नापिकी, कौटुंबिक विवंचनेतून शेतकरी महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

अंबासन - सततची नापिकी, सरकारची कर्जमाफीची दिरंगाई व लग्नाच्या वयात आलेल्या तीन मुलींचे होणार तरी कसे, या विवंचनेतून शेतकरी महिला भारती दादाजी पाथरे (वय 37) यांनी शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी वरचे टेंभे (ता. बागलाण) येथे घडली.

वरचे टेंभे येथील दादाजी पाथरे व भारती पाथरे हे दांपत्य आपल्या एक एकर क्षेत्रात कष्ट करून संसाराचा गाडा हाकत होते. शेतीसाठी बॅंकेकडून व हातउसनवार कर्ज उचलले. सरकारकडून कर्जमाफीला दिरंगाई होत असल्याने चिंतेत भर पडली आणि शेतीचे गणित कोलमडले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून भारती पाथरे अस्वस्थ होत्या. घरची परिस्थिती हलाखीची, त्यात तीन मुलींची लग्ने करायची कशी, शेतात सतत होणारी नापिकी या विवंचनेतून त्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास शेतातील तळ्यात उडी घेतली.

आई घरी परतली नाही म्हणून मुलींनी शोध घेतला असता, त्यांना शेततळ्यात त्या आढळल्या. अमोल वाघ, मालोजी आहिरे व बाजूच्या शेतकऱ्यांनी भारती यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. अखेर शेततळे फोडले व भारती यांना बाहेर काढले. त्यांना त्वरित नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.