साताऱ्यात आणखी एका टोळीवर मोक्का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

सातारा - रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडवून मारहाण करत लुटमार करणाऱ्या चौघांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हे कायद्यानुसार (मोक्का) पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा - रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडवून मारहाण करत लुटमार करणाऱ्या चौघांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हे कायद्यानुसार (मोक्का) पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक नामदेव मसुगडे व त्याच्या तीन साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली
आहे. 16 एप्रिल 2018 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रणसिंगवाडी (ता. खटाव) येथे या टोळीने सायकलवरून जाणाऱ्या एकाला अडवून मारहाण करत दहा  हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी दिपक मसगुडे व त्याच्या तीन साथीदारांवर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासामध्ये ही टोळी रस्त्यावर लुटमारी करत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी पुसेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. ए. गायकवाड यांना दिले होते. त्यानुसार गायकवाड यांनी अधिक्षक पाटील यांच्या मार्फत हा प्रस्ताव मंजूरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्याला त्यांनी मंजूरी दिली. त्यानुसार पुसेगाव पोलिस ठाण्यात या टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कायद्याचे कलम वाढविण्यात आले आहे. तपासासाठी हा गुन्हा वडुजचे पोलिस उपअधिक्षक यशवंत काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Web Title: Another group in Satara under Mokka