आयुष मंत्रालयाचे कोल्हापुरात केंद्रासाठी प्रयत्न - धनंजय महाडिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

कोल्हापूर - आयुष मंत्रालयाची स्थापना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्याचे केंद्र कोल्हापुरात होण्यासाठी माझे प्रयत्न असतील, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी आज केले. श्री सिद्धगिरी मठ, पूजा ग्रुप आयोजित स्वास्थ मंत्रा या आरोग्य तपासणी उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती होते. या वेळी सिद्धगिरी मठाचे अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराज तसेच प्रदीप भिडे, पारस ओसवाल उपस्थित होते.

खासदार महाडिक म्हणाले, 'स्वास्थ मंत्रा हा खूपच छोटा उपक्रम आहे. तो दरवर्षी भरविण्यासाठी आणि त्याला मोठे स्वरूप देण्यासाठी माझा प्रयत्न असेल. नुकताच पंतप्रधान मोदी यांनी आयुष मंत्रालय स्थापन केले आहे. त्याचे केंद्र कोल्हापुरात आणण्यासाठी नक्कीच माझा प्रयत्न असेल. यासाठी केवळ सरकारने सर्व काही केले पाहिजे असे होऊ नये. तुम्ही आम्ही मिळून हा उपक्रम कोल्हापुरात राबवू. यासाठी दहा-पंधरा एकर जमीन पाहिजे ती उपलब्ध करू.''

काडसिद्धेश्‍वर महाराज म्हणाले, 'जगात माणूस सुखाने जगायचा असेल तर त्याचे आरोग्य चांगले पाहिजे. त्यासाठी अध्यात्म पाहिजे. अध्यात्म म्हणजे केवळ जप, तप, धार्मिक कार्य नव्हे तर मन आणि शरीर यांचा ताळमेळ असणे. जे मनाला पाहिजे तेच शरीराला पाहिजे, तरच कोणताही मनुष्य समाधानी राहू शकतो. अनेक वैद्यांकडे चांगले उपचार आहेत. त्याचे वैशिष्ट्य ते सांगत नाहीत. असेच होत राहिले तर हे ज्ञान पुढील पिढीला मिळणार कसे ? यासाठी अशा सर्वांना एकत्रित करून एक मोठा समूह तयार केला पाहिजे. त्याचा उपयोग सर्वांना झाला पाहिजे. जे खाऊ नये ते चांगलेच आहे म्हणून आपण आज खात आहे. म्हणूनच फक्त कोल्हापूर जिल्ह्यात रोज तीन हजार ऑपरेशन्स्‌ होत आहेत. हे टाळण्यासाठी वैद्यांची आणि स्वास्थ मंत्रांची आवश्‍यकता आहे.''

कोल्हापुरात आयुर्वेदाचे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे. जे चांगले तेच लोकांना खाण्यास मिळावे, यासाठी जनजागृती झाली पाहिजे. ती अशा उपक्रमांतूनच होणार असल्याचे मत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले. पूजा ग्रुपचे पारस ओसवाल यांनी प्रास्ताविकात उपक्रमाचे महत्त्व सांगितले.

तीन दिवस चालणाऱ्या आरोग्य तपासणी उपक्रमात आयुर्वेदातील औषधांचे विविध उपचार सांगण्यात येत आहेत. यावेळी डॉ. सुनील पाटील यांच्यासह इतर वैद्य उपस्थित होते.

टीव्ही म्हणजे...
"टी' म्हणजे तातडीने आणि "व्ही' म्हणजे वाटोळे. तातडीने वाटोळे करते ती म्हणजे टीव्ही. तेथे चांगले काय सुरू असले तर सगळे ब्रेक घेतात. कोणी मयत झालं तरीही टीव्हीवरील सीरिअल संपल्यानंतर येतात. हे चुकीचे चालले आहे, असेही काडसिद्धेश्‍वर महाराजांनी सांगितले.