अमेरिकन शिक्षण महागले

अमेरिकन शिक्षण महागले

सांगली - डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे अमेरिकेतील शिक्षण भलतेच महागले आहे. पालकांना वर्षाकाठी पाच ते सात लाख रुपयांचा  अतिरिक्त बोजा सोसावा लागणार आहे.

आजचा (ता.११) एका डॉलरचा दर तब्बल ७४ रुपये ४८ पैसे होता. भारतातून दरवर्षी साडेपाच लाख विद्यार्थी परदेशांत उच्च शिक्षणासाठी जातात. पैकी अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे पन्नास टक्के, कॅनडामध्ये २५ टक्के आणि ब्रिटनमध्ये १५ टक्के जातात. उर्वरित जपान, जर्मनी व अन्य देशांत जातात. गेल्या सहा महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या सततच्या घसरणीने विद्यार्थी आर्थिक संकटात आहेत. डॉलरच्या किमतीत आठ टक्के वाढ झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी एक डॉलर ६३ रुपयांना होता; २० ऑगस्टला तो ७० रुपयांवर गेला. 

अमेरिकेत शिक्षणासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा बहुतांश खर्च विद्यापीठाचे शुल्क, निवास आणि भोजन व्यवस्था यावर होतो. एकवेळ जेवणाचे सरासरी शुल्क तेरा ते पंधरा डॉलर आहे. खोलीसाठी महिन्याकाठी ९०० डॉलर द्यावे लागतात. अनेक विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणासाठी बॅंकांकडून शैक्षणिक कर्ज उचलले आहे. बॅंकांनी त्यांच्या वार्षिक खर्चाचा हिशेब करून कर्जाची रक्कम मंजूर केली होती. डॉलर महागत चालल्याने कर्जाची रक्कम अपुरी पडू लागली आहे. खर्चाची तोंडमिळवणी करेपर्यंत मेटाकुटीला येत आहेत. 

महिन्याचा खर्च दीड लाख रुपये
अमेरिकेतील आयव्हा स्टेट युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगमध्ये एमएस करणाऱ्या अजिंक्‍य कोष्टी या विद्यार्थ्याचे महिन्याचे खर्चाचे गणित असे आहे 
 निवास ः ९०० डॉलर
 भोजन - ७८० डॉलर 
 वरखर्च - ३०० डॉलर

एप्रिल महिन्यात १ हजार ९८० डॉलर म्हणजे ६० हजार रुपये खर्च व्हायचा. ऑक्‍टोबरमध्ये त्याला १ लाख ४७ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. सध्या त्याचा खर्च प्रतिमहिना ८७ हजारांनी वाढला आहे.   

डॉलर ७४.४८ रुपयांवर
जानेवारीत डॉलरची किंमत ६३ रुपये ५० पैसे होती. फेब्रुवारीअखेर ६५.२५ वर गेली. जुलैमध्ये ६८.५० पैसे तर ऑगस्टअखेरीस सप्टेंबर ७१ रुपयांवर गेली; तेव्हापासून त्याचा वेग कमी झालेला नाही. सप्टेंबरअखेरीस ७२.५० रुपये असणाऱ्या डॉलरने आज (ता.११) ७४.४८ रुपयांची ऐतिहासिक उंची गाठली.

पार्टटाइम नोकऱ्यांचा आधार
आयव्हा विद्यापीठात सांगली, कोल्हापूर, पुणे परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनी आपापल्या परीने महागाईवर उपाय शोधला आहे. अनेकांनी पार्टटाइम नोकऱ्या पत्करल्या आहेत. उपाहारगृहे, गॅरेज, मॉल अशा ठिकाणी दोन तास कामाचे दहा डॉलर मिळतात. काही ठिकाणी एकवेळच्या जेवणाचीही सोय होते. या कमाईतून महिन्याचा जेवणखर्च बाहेर काढण्याची त्यांची धडपड आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच छोट्या-मोठ्या नोकऱ्याही कराव्यात यासाठी विद्यापीठच उत्तेजन देते; दोन-तीन आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेते.

‘मुलाच्या विद्यापीठ प्रवेशाचे शुल्क पंधरा हजार डॉलर होते. प्रवेशनिश्‍चिती झाली तेव्हा डॉलरची किंमत ६३ रुपये होती. प्रत्यक्ष पैसे भरायची वेळ आली तेव्हा तो  ७३ रुपयांवर गेला. मला दीड लाख रुपये जादा भरावे लागले.
- प्रा. विजय कोष्टी,
कवठेमहांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com