अलौकिक दादा...

अलौकिक दादा...

सांगली जिल्ह्याने गदिमांच्या रूपाने एक महाकवी दिला. ज्यांच्या गीतांनी मराठी मनांवर अधिराज्य गाजवलं. त्याच ग. दि. माडगूळकरांचा हा वसंतदादा पाटील यांच्यावरील अप्रकाशित लेख वाचकांसाठी आम्ही देत आहोत. दादांच्या एकसष्टीनिमित्त त्यांनी हा लेख 1977 मध्ये लिहिला होता. राजकारणातील या अवलीयावर आपल्या लेखातून त्यांनी व्यक्‍त केलेल्या या भावना... मूळ हस्तलिखित लेख छोटा आहे, पण त्यावेळचा सारा काळच उभा करतो आणि दादांचं मोठेपण कसं अलौकिक होतं, हे एका महाकवीच्या लेखणीतून असे साकारले...

महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री श्री. वसंतरावदादा पाटील हे अत्यंत प्रेमळ गृहस्थ आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी बजावलेली कामगिरी तर अजोडच आहे.

मला त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटतो तो त्यांच्या त्या अत्यंत प्रेमळ स्वभावामुळे. चिडलेले दादा मी कधी पाहिले नाहीत.

त्यांच्या सांगली येथील सहकारी कारखान्याची एक जनरल मिटिंग पाहण्याचा योग मला आला होता. त्यावेळी ते संस्थेचे अध्यक्ष नव्हते. अध्यक्षस्थानी कुणी दुसरेच गृहस्थ होते.

शेकडो सभासदांनी या अध्यक्षावर प्रश्‍नांचा नुसता भडिमार चालविला होता. तो बापडा गांगरून गेला. आता दंगल होणार, असा रंग दिसू लागला. इतक्‍यात दादा सभास्थानी उपस्थित झाले. अध्यक्षाच्या शेजारी जाऊन बसले. सभासदात कोलाहल चालला होता.

'अध्यक्ष महाराज आणि सभासद बंधूंनो' दादांनी बोलायला आरंभ केला मात्र. सारी सभा एकदम शांत झाली. लक्ष देऊन दादांचे भाषण ऐकू लागली.

सुमारे तासभर ते अगदी शांत स्वरात जिव्हाळ्याने बोलत राहिले आणि सभासदांच्या अवघ्या शंका मिटून गेल्या.

हे दृश्‍य सत्यार्थाने अलौकिक होते. एखाद्याच्या वाणीत असलेले सामर्थ्य अकारण येत नसते. असा अधिकार सत्तेने वा संपत्तीने लाभत नाही. त्याला माणसाच्या अंगी एखादे साधुत्व लक्षणच असावे लागते.

दादा मंत्रिमंडळात नव्हते तेव्हा त्यांच्याकडे जाण्याचा योग मला आला होता. गेल्या म्हणजे 1977 सालच्या फेब्रुवारी महिन्यातील ही गोष्ट आहे.

"शांतिनिकेतन' शिक्षण संस्थेच्या वार्षिक समारंभाचा पाहुणा म्हणून मी गेलो होतो. थांबलो होतो तो सांगली सहकारी कारखान्याच्या गेस्ट हाऊस मध्येच.
सकाळी दादांनी होऊनच मला निरोप पाठविला आणि मला बोलावून घेतले.
ते काल होते तसेच आजही दिसले. मला म्हणाले, 'अण्णा, इथे गर्दी फार असते. आपण आमच्या गावी जाऊया'

ते आणि मी पद्माळेच्या त्यांच्या शेतावर गेलो. तेथे एक लहानशी कुटी उभारली होती. दादा म्हणाले, ""हा आला आमचा वानप्रस्थाश्रम!'
मग त्यांनी आपल्या पुतण्यांची, नातवंडांची ओळख करून दिली.
खरबुजे, द्राक्षे असा खास फलाहार दिला. माझ्याबरोबर ते शहरात आले. येताना गाडीत आम्ही खूप बोललो. त्यांच्या स्वभाव मला त्यावेळी प्रकर्षाने जाणवला.

त्यांनी मंत्रिमंडळ सोडले होते. राजकारणाचाही त्यांना वीट आला होता.
प्रसंग उत्पन्न होताच, दादा पुनः राजकारणाच्या आखाड्यात उतरले. ते स्वतःसाठी खचित नाही. अवघा समाज त्यांना आप्तासारखा वाटतो त्याला ते तरी काय करणार !

दादांच्या संदर्भात शिक्षित, अशिक्षित हे शब्दच व्यर्थ आहेत. दादांसारख्या माणसाला अशिक्षित म्हणणे धारिष्ट्याचे होईल. त्यांच्या उपजत व अनुभवसिद्ध ज्ञानाच्या पदवीचे परिमाण पाहिजेच कशाला ?

त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी काही "सोवळी' माणसे कुजबुजत. मला त्यांचे ते कृत्य न्याय्य वाटते. प्रामाणिकपणाने वाटते.

माझी पूर्ण खात्री आहे, की दादा महाराष्ट्राची धुरा नीट यशस्वीपणे सांभाळतील. ते सत्तेवर असोत की नसोत, त्यांनी ज्या कॉंग्रेसच्या सेवेला आजतागायत वाहून घेतले होते ती आज उरलेली नाही. ती कॉंग्रेस महात्मा गांधीजींची होती. आजची कॉंग्रेस इंदिरा गांधींची होती. दोन्हीतले अंतर दोन ध्रुवांइतके.

दादा शेवटपर्यंत म. गांधींच्या कॉंग्रेसचेच अनुयायी राहतील, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

दादा मला आपला मित्र मानतात हे माझे भाग्य आहे. एकदोन खासगी गोष्टी मुद्दाम सांगतो. दादा ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्याच दिवशी माझ्या घरी एक अपघात घडला. माझी धाकटी बहीण श्रीमती लीला रायरीकर अपघाताने देवाघरी गेली.

दादा किती घाईत असतील त्यावेळी. केवढी कामे असतील त्यांच्या पाठीमागे. त्या तसल्या प्रसंगीही ते मला शोकसदाचाराचे पत्र पाठवायला विसरले नाहीत.

अगदी परवाची गोष्ट. एक ऑक्‍टोबर हा माझा जन्मदिवस. माझ्या वाढदिवसाला तसे काय महत्त्व. पण दादांचे आवर्जून पत्र आले. अभिनंदनाचे, अभीष्टचिंतनाचे.

दादा आता एकसष्टीच्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या मंगल प्रसंगी मी म्हणतो.
दादा,
शंभर वर्षे जीवनानंद भोगा
शंभर वसंतांचे सुगंध
तुमच्या नासिकेला तृप्त करोत
शंभर शरदाचे चांदणे
तुमच्या शांत मस्तकावरून वाहून जावो
- ग. दि. माडगूळकर (24/10/1977)

(श्री. सदानंद कदम यांच्या संग्रहातून साभार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com