'विद्यापीठ' शब्द वापरल्यास अभिमत विद्यापीठांना बसणार दणका!

शीतलकुमार कांबळे
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

कारवाई करण्याचे युजीसीला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
 

सोलापूर : देशातील बहुतांश अभिमत विद्यापीठ (डीम्ड युनिव्हर्सिटी) हे "अभिमत' (डीम्ड) शब्द न वापरता फक्त विद्यापीठ असा शब्द वापरत आहेत. अशा विद्यापीठांनी त्यांच्या नावापुढे "अभिमत' शब्द वापरण्याच्या सक्त सूचना युजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) देशातील 123 अभिमत विद्यापीठांना दिल्या आहेत.

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने 3 नोव्हेंबरला युजीसीला सूचना दिल्या आहेत. बहुतांश अभिमत विद्यापीठांना अभिमत विद्यापीठ असा दर्जा दिला असताना ते त्यांच्या नावापुढे विद्यापीठ असा शब्द वापरतात. यामुळे युजीसीच्या कायद्यातील (क्रमांक 23) तरतुदीनुसार अशा अभिमत विद्यापीठावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. युजीसीने या कायद्याला अनुसरून पावले उचलावीत व अभिमत विद्यापीठांना त्यांच्या नावापुढे (फक्त) विद्यापीठ असा शब्द वापरण्यास मज्जाव करावा. अभिमत शब्द न वापरणाऱ्या अभिमत विद्यापीठावर कारवाई करावी, असे सक्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने युजीसीला दिले आहेत. अभिमत विद्यापीठांनी "विद्यापीठ' असा शब्द वापरणे सुरूच ठेवल्यास अशा अभिमत विद्यापीठावर यूजीसी 2016 कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

अशा अभिमत विद्यापीठांनी त्यांच्या नावापुढे कंसामध्ये अभिमत विद्यापीठ असा शब्द वापरावा. तसेच अशा अभिमत विद्यापीठांनी पर्यायी शब्द (विद्यापीठ हा शब्द वगळून) वापरण्याचा प्रस्ताव यूजीसी किंवा मनुष्यबळ विकास विभागाकडे पाठवावा. जेणेकरून मनुष्यबळ विकास विभाग अशा अभिमत विद्यापीठांच्या नावात बदल करू शकेल. या संदर्भात तातडीने पावले उचलून ही प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश युजीसीने दिले आहेत.

विद्यापीठांकडून दिशाभूल
युजीसीकडून "अभिमत विद्यापीठ' असा दर्जा मिळाला असतानाही बहुतांश अभिमत
विद्यापीठे "अभिमत' असा शब्द वापरणे टाळतात. यामुळे युजीसीच्या नियमाचा भंग तर होतोच यासोबतच विद्यार्थ्यांची दिशाभूल होते. अभिमत हा शब्द वगळल्यामुळे शासकीय विद्यापीठे कोणती व अभिमत विद्यापीठे कोणते हे ओळखता येणे अडचणीचे ठरते. यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :