नेहमीच आव्हानाला तोंड देणारे "शोलापूर' 

नेहमीच आव्हानाला तोंड देणारे "शोलापूर' 

सोलापूर : स्वातंत्र्यपूर्व काळात तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगलेले सोलापूर आता "शोलापूर' बनू लागले आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोलापूरचे नाव चर्चेत असते. दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपारा (मुंबई) येथे नुकत्याच केलेल्या कारवाईतील संशयितांकडून मुंबई, पुण्याबरोबरच सोलापूरही रडारवर असल्याचा असा निष्कर्ष काढला. राष्ट्रीय एकात्मतेचे ज्वलंत उदाहरण समजल्या जाणाऱ्या सोलापूरवर अशी वेळच का यावी, असा प्रश्‍न आहे. अलिकडे सोलापूरवर नेहमीच वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्याची वेळ येऊ लागली आहे, त्यामुळे पोलिस - प्रशासकीय यंत्रणांचे सोलापूरवर विशेष लक्ष राहू लागले आहे. सर्वच समाजघटकांनी सोलापूरचे "शोलापूर' होऊ नये यासाठी विशेष योगदान देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेले सोलापूर कधी दंगलीने तर कधी बॉम्ब सापडल्याने नकारात्मक चर्चेला सामोरे जाऊ लागले आहे. मिर्चीशेठ प्रकरण, होटगी तलावाजवळ मिळालेली शस्त्रे, बॉम्बचा मिळालेला साठा, मध्य प्रदेशमधील दहशतवादी कनेक्‍शन, होटगीत आढळलेला लालबाबा अथवा जातीय दंगल अशा तत्सम प्रकरणांनी सोलापूरचे नाव अलिकडील काळात सातत्याने रडारवर येऊ लागले आहे. त्यामुळे पोलिस-प्रशासकीय यंत्रणा सोलापूरवर नजर ठेवून आहेत. सोलापुरात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नाबरोबरच विघातक कारवायांच्या चर्चेला ऊत येऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसात दहशतवाद विरोधी पथकाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी चौकशीसाठी तरुणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त हाती आले आहे.

सन 1982, 1992, 2002 अशा दर दहा वर्षांनी जातीय दंगलीचा काळा इतिहास सोलापूरच्या माथी आहे, अपवाद आहे तो सन 2012 चा. संघटीत गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर 10 ऑगस्ट 1992 रोजी सोलापुरात आयुक्तालयाची स्थापना झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न काही प्रमाणात निकाली निघाला. परंतु तरीही जातीय दंगलीला खतपाणी घालणाऱ्या काही किरकोळ घटना सतत घडत आहेतच. या पार्श्‍वभूमीवर सर्वच समाजघटकांनी सोलापूरचे "शोलापूर' होऊ नये यासाठी विशेष योगदान देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पंढरपुरातील वारी व सोलापुरातील सिद्धेश्‍वरच्या सिद्धेश्‍वरच्या यात्रेवेळी देशभरातील पर्यटक हजेरी लावतात. त्यामुळे या कालावधीतही यंत्रणांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. 

उलट सुलट चर्चा 
अलिकडील 16 वर्षात सोलापुरात जातीय दंगलीसारख्या मोठ्या घटना घडल्या नसल्या तरी किरकोळ गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशमधील एन्काऊंटर, राईनपाडा, लातूरमधील अवैध मोबाईल टॉवर अशा कोणत्या ना कोणत्या कनेक्‍शनमधून सोलापूरचे नाव नेहमीच उलट सुलट चर्चेत असते. हे कमी होते की काय म्हणून आता नालासोपाराप्रकरणातूनही सोलापूरचे नवा पुन्हा एकदा चर्चेच्या शिर्षस्थानी आले आहे. एकूणच काय तर सोलापूर भविष्यात पुन्हा शोलापूर होऊ नये बस्स इतकेच !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com