संघाशी संबंध जोडणाऱ्यांवर खटला दाखल करणार: अण्णा हजारे 

Anna Hazare
Anna Hazare

नगर :  मला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा मुद्दा घेऊन कल्पना इनामदार या गोडसे यांची नात असल्याच्या आणि त्यांच्याहाती या आंदोलनाची सर्व सुत्रे अण्णांनी सोपवल्याच्या बातम्या गेल्या दोन तीन दिवसांत चर्चेत आहेत. वास्तविक पाहता कल्पना इनामदार आणि माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलन सुरु होणार म्हणून विविध राज्यातील नवीन जे कार्यकर्ते पुढे आले त्यामध्ये कल्पना इनामदार एक होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाचे कोणतेही सुत्र सोपविलेली नव्हती. समन्वय समितीमधील प्रत्येक कार्यकर्त्याने आंदोलनाची जी कामे विभागून घेतली त्यानुसार कल्पना इनामदार यांनी मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती.

या आंदोलनाची सर्व सुत्रे मी स्वत: हाताळीत होतो. मात्र आंदोलन बदनाम करण्याच्या हेतूने केलेल्या कटकारस्थानामुळे कल्पना इनामदार यांना नथुराम गोडसेंशी जोडले गेले. तसेच कल्पना इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सुत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. किती खोटे बोलावे याचे सुद्धा बदनामी करणाऱ्या चौकडीला भानच राहिलेले नाही.

एका वृत्तपत्राने कल्पना इनामदार यांच्या संबंधीची खोटी बातमी छापून त्यातील मुद्दयांना कोणताही आधार नसताना अण्णा संघाच्या कसे जवळ आहेत हे भासविण्याचा प्रयत्न केला. सोशल मिडीयावर काही मंडळींनी मुद्दामहून त्यावर चर्चा करून त्यात भर घातली. याच वृत्तपत्राने यापूर्वीही एक हिन दर्जाची खोटी लेखमाला प्रसिद्ध करून मला व आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी वाहिन्यांवर चक्क खोचा आरोप करताना असे म्हटले आहे की, अण्णांनी संघाच्या शाखेत दहा वर्षे प्रशिक्षण घेऊन त्यानंतर सामाजिक काम सुरू केले. अशा प्रकारे विशिष्ठ वर्गाकडून माझे नाव संघाशी जोडण्याचा प्रयत्न करून जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे.

वरील सर्व बाबींचा कसून शोध घेतला असता काही मंडळी अण्णा हजारे व आंदोलन यांना जाणिवपूर्वक बदनाम करण्याचे रॅकेट चालवित असल्याचे दिसून आले. मी गेली 25 वर्षे समाज, राज्य आणि राष्ट्रहितासाठी कोणत्याही पक्ष, पार्टी व व्यक्तिचा विचार न करता मी आंदोलने करीत आलो. मात्र ज्या प्रमाणे दुकानातील रेडिमेड कपडे कुणाला ना कुणाला येतच असतात. पण त्यांना असे वाटते कि, हे आमच्यासाठीच शिवलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही जरी व्यक्ती, पक्ष, पार्टी समोर ठेवून आंदोलन करीत नसलो तरी अशा लोकांना आमचे आंदोलन कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा बाजुने केलेले भासते.

आमच्या आंदोलनामुळे राज्यातील प्रमुख पक्षपार्ट्यांच्या मंत्र्यांना ते भ्रष्ट ठरल्यामुळे घरी जावे लागले. त्यात सर्वच प्रमुख पक्षांचे मंत्री आहेत. सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना आंदोलनामुळे भ्रष्ट ठरून सदर पक्षांची मोठा हानी झालेली आहे हे नाकारता येत नाही. पण स्वतः भ्रष्ट असल्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत. आंदोलनामुळे राजकिय पक्षांची  ‘धरावे तर चावते आणि सोडावे तर पळते’ अशी अवस्था झाली आहे. विशेषतःहा आम्ही आजवर आमच चारित्र्य शुद्ध ठेवल्याने आणि केलेले कार्य आरशासारखे स्वच्छ असल्याने या मंडळींना आमच्या विरूद्ध काहीच करणे शक्य नाही. म्हणून अलिकडच्या काळात राजकिय पक्षांमधील दुखावलेल्या काही लोकांनी बदनामीची मोहिम हाती घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दिल्लीच्या आंदोलनातील कल्पना इनामदार यांचा मुद्दा घेऊन बदनामीचा प्रयत्न करण्यात आला.

मला बदनामीची फिकीर वाटत नाही. मी मंदिरात राहणारा एक फकिर माणूस आहे. अशा प्रकारच्या बदनामीमुळे माझे काहीच नुकसान होत नाही असे मला वाटते. परंतु समाजाचे नक्कीच मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना नेहमी माझ्या जीवनातील अनुभव सांगताना जीवनात शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडासा त्याग आणि अपमान पचविण्याची शक्ती इत्यादी गुण असावेत असे आग्रहाने सांगत असतो. हे पाच गुण असतील तर समोरच्या शक्ती आपले काहीच करू शकत नाहीत. असे जरी असले तरी सातत्याने होणारी बदनामी किंवा अपमान पचविल्यामुळे जर समाजाचे, राज्याचे व देशाची नुकसान होणार असेल तर असा अपमान पचविणे दोष ठरेल, अशी माझी धारणा आहे. म्हणूनच संतांनी म्हटले आहे की, खटाशी खट, धटाशी धट व उद्धटाशी उद्धट झालेच पाहिजे.
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णू दास ।
कठीण वज्राशी भेदू ऐसे ।।

हे संताचे वचन आहे. त्याचे अनुकरण समाजहितासाठी करणे आवश्यक आहे. मी जरी फकीर असलो तरी आज पर्यंत अनेकदा न्यायालयीन लढाई लढावी लागली आहे. अशा लढाईत राज्यातील वेगवेगळ्या अकरा वकिलांनी सामाजिक भावणेतून एकही रुपया फी न घेता आंदोलनाला साथ दिली आहे. त्याचा परिणाम म्हणून सहा भ्रष्ट कॅबिनेट मंत्री व शेकडो भ्रष्ट अधिकारी यांना घरी जावे लागले.

सातत्याने खोट्या आरोपांद्वारे मला व आंदोलनाला संघाशी जोडून विविध मार्गांनी वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊन चळवळीचे नुकसान होते आहे. तसेच समाजात दुषित वातावरण निर्माण होत आहे.  सातत्याने होणाऱ्या बदनामी मुळे माझे वय ऐंशी वर्षाचे झाले असले तरी एक नवी लढाई लढण्यासाठी मी पुन्हा ऐंशी वर्षांचा तरूण झालो आहे. माझी अनुभवी वकिलांशी चर्चा सुरू असून अशा प्रकारे बदनामी करणाऱ्या लोकांविरूद्ध लवकरच उच्च न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com