घड्याळाच्या काट्यावर चालणारा डबेवाला..! 

घड्याळाच्या काट्यावर चालणारा डबेवाला..! 

कोल्हापूर - कंदलगावातील अर्जुन दौलू संकपाळ हा एक साधा डबेवाला. घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणारा माणूस. पांढरा शर्ट, पांढरी विजार हा खास पेहराव. वय साधारणपणे 65. ही माहिती सांगण्याचे कारण आहे, ते म्हणजे या डबेवाल्या मामांचा शिवाजी विद्यापीठातील मुद्रणालयात डबे पोचवण्याचा प्रवास 45 वर्षांचा झाला आहे. 75 डबे आणण्याचे काम आता वीस डब्यांवर आले असले, तरी सेवेतील प्रामाणिकपणा अजून टिकून आहे. 

या डबेवाल्या मामांची स्वत:ची खानावळ असेल व म्हणून ते डबे पोचवत असतील, असा प्रश्‍न अनेकांच्या मनात येणे साहजिकच आहे. विशेष म्हणजे त्यांची खानावळ नाही, तर मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांच्या घरोघरी जाऊन डबे घेऊन ते मुद्रणालयात पोचवण्याचे काम करतात. शहर परिसरातला रोजचा सायकलवरचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. नोव्हेंबर 1971 पासून त्यांनी मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांना डबे पोचवण्याच्या कामास सुरवात केली. त्या वेळी 75 डबे ते सायकलवरून विद्यापीठात आणायचे. दोन शिफ्टमध्ये त्यांना काम करावे लागे. या कामासाठी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची घरे माहीत करून घेतली. 

सकाळी साडेनऊला घरातून बाहेर पडल्यानंतर ते बजापराव माने तालमीजवळ यायचे. इथल्या कर्मचाऱ्यांच्या घरातला डबा घ्यायचे. पुढे नंगीवली चौक, मोरे कॉलनी, खंडोबा तालीम, वेताळ तालीम, मरगाई गल्ली, पितळी गणपती, पंचगंगा हॉस्पिटल, जैन गल्ली, बुरुड गल्ली, बुधवार पेठ, मठ तालीम, बिंदू चौक, बागल चौक, यादवनगर, सागरमाळ, दौलतनगर परिसरातील कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन डबे घेऊन ते विद्यापीठाकडे निघायचे. दुपारी साडेबारा ते एक या वेळेत ते सायकलला पन्नास डबे अडकवून विद्यापीठात पोचायचे. कर्मचाऱ्यांनी डबे खाल्ल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी पोचवण्याचे काम करायचे. हे डबे पोचवून पुन्हा रात्रीच्या शिफ्टला असणाऱ्या पंचवीस कर्मचाऱ्यांचे डबे घेऊन पुन्हा विद्यापीठात यायचे. ते रात्री साडेनऊला घरी परतायचे. 
डबेवाले मामा आजही मुद्रणालयातील वीस कर्मचाऱ्यांचे डबे घेऊन येतात. सुरवातीला एका डब्यामागे त्यांना महिन्याकाठी चार रुपये मिळायचे. आता एका डब्यामागे कर्मचारी त्यांना महिन्याकाठी दोनशे रुपये देतात; मात्र दोन वर्षांमागे त्यांनी कर्मचाऱ्यांचे डबे पुन्हा घरी पोचवण्याचे काम बंद केले आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्यांचे रोजचे जीवनचक्र सुरू आहे. घरगुती आवश्‍यक काम असेल, तर तशी कल्पना कर्मचाऱ्यांना देऊन सुटी घेण्याचा संकेत त्यांनी पाळला आहे. बाकी जोरदार पाऊस असो, कडाक्‍याचे ऊन असो, की कडाक्‍याची थंडी, या स्थितीतही सेवेतील तत्परता मात्र त्यांनी अद्याप जपली आहे. 

रिक्षाने डबे पोचवले... 
श्री. संकपाळ म्हणाले, ""डबे घेऊन येताना सायकल पंक्‍चर झाली, की धडधड वाढायची. कर्मचाऱ्यांना वेळेत डबा मिळाला नाही तर काय होईल, हा विचार करून अस्वस्थ वाटायचं. त्यामुळे सायकल पंक्‍चर झाल्यावर दुरुस्तीला सोडून थेट रिक्षानेच विद्यापीठ गाठत होतो. कर्मचाऱ्यांना वेळेत डबा मिळाल्यानंतर बरे वाटायचे. आजही वेळेवर डबे घेऊन येत असल्याने मला समाधान मिळते.'' 

बंधूंचा सल्ला मानून कामास प्रारंभ. 
कंदलगावात चार एकर शेती आहे; पण त्यात पिकत काही नाही. त्यामुळे छोटे-मोठे काम करणे जरुरीचे होते. माझे भाऊ एसटी कर्मचाऱ्यांना डबे पोचवायचे. त्यांनी विद्यापीठात डबे पोचवण्याचे काम कर, असा सल्ला दिला होता. तो सल्ला मानून मी कामास सुरवात केल्याचे श्री. संकपाळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com