आता तरी मीटर टाका!

आता तरी मीटर टाका!

सातारा - पहिला टप्पा एक किलोमीटरचा करून २० रुपये पहिले टप्पा भाडे निश्‍चित करण्याची रिक्षाचालकांची अनेक दिवसांची मागणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने मान्य केली. मात्र, शहरामध्ये बहुतांश रिक्षाचालक मीटर न टाकताच व्यवसाय करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती आहे. त्यावर अंकुश आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, अन्यथा दरवाढ होऊनही ग्राहकांची पिळवणूक अशीच होत राहील.

पेट्रोल व ऑइलचे वाढते दर, इन्शुरन्स, पासिंगचा वाढलेला खर्च, वाहन देखभालीच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे मीटरनुसार भाडे आकारणी परवडत नाही अशी रिक्षाचालकांची बऱ्याच दिवसांपासून ओरड सुरू होती. वाढत्या खर्चाबरोबर ती होतच असते. त्याबाबत सातारा जिल्हा रिक्षा, टॅक्‍सी, जीप युनियनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या माध्यमातून रिक्षाचालकांचा भाडेवाढीसाठी प्रयत्न सुरू होता. त्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. रिक्षाचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा होता. तो एक किलोमीटरचा करून २० रुपये सुरवातीचे भाडे निश्‍चित करण्याची रिक्षाचालकांची मागणी होती. भाडे निश्‍चितेचे धोरण स्पष्ट होत नसल्यामुळे ही भाडेवाढ रखडलेली होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी नुकताच या भाडेवाढीला ‘हिरवा कंदील’ दाखवला. त्यामुळे रिक्षाचा पहिला टप्पा आता एक किलोमीटरचा झाला आहे. तसेच त्यासाठी २० रुपये दर निश्‍चित झाला आहे. या निर्णयाचे रिक्षाचालकांनी स्वागत केले. उद्यापासून (सोमवार) नव्या दराने मीटरमध्ये आवश्‍यक तो बदल करून घ्यायचा आहे. त्यासाठी ४५ दिवसांची मुदतही रिक्षाचालकांना देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच नव्या नियमानुसार रिक्षाचे भाडे आकारणी सुरू होईल.

रिक्षाचालकांच्या प्रश्‍नाला उपप्रादेशिक परिवहन विभागाने न्याय दिला. आता प्रवाशांच्या प्रश्‍नाकडेही प्रशासन व रिक्षा संघटनांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील कोणत्याच शहरात बहुतांश रिक्षाचालकांकडून मीटरनुसार भाडे आकारणी होत नाही. अडचणीत गाठून प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जाते. एखादा नियम सांगायला गेलाच तर, त्याच्याशी वाद घातला जातो किंवा त्याला भाडे नाकारले जाते. त्यामुळे प्रामुख्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. साताऱ्यात शाहूनगर, शाहूपुरी, रेल्वे स्थानक या भागाकडे जाण्यासाठी तर हमखास जादा भाडे सांगितले जाते. त्यामुळे सातारा-पुणे एसटी प्रवासाएवढे पैसे या भागात जाण्यासाठी मोजावे लागत आहेत. पर्याय नसल्याने नागरिकांना हा भुर्दंड सोसावा लागत आहे.

गेली अनेक वर्षे ग्राहकांची अशा प्रकारे पिळवणूक सुरू आहे. मात्र, उपप्रादेशिक  परिवहन विभाग असो किंवा पोलिस कोणाकडूनही नागरिकांच्या या समस्येवर ठोस तोडगा काढला जात नाही. ग्राहक चळवळीत काम करणाऱ्यांकडूनही याबाबत काही होत नाही. त्यामुळे रिक्षा प्रवाशांना कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रिक्षा संघटनाही भाडे वाढ द्या, मीटरने आकारणी करतो, असे आश्‍वासन प्रत्येक भाडेवाढीच्या मागणी वेळी करत असतात. मात्र, भाडेवाढ झाली की आश्‍वासन ते विसरतात आणि प्रशासनही त्याची जाणीव करून द्यायला कमी पडते. आता रिक्षाचालकांच्या मनाप्रमाणे भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनाही मीटर भाड्याप्रमाणेच प्रवास करता यावा यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. रिक्षा संघटनांनीही त्यात सकारात्मक मदत करणे अपेक्षित आहे.

रिक्षाचालकांची अनेक वर्षांपासून असलेली मागणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने मान्य केली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी मीटरनुसारच भाडे आकारावे. मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी.
- दीपक पवार,  अध्यक्ष, सातारा जिल्हा रिक्षा, टॅक्‍सी, जीप युनियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com