ऍट्रॉसिटीचा काना, मात्राही बदलू देणार नाही - वामन मेश्राम

ऍट्रॉसिटीचा काना, मात्राही बदलू देणार नाही - वामन मेश्राम

कोल्हापूर - 'मराठा क्रांती मोर्चातून केलेली ऍट्रॉसिटी रद्द करा, अशी मागणी चुकीची असून ऍट्रॉसिटी कायद्याचा काना, मात्रा, वेलांटीही बदलून देणार नाही. मराठ्यांच्या विरोधात दलितांना व दलितांच्या विरोधात मराठ्यांना भडकविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करीत आहे,'' असा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आज येथे केला. "एकच पर्व बहुजन सर्व' असा नारा देत बहुजनांच्या अमाप सहभागाने विराट मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या सभेत श्री. मेश्राम यांनी मुख्यमंत्री ब्राह्मणी वर्चस्वाने कारभार चालवत असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केली.

गेल्या दोन महिन्यांपासून विविध पातळीवर प्रसार, प्रचारातून बहुजन समाजातील विविध घटकांनी एकत्र घेऊन ऍट्रॉसिटी ऍक्‍ट अधिक कडक करावा, ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यासाठी 288 संस्था, समाज संघटनांच्या सहभाग राहिला तसेच हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नाही, असे विविध वक्‍त्यांनी जाहीर केले. या मोर्चाला महिलांचाही मोठा सहभाग लाभला. ही या मोर्चाची खास वैशिष्ट्ये ठरली.

सकाळी 9 वाजल्यापासून शहराच्या चारही भागांतून रस्त्यावर लोक मोर्चास्थळी येऊ लागले. हातात निळे, भगवे, पिवळे झेंडे घेऊन विविध समाज संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांपासून ते महिला वर्गही गट करून मोर्चास्थळी आले; तर कसबा बावडा, लक्षतीर्थ वसाहत, राजेंद्रनगर, विचारे माळ, सदर बाजारसह शहराच्या अन्य भागांतून कार्यकर्ते रॅली काढून येथे आले. इचलकरंजी, पन्हाळा, चंदगड, आजरा येथूनही मोठ्या संख्येने लोक गटागटाने येथे आले. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तरीही बाहेरगावहून येणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे शहरातील मोर्चास्थळे येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले. सुरवातीला गती काहीशी कमी होती. साडेदहा वाजल्यानंतर मात्र दसरा चौक गर्दीने भरून गेला. यानंतर प्रत्यक्ष सभेला सुरवात झाली.

श्री. मेश्राम म्हणाले की, 'हा मोर्चा केवळ मोर्चाला मोर्चा काढायचा म्हणून काढलेला नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत दहा लाखांचा मोर्चा काढला. त्यानंतर त्यांची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. आमचे मोर्चे अनेक निघाले. पण आमचा मुख्यमंत्री सोडा, पण आमदारही पुरेस झाले नाहीत. आता अशा अर्थाने मोर्चा काढलेला नसून शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार समाजात रुजले पाहिजेत. त्यासाठी परिवर्तनासाठी मोर्चा काढला आहे. 36 जिल्ह्यांत असे मोर्चे निघणार आहेत. त्यातील हा तिसरा मोर्चा आहे. त्यानंतर 50 लाख लोकसहभागाचा मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाची ही रंगीत तालीम आहे. या सर्व मोर्चामागील भूमिका समजून घ्यावी लागेल. ''

ते म्हणाले की, 'यापूर्वी निघालेल्या मराठा मोर्चातून ऍट्रॉसिटी कायदा रद्द करा तर काही ठिकाणी शिथिल करा, अशा मागण्या झाल्या. यात काही मोर्चांना मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ऍट्रॉसिटी कायद्याची माहिती अनेकांना नसल्याचे समजले. जेव्हा आम्ही या कायद्याची माहिती समजून सांगितली तेव्हा ते आमच्या मोर्चांत सहभागी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच दलितांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी मराठा समाजाला; तर मराठ्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी दलितांना प्रोत्साहित करीत आहे. त्यासाठी गाड्या, पैसाही पुरविण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. आम्ही मोर्चा काढणार, असे समजताच संघाने असा प्रयत्न केला; पण तो आम्ही पूर्णतः नाकारला. आम्ही कोणा मराठ्यांच्या विरोधात मोर्चा काढत नाही.'' आम्ही आमच्या न्याय्य हक्क अधिकारांसाठी मोर्चा बहुजनांच्या सहभागाने काढत असल्याचे सांगितले.

ओबीसी संघटनेचे राजेंद्र संकपाळ म्हणाले की, 'ओबीसीच्या हक्काचा घास हिरावण्याचा प्रयत्न होत आहे त्याविरोधात लढा देण्यासाठी सर्व ओबीसी एकत्र येऊन या मोर्चात सहभागी झाला आहेत. त्यामुळे आमची ताकद वाढली असून सर्व बहुजन एक झाला आहे.''

ख्रिस्ती युवा संघाचे राकेश सावंत म्हणाले की, 'कॉंग्रेसच्या काळात चर्चवर हल्ले झाले. नंतर भाजपची सत्ता आली. तरीही असे हल्ले होत आहेत. समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम संघवादी शक्ती करतात. त्यांनी हे काम आता थांबवावे. कारण सर्व बहुजन समाज आता एक झाला आहे व त्याची साक्ष या मोर्चाच्या प्रतिसादातून दिसत आहे.''

ओबीसी सेवा संघाचे बळवंत सुतार म्हणाले की, 'समाजात पडलेली फूट नेहमी राजकारणाच्या पथ्यावर पडते. आपण आपल्यात दुफळी करून काही मागत राहिलो तर आपल्याला काही मिळणार नाही. त्यापेक्षा सगळे एकत्र होऊ तेव्हा सत्तेत स्थान मिळविता येईल. आपण आपल्यासाठी काही मागण्यापेक्षा समाजाला काही तरी देण्याचा अधिकार मिळेल, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊ, असा निर्धार या मोर्चातून करू.''

कोळी समाजाचे बसवंत पाटील म्हणाले की, 'जातीपातीच्या भेदात समाजात फूट पडली आहे. त्यात अनेक जात-समूह विकासापासून वंचित आहेत. आदिवासींचे वास्तव्य पश्‍चिम महाराष्ट्रात नसल्याची माहिती शासन देते. पण आदिवासींचे मूळ स्थानही पश्‍चिम महाराष्ट्र आहे हे पुराव्यानिशी सिद्ध होते. त्यामुळे येथील दुर्बल घटकांनाही आदिवासीचे लाभ मिळाले पाहिजेत.''

अब्दुल रहिम कुरणे म्हणाले की, 'इस्लाम धर्मात समाजातील शांततेला महत्त्व आहे. सर्वांसाठी निसर्ग जसा एक आहे, तसेच समाजातही एकता असली पाहिजे. अशा एकतेतून दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी ताकद वाढणार आहे. त्याचे प्रतीक म्हणून बहुजन समाज एकत्र होऊन मोर्चाला आला आहे.''

आठवलेंना चिमटा
राष्ट्रवादीने आजवर केवळ मतांसाठी सर्वांचा वापर केला आहे. तरीही मराठा समाजातील सर्वसाधारण वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहिला आहे. त्याला आरक्षणाची गरज आहे. तरीही ते मिळाले नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन काहींनी राजकारण केले, दोन्ही समाजाला - मराठा व दलित समाजाला एकत्र आणण्याची भाषा करीत दिल्लीत जाऊन बसले आणि इथल्या लोकांना एकत्र करण्याची भाषा ते करीत आहेत, अशीही त्यांनी नाव न घेता रिपब्लिकन नेते आठवले यांच्यावर टीका केली.

महापुरुषांची वेशभूषा लक्षवेधी
बहुजन क्रांती महामोर्चासाठी कार्यकर्ते गटागटाने येत होते. यात महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केलेले तीन कार्यकर्ते व्यासपीठावर आले. त्यांनी समुदायाला अभिवादन केले.

शिवकाळातही ऍट्रॉसिटी
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात समाजातील दुर्बल घटकावर अन्याय, अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा केली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात ऍट्रॉसिटी कायदा होता. आज मात्र शिवाजी महाराजांचा जयजयकार करणाऱ्यांकडून ऍट्रॉसिटीला विरोध होत आहे. ही विसंगती असल्याचे दिसते, असेही मेश्राम यांनी सांगितले.

दिल्लीत ठरले मुख्यमंत्री
कॉंग्रेसचे हाय कमांड दिल्लीत असते. तेही ब्राह्मणी विचारांचे आहे. त्यांनी आजवर मुख्यमंत्री ठरविले. त्यात वास्तविक मुख्यमंत्री आमदारांच्या मागणीतून ठरायला हवा होता. पण बहुतेक मुख्यमंत्री दिल्लीतील निवडीतून ठरले, असे मराठा हे शासनकर्ते होते. तरीही ते आरक्षण मागत आहेत. याचाच अर्थ सर्व मराठ्यांचा विकास झालेला नाही. मराठा मुख्यमंत्री होऊन ही मराठ्याना आरक्षण मिळालेले नाही, असेही श्री. मेश्राम यांनी सांगितले.

मराठा-ओबीसी वाद
मंडल आयोग लागू केला तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मराठा संघाचे अण्णासाहेब पाटील यांच्याकडे गेला. त्यांनी मंडल आयोग हा विषाचा प्याला असल्याचे सांगून त्याविरोधात संघाला आंदोलन करण्यास भरीस घातले. तेव्हा ओबीसी व मराठ्यांत वाद लावण्याचे काम संघाने केले, असा आरोपही श्री. मेश्राम यांनी केला.

मागण्या मान्य करा, अन्यथा...
बहुजन क्रांती महामोर्चातर्फे केलेल्या मागण्या लवकरच मान्य करा, अन्यथा मुंबईत निघणाऱ्या मोर्चाला सामोरे जा, असा इशारा श्री. मेश्राम यांनी दिला. सत्ता आता तुमच्या हाती आहे. तुम्ही आम्हाला फटके देत आहात. ते फटके आम्ही मोजत आहोत. 2019 ला निवडणुका होतील तेव्हा त्यांच्या दुप्पट फटके तुम्हाला द्यावे लागतील, असेही मेश्राम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com