तर `आयसीआयसीआय`चे व्यवहार बंद पाडू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

कोल्हापूर - संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेत द्या. वाटप यंत्रणेतील त्रुटी एका महिन्याच्या आत दूर न केल्यास जिल्ह्यात आयसीआयसीआय बॅंकेची एकही शाखा सुरू करू देणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिला. कागल तालुक्‍यातील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन विभागीय प्रमुख गोपाळ उन्हाळे यांना दिले. 

कोल्हापूर - संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेत द्या. वाटप यंत्रणेतील त्रुटी एका महिन्याच्या आत दूर न केल्यास जिल्ह्यात आयसीआयसीआय बॅंकेची एकही शाखा सुरू करू देणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिला. कागल तालुक्‍यातील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन विभागीय प्रमुख गोपाळ उन्हाळे यांना दिले. 

कागल तालुक्‍यातील संजय गांधी, श्रावणबाळ आदी पेन्शन योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळावा, त्यांच्या पैशाची व वेळेची बचत व्हावी, यासाठी विशेष सहायक विभागांतर्गत अधिकार आयसीआयसीआय बॅंकेला दिले. त्यांनी ‘फिनोपेटेक’ नावाच्या एजन्सीमार्फत याचे काम सुरू केले. मात्र गेल्या वर्षभरापासून लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे जुळत नसल्याचे कारण पुढे करत एजन्सीने अनुदानास नकार देण्यास सुरवात केली. याबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आज कागल तालुका राष्ट्रवादीतर्फे बागल चौकातील आयसीआयसीआय बॅंकेवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

आमदार मुश्रीफ यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्यासमोर त्यांनी विविध योजनांतील वयोवृद्ध लाभार्थ्यांच्या अडचणी मांडल्या. 

योजनेचा लाभ ६५ वर्षांवरील नागरिकांना मिळतो. कागल तालुक्‍यात बॅंकेच्या शाखा नसल्याने अनुदानाचे सहाशे रुपये आणण्यासाठी लाभार्थ्यांना लांबपर्यंत हेलपाटे मारावे लागत होते. त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात होते. बायोमॅट्रिक पद्धतीने लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन अनुदान देण्यासाठी आयसीआयसीआय बॅंक पुढे आली. ही बॅंक ‘फिनोपेटेक’ या एजन्सीच्या माध्यमातून हे काम करते. मात्र अनुदानाची रक्कम सार्वजनिक ठिकाणी वाटप केली जात नाही, लाभार्थ्यांच्या अंगठ्यांचे ठसे जुळत नाहीत, असे सांगून अनुदान रोखले जात आहे. ही रक्कम फिनोपेटेक वापरते की बॅंक याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अनुदान देण्यासाठी आधारकार्ड,  तलाठी अगर शासकीय अधिकाऱ्याच्या दाखल्याच्या आधारे पैशाचे वाटप करा. एका महिन्याच्या आत त्रुटी दूर न केल्यास बॅंकेची एकही शाखा जिल्ह्यात सुरू करू देणार नाही, असा इशारा आमदार मुश्रीफ यांनी या वेळी दिला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, कागल तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, माजी अध्यक्ष प्रताप ऊर्फ भय्या माने, मनीषा पाटील, मनोज फराकटे, माणिक माळी, विकास पाटील, नितीन दिंडे, बाळासाहेब तुरंबे, रमेश तोडकर, राजेंद्र माने आदी उपस्थित होते.

Web Title: Bank officials warned the Hasan Mushrif