पाटील-देशमुख संघर्षाला बाबर-पडळकरांचा तडका 

पाटील-देशमुख संघर्षाला बाबर-पडळकरांचा तडका 

एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. राहिल्या तरी म्यान फाटण्याचा धोका असतो. याच सूत्रानुसार राष्ट्रवादीतून आधी अनिल बाबर यांनी आणि नंतर राजेंद्र देशमुखांनी दूर होणे अपरिहार्य होतं. मात्र तोच धोका भाजपमध्येही आहे. पण सध्या सत्ता नावाचा गोंद तिथं आहे. सत्तेच्या परिघाभोवतीच सारा डाव मांडायचा असतो. त्यातच अस्तित्व सामावलेलं असतं; अन्यथा छोट्या छोट्या अडचणी मोठे स्वरूप धारण करू शकतात. दुष्काळी माणदेशाचं राजकारण त्याला अपवाद असायचं कारण नाही. 
 

कायम दुष्काळी माणदेशाच्या राजकारणात फारसे चढउतार कधीच नव्हते. प्रत्येकाने आपआपला गट टिकवून आजवर मर्यादित चौकटीत राजकारण केले. खानापूर-आटपाडी या दोन तालुक्‍यांचे मतदारसंघाचे हे नाते म्हणजे एकमेकाची भाकरी परतण्याच्या म्हणीशी जोडलेले. काळाच्या ओघात राज्याचे राजकारण युती आणि कॉंग्रेस आघाडीच्या चौकटीतून बाहेर पडल्यानंतर सर्वत्रच उलथापालथी सुरू झाल्या. मात्र हा प्रवाह माणदेशात यायला टेंभूच्या पाण्याप्रमाणेच उशीर झाला. दहा वर्षांपूर्वी झरेतून गोपीचंद पडळकर यांनी माणदेशाच्या राजकारणात उलथापालथी करण्यासाठीचा दगड टाकला. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला चांगलेच जेरीस आणले होते. समोर अनिल बाबर आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अशी जोडी होती. त्यानंतर अमरसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. विधानसभेच्या आधी आमदार बाबर यांनी एकूणच सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीविरोधातील जनतेतील रागरंग ओळखून राष्ट्रवादीला "जय महाराष्ट्र' करीत शिवसेनेत उडी मारली. त्यामागचे त्यांचे गणित पक्के होते. युतीच्या जागावाटपात ही जागा सेनेच्या वाट्याला होती. पुढे युतीचा काडीमोड झाला. कॉंग्रेस-भाजप-राष्ट्रवादी-कॉंग्रेस अशी लढत झाली. अमरसिंह देशमुख यांनी राष्ट्रवादीतून एकाकी झुंज दिली होती. पडळकरांनी भाजपकडून कडवी झुंज दिली. त्यांच्या विजयाच्या मर्यादात जातीच्या समीकरणाचींही अडचण होती. पडळकर यांना हे समीकरण सोडवण्यासाठी देशमुखांची गरज होती. देशमुखांनाही सत्तेच्याविरोधात लढणे अवघड होते. उध्द्‌वस्त झालेल्या राष्ट्रवादीच्या तंबूत थांबण्यात कारण उरले नव्हते. दीर्घकाळाच्या निष्ठेचे फळ म्हणून राष्ट्रवादीने त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद देऊन एकदा उजवलेही होते. देशमुख बंधूंच्या भाजपप्रवेशामुळे भाजपसाठी माणदेशाचा माळ आता बागायती शेतीसमान झाला आहे. राजकारणात विरोधकांची नेहमीच एक स्पेस असते. मात्र तो अवकाश तयार होऊच द्यायचा नाही असा इरादा देशमुखांचा होता. मात्र अनिल बाबर यांनी ती स्पेस अल्पावधीत भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तानाजी पाटील यांच्या रूपाने तालुक्‍यातील त्यांचा गट रिचार्ज झाला आहे. ते आता पूर्ण क्षमतेने विरोधकांची स्पेस भरून काढतील. त्यांच्यासोबतीला देशमुखांचे प्रदीर्घकाळचे सहकारी करगणीचे अण्णासाहेब पत्कीही असतील. 

या सर्व उलथापालथीचा परिणाम तत्काळ जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीवर कोणता असेल? ही भाजप-सेनेच्या वर्चस्वाची लढाई आहे. या लढाईत राष्ट्रवादीची आत्ताच पुरती वाताहत झालीय. चार गट आणि आठ गणांमधील सत्ताबळ कसे राहते, याकडे आता तालुक्‍याचे नव्या दृष्टीतून लक्ष असेल. प्रत्येक गटात सरासरी तीस हजार मतदान आहे. पडळकरांनी तालुक्‍यात भाजप चांगला वाढवला, मात्र भविष्यात या झाडाची फळे चाखायला तेच असतील याची खात्री मात्र कोणी देणार नाही. कारण वर्तमान राजकारणात "गहू तेव्हा पोळ्या' असाच शिरस्ता आहे. सध्याच्या जागावाटपात पडळकर-देशमुखांना जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी दोन समान जागा तर पंचायत समितीच्या जागा वाटपात हे वाटप अनुक्रमे तीन-पाच असे आहे. विरुद्ध बाजूला सेनेचे नेते तानाजी पाटील यांनी कमी कालावधीत मोट बांधत प्रबळ आव्हान निर्माण केले आहे. देशमुखांच्या भाजप प्रवेशावर नाराजांपैकी पत्की आणि विजयसिंह पाटील यांना सोबत घेतले आहे. यानिमित्ताने आटपाडीत पाटील गट तब्बल पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र आला आहे. स्वाभिमानी आघाडीचे भारत पाटील आणि आनंदराव पाटील यांच्या सोबत आघाडी केली आहे. तानाजी पाटील यांच्या पत्नी मनीषा यांना करगणी गटात, तर स्वतः ते कौठुळी गणातून लढत देत आहेत. त्यामुळे तालुक्‍यात पुन्हा एकदा पंधरा वर्षांनंतर पाटील-देशमुख असा थेट संघर्ष यापुढच्या काळात असेल, त्याला बाबर- पडळकरांचा तडका असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com