नगरसेवक शेळकेंवर एसटी गॅंगचा हल्ला 

नगरसेवक शेळकेंवर एसटी गॅंगचा हल्ला 

कोल्हापूर - इतर प्रभागात विकासकामे केल्याच्या रागातून एस. टी. गॅंगच्या गुंडांनी नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यावर खुनी हल्ला केला. गुंडांनी त्यांना दगड आणि लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शेळके आणि त्यांचे मित्र दिलीप भुईंगडे जखमी झाले. शेळके यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मुक्त सैनिक वसाहतीमधील शेळके यांच्या निवासस्थानासमोरच बुधवारी मध्यरात्री दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. आरडाओरड व नागरिकांच्या धावपळीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी एस. टी. गॅंगचा म्होरक्‍या स्वप्नील तहसीलदारचा भाऊ सागर व त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुक्त सैनिक वसाहत प्रभाग क्रमांक 19 मध्ये ताराराणी-भाजप आघाडीकडून राजसिंह भगवानराव शेळके (वय 47) हे निवडून आले आहेत. मुक्त सैनिक वसाहत येथील प्लॉट नंबर 47 मध्ये त्यांचे निवासस्थान आहे. सध्या त्यांच्याकडे ताराराणी मार्केट विभागीय प्रभाग समिती सभापतिपद आहे. त्यांच्या प्रभागाशेजारी शाहू मार्केट यार्ड प्रभाग क्रमांक 20 चे प्रतिनिधित्व सुरेखा शहा करतात. त्यांचा सागर तहसीलदार हा नातू आहे. नगरसेवक शेळके हे समिती सभापती म्हणून आपल्या प्रभागासह इतर प्रभागांचीही विकासकामे करतात. त्यांनी शहा यांच्या प्रभागातील नागरिकांच्या अनेक अडचणी सोडविल्या आहेत. त्याचा राग सागर तहसीलदारला होता. याबाबत त्याने शेळके यांना जाबही विचारला होता. 

मुक्त सैनिक वसाहतमध्येच दिलीप अशोक भुईंगडे (वय 35) राहतात. ते शेळके यांचे मित्र आहेत. भुईंगडे यांचे ते काम करतात. त्या कंपनीत चार दिवसांपूर्वी एकाबरोबर भांडण झाले. याबाबत त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली. हे प्रकरण चर्चेतून सोडवण्याचा आग्रह भुईंगडे यांनी शेळके यांच्याकडे धरला होता. त्याच कामासाठी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते शेळके यांच्या घरी आले होते. त्यांनी शेळके यांना बाहेर बोलावून घेतले. शेळके शर्ट घालत गेटमधून भुईंगडे यांच्यासोबत बाहेर येत होते. दरम्यान तेथे सागर तहसीलदार व त्याचे पाच ते सहा साथीदार मोटारसायकलवर बसून उभे होते. त्यांना पाहून "सागर काय विशेष', असे शेळकेंनी विचारले. त्यावर सागर व त्याच्या साथीदारांनी "भागात लय शहाणपणा चाललाय, तुला बघून घेतो, खल्लास केल्याशिवाय गप्प बसणार नाही', अशी धमकी देत शेळकेंवर हल्ला चढवला. रस्त्यावरील मोठा दगड सागरने शेळके यांना फेकून मारला. तो त्यांनी उजव्या हाताने अडवला. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यापाठोपाठ इतरांनी त्यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. सागरने पुन्हा एक मोठा दगड शेळके यांना मारला. तो त्यांनी चुकवला. मात्र तो दगड भुईंगडे यांच्या तोंडावर बसून त्यात ते जखमी झाले. 

हा प्रकार पाहून शेळके यांच्या पत्नी रसिका धावत रस्त्यावर आल्या. त्यांनी गुंडाच्या तावडीतून शेळके यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश येत नसल्याचे पाहून त्यांनी आरडाओरडा केला. तसे नागरिक जमा झाले. त्यांना पाहून हल्लेखोर पळून गेले. दहा ते पंधरा मिनिटे सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 

नातेवाईकांनी जखमी शेळके व भुईंगडे यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. हा प्रकार समजल्यानंतर नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी तेथे दाखल झाले. दरम्यान तहसीलदार यांचे नातेवाईकही तेथे आले. त्यांनी गुन्हा दाखल करू नका, असे शेळके यांना सांगण्यास सुरवात केली. मात्र शेळके परिवाराने त्याला विरोध केला. यानंतर त्यांनी शेळके यांना उपचारासाठी राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सकाळी शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सागर तहसीलदार व त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्याचे चित्रीकरण शेळके यांच्या घराबाहेरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हल्ल्यात मोटारीवर पडलेले रक्ताचे डाग, हल्ल्यातील दगड पोलिसांना सापडले. त्याद्वारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

हल्लेखोर लवकरच जेरबंद करू 
एस. टी. गॅंगचा म्होरक्‍या स्वप्नील तहसीलदारसह 11 जणांवर खून, मारामारी, गुंडगिरी, दहशत अशा अनेक संघटित गुन्ह्यात मोका अंतर्गत राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. सध्या ते सर्व जण कारागृहात आहेत. तरीही भागात त्यांची दहशत कायम आहे. सागरवर आत्तापर्यंत पोलिस ठाण्यात एकच तक्रार दाखल आहे. सर्व हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करू असे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी सांगितले. 

लोकप्रतिनिधींची उपस्थिती 
नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, राहुल चव्हाण, अजित ठाणेकर, किरण नकाते, शेखर कुसाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवानराव काटे, माजी नगरसेवक राजू कसबेकर आदी लोकप्रतिनिधींनी रुणालयात भेट देऊन शेळके यांची विचारपूस केली. 

मुक्त सैनिक उद्यानातील बल्बही फोडले 
नगरसेवक शेळके यांनी येथील सैनिक उद्यानात बल्ब बसवून उद्यान उजळले आहे; मात्र हे बल्ब याच गुंडांनी फोडले आहेत. त्यामुळे उद्यानात आंधाराचे साम्राज्य पसरले असल्याची चर्चा उपस्थितांकडून सुरू होती. 

शेळकेंच्या पत्नीचे धाडस 
गुंडाकडून पतीवर हल्ला होत असलेले पाहून शेळके यांच्या पत्नी रसिका धाडसाने रस्त्यावर गेल्या. त्यांनी गुंडाच्या तावडीतून पतीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. एका गुंडाला त्यांनी ढकलूनही दिले. पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्यांनी आरडाओरड करून नागरिकांना जमा केले. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यांच्या धाडसामुळे गंभीर प्रसंग टळला. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्ला कैद 
परिसरात वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे नगरसेवक शेळके यांनी काहीच दिवसांपूर्वी निवासस्थानी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यामध्ये मध्यरात्री त्यांच्यावर झालेला खुनी हल्ला कैद झाला. त्यामध्ये हल्लेखोर कोण आणि किती हे ही स्पष्ट झाले. पुढील तपासासाठी पोलिसांना त्याची मदत मिळाली आहे. 

नागरिकांतून संताप 
एक कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित नगरसेवक म्हणून शेळके ओळखले जातात. ते स्वतःच्या प्रभागाबरोबर शेजारच्या प्रभागांच्याही अडचणी तत्परतेने सोडवतात. त्यांचे कोणाशीही वैक्तिगत वैरत्व नाही. त्याचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्यावरच एसटी गॅंगच्या गुंडानी केलेला हल्ला शहाराच्या विकासाला बाधक आहे. अशा गुंडाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com