बॅंकांकडे ‘छप्पर फाड के’ पैसा

अजित झळके 
गुरुवार, 25 मे 2017

सांगली - केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केली आणि घराघरांतील पैसा बॅंकेत जमा व्हायला लागला. परिणामी, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बॅंकांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे १५०० कोटी रुपयांनी वाढला आहे. बॅंकांकडे ‘छप्पर फाड के’ पैसे जमा झाले आहेत. 

सांगली - केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केली आणि घराघरांतील पैसा बॅंकेत जमा व्हायला लागला. परिणामी, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बॅंकांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे १५०० कोटी रुपयांनी वाढला आहे. बॅंकांकडे ‘छप्पर फाड के’ पैसे जमा झाले आहेत. 

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात या ३६ बॅंकांकडे १४ हजार ९६ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. यंदा त्यात ८९४ कोटी रुपयांची वाढ झाली असून, यावर्षी या बॅंकांकडे १४ हजार ९९० कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ही वाढ सुमारे ६.३२ टक्के इतकी आहे. नागरी सहकारी बॅंकांची गतवर्षीची आकडेवारी उपलब्ध नसली तरी त्यांच्या एकूण आकड्यांत सुमारे सहाशे ते सातशे कोटींची वाढ होऊन तो आकडा ३ हजार ७१६ कोटी रुपयांवर पोचला आहे. ही सर्वच बॅंकांतील ठेववाढ लक्षणीय असल्याचे मत अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आर. एस. पुजारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यातील अग्रणी बॅंकेकडील ३६ बॅंका आणि सांगली जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशनकडे नोंद २० पैकी १७ बॅंकांतील ठेवींचा तपशील ‘सकाळ’ने उपलब्ध केला. त्यातील ठेवींच्या आकड्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्याचे स्पष्ट होते.

यांच्याकडे हजार कोटींवर ठेवी
 बॅंक ऑफ इंडिया - २३८३ कोटी २९ लाख 
 बॅंक ऑफ महाराष्ट्र - ११७२ कोटी ८१ लाख
 स्टेट बॅंक - २२३४ कोटी ७१ लाख
 युनियन बॅंक - १०९६ कोटी ७९ लाख
 जिल्हा मध्यवर्ती बॅंक - ४४४५ कोटी ४४ लाख
 राजारामबापू बॅंक - १५६६ कोटी ८७ लाख

कर्ज वाटपात वाढ
अग्रणी बॅंकेकडील एकूण ३६ बॅंकांकडून २०१५-१६ या आर्थिक वर्षात १०६४९ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यंदा ते वाढून १११७५ कोटी रुपये इतके झाले आहे. म्हणजेच कर्जवाटपात ५२६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 

फक्त जिल्हा बॅंक अडकली
जिल्ह्यातील अन्य सर्व बॅंकांमध्ये जमा झालेल्या ठेवी रिझर्व्ह बॅंकेने जमा करून घेण्याचे आदेश दिले आणि त्या जमाही झाल्या. फक्त जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे नोटाबंदीनंतरच्या काळात जमा झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा जमा करून घेतल्या गेल्या नाहीत. असे ३१५ कोटी रुपये जिल्हा बॅंकेत पडून आहेत.