जिल्हा परिषदेतही कमळच फुलणार - अमल महाडिक

जिल्हा परिषदेतही कमळच फुलणार - अमल महाडिक

‘जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना समाजकारण हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करत आलो आहे. समाजाच्या हिताचा विचार केल्यामुळेच दोन वर्षांपासून शेतकरी, ग्रामीण विकासावर अधिक भर देण्यात येत आहे. केंद्र, राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेमध्येही भाजपच सत्तेत येईल. कमळ हे चिखलामध्येच उमलते आणि खुलून दिसते आणि असे कमळ फुलले की, सभोवतालचा परिसर अत्यंत नयनरम्य दिसतो. त्याच प्रमाणे या निवडणुकीत ही विरोधकांच्या राजकीय चिखलामध्ये कमळच फुलणार आहे,’’ असा विश्‍वास आमदार अमल महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

आमदार महाडिक म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून मी काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा, शेतकऱ्यांचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, याची जाणीव मला आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून अत्यंत उत्तम प्रकारचे शिक्षण दिले जाते; परंतु काळानुसार ही शिक्षण पद्धती बदलण्याची गरज आहे. खासगी व इंग्रजी माध्यमातील शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या असल्यामुळे साहजिकच पालकांचा ओढा या शाळांकडे आहे. तथापि ग्रामीण गोरगरीब जनतेला शिक्षणाची समान संधी मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही डिजिटायझेशन, सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडीतील मुलांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यातूनच अंगणवाडीचे प्रश्‍न मार्गी लावून त्या सक्षम करण्यासाठी आपले प्राधान्य राहील. कुपोषित बालकांची संख्या हा प्रश्‍न नेहमीच गंभीर असतो. कुपोषितमुक्त जिल्हा कसा होईल, त्याचा रोडमॅप जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आल्यानंतर आपण करू आणि त्याची अंमलबजावणीही करू. शासनाच्या अनेक योजनांचा फायदा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्यात अडचण येते. या अडचणी मीही स्वतः अनुभवल्या आहेत. सर्वसामान्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये साठी माझा प्रयत्न राहील. लाभार्थ्यांना सुलभ व जलद गतीने योजना कशा मिळतील, त्यासाठी माझा प्रयत्न असेल.’’

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची संधी उपलब्ध झाली आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट, कॅशलेस व्यवहार सुरू झाले आहेत. त्याची अंमलबजावणी ग्रामीण पातळीवर करण्यासाठी मी प्राधान्य देणार असल्याचे सांगून आमदार महाडिक म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतींना अधिक सक्षम बनविण्यासाठी त्याठिकाणी अत्याधुनिक सुविधा पुरवून त्यांचा ‘कनेक्‍ट’ थेट दिल्लीपर्यंत असेल. ग्रामपंचायतींमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांनाही अत्याधुनिक सुविधा देण्याचे काम करणार आहे. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्‍न बिकट असून तो सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावांची पुनर्बांधणी, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्‍न सोडवायचा असेल तर विविध उद्योग तेथे सुरू होण्याची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढला तर निश्‍चितच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. श्री महालक्ष्मी मंदिर, नृसिंहवाडी अशी विविध धार्मिक स्थळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पन्हाळगडासारखे दुर्ग आणि निसर्गसौंदर्याने भरभरून मिळालेले दान यांचा उपयोग करून पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न केले जातील. महिला सबलीकरणासाठीही मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल.’’

महाडिक म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवार, माती परीक्षण, पीक कर्ज विमा योजना अशा विविध योजना शेतकऱ्यांसाठी, नवउद्योजकांसाठी मुद्रा योजना राबण्यात आल्या. दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मूलभूत पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर दिला आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांना राज्य व केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची शक्‍यता असते. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये त्याचा उपयोग होईल. ग्रामीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. ग्रामीण भागाच सर्वांगीण विकास साधण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम राबवून पावले टाकली जातील. जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष जोमाने काम करत आहे त्याचा प्रतिसाद या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसून येईल. भाजपला मत म्हणजे विकासाला मत हे जनतेला पटले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही जनता भाजपला भरभरून मतदान करेल असा विश्‍वास वाटतो.’’ 

आमदार महाडिक म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाच्या आघाडीस या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल. भाजपसोबत जनसुराज्य शक्ती, रिपब्लिकन, ताराराणी आघाडी पक्ष यांच्यासह काही स्थानिक गटांसोबत आघाड्या केल्या आहेत. या सर्वांच्या मदतीने सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठण्यात नक्कीच यश मिळेल. तालुक्‍यातील प्रत्येक भागामध्ये सगळ्यांची वज्रमूठ बांधण्यात आम्हाला यश आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे. केलेल्या विकासकामांच्या जोरावरच आम्ही जनतेसमोर जात आहे. गेल्या दहा वर्षांत जेवढा विकास निधी आला नाही, तेवढा निधी अवघ्या दोन वर्षांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आम्ही आणला आहे. आम्ही केलेली विकासकामे नागरिकांना दिसत आहेत. भाजप सरकार केवळ आश्‍वासने न देता प्रत्यक्ष विकास करून दाखवत असल्याचा विश्‍वास नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com