. काय चूक झाली तर समजून घ्या’’, असे म्हणून अक्षयकुमारने मराठीतून भाषणाला सुरवात केली आणि पुढे मराठी हिंदीतून त्याने भाषण केले. तो म्हणाला, ‘‘माझ्यासाठी मी कोण आहे, यापेक्षा मला महाराष्ट्रदिनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसण्याचा मान मिळाला. यामध्ये आनंद आहे. मी महाराष्ट्रीय नाही, पंजाबी आहे. तरीही मला ३०३ फूट उंचीच्या झेंड्याच्या अनावरणसाठी बोलविले. या झेंड्यामुळे देशभक्ती दिसून येते. मला खूप आनंद होतो की, फक्त झेंडा नसून तेथे गार्डनही आहे. बहोत कमाल की चीज है. कोल्हापूरच्या पर्यटनासाठी झेंडा महत्त्वाचा ठरेल. झेंड्यामुळे कोल्हापूर ‘टुरिझम स्पॉट’ बनेल. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत. रात्री दोनपर्यंत ते कार्यालयीन कामात असतात. पुन्हा सकाळी सात वाजता ते कामाला सुरवात करतात. त्यांच्यासोबत झेंडा कार्यक्रमात येण्यास संधी मिळाली. धन्यवाद.’’

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अक्षयकुमारच्या ‘भारत के वीर’ ॲपसाठी लाख रुपयांची मदत दिली. त्याबद्दलही त्यांचे आभार मानले. सीमेवर लढणाऱ्या लाखो सैनिकांच्या मागे देशातील सव्वाशे करोड जनता असल्याचे आपण दाखवून देऊ, असेही त्याने सांगून पुन्हा एकदा टाळ्या आणि शिट्टया घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com