व्हा टेक्‍नोसॅव्ही, ठेवा घर सुरक्षित

व्हा टेक्‍नोसॅव्ही, ठेवा घर सुरक्षित

सांगली-मिरजेत घरफोड्यांनी पोलिस आणि नागरिकांना चक्रावून सोडले असताना सुरक्षेसाठी वेगवेगळ्या साधनांची निकड अधोरेखित झाली आहे. घरात चोरी झाल्यानंतर नशिबाला दोष देत बसण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाय करणे हा शहाणपणा ठरू शकतो. घरे, अपार्टमेंट, बॅंका आणि व्यावसायिक संस्थांनी ही सुरक्षासाधने बसवून घ्यावीत, असे आवाहन पोलिसांनीही केले आहे. पाचपासून पंचवीस हजारांपर्यंतची विद्युत व इलेक्‍ट्रॉनिक साधने बाजारात सध्या उपलब्ध आहेत. त्यातील काही प्रमुख साधनांची ओळख.

शटर कॉप
फ्लॅट, दुकाने, गोदामे, बॅंका आणि कारखान्यांच्या सुरक्षिततेसाठी हे सर्वोत्तम उपकरण आहे. दरवाजाच्या आतील बाजूस ते बसवले जाते. दरवाजा तीन-चार इंच जरी उघडला गेला तरी ते कार्यान्वित होते. कर्णकर्कश्‍श सायरन वाजू लागतो. घरमालकाने येऊन बंद करेपर्यंत तो वाजतच राहतो. किमान एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू येतो. उपकरण चावीने सुरू करून घरमालक निर्धास्त बाहेर जाऊ शकतो. हे उपकरण चुकीचा अलार्म देत नाही. 

व्हिडिओ डोअर फोन 
घराबाहेर आलेल्या प्रत्येकाची नोंद ठेवणारे हे उपकरण. दरवाजावरील बेलसोबत ते बसवता येते. घरातील स्क्रीनला ते जोडले जाते. एखाद्या अनाहुताने बेल वाजवल्यास आतील स्क्रीनवर त्याचे छायाचित्र दिसते. ते पाहून दरवाजा उघडायचा किंवा नाही याचा निर्णय आतील व्यक्ती घेऊ शकते. दोन हजार छायाचित्रे संकलित करून ठेवण्याची या उपकरणाची क्षमता आहे.

रिमोट कॉप 
घराचे सर्व दरवाजे ॲटोमॅटिक लॉक करण्यासाठी हे उपकरण वापरले जाते. बाहेर जाताना रिमोटने दरवाजे लॉक केले जातात. वेगवेगळ्या दहा फोन क्रमांकांशी ही यंत्रणा जोडलेली असते. चोरट्याने घरात घुसून दरवाजा तोडताच ही यंत्रणा सतर्क होते. घरमालकाने निश्‍चित केलेल्या दहा क्रमांकांवर एका सेकंदात निरोप जातो. पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक कार्यालय असे तातडीचे दहा क्रमांक या यंत्रणेत देता येतात. त्यामुळे आपण घरी नसलो तरी घरातील या घडामोडींची माहिती पोलिसांना आपोआप दिली जाते.  

वायरलेस पीआयआर सेन्सर
घरात विशिष्ट ठिकाणी हे सेन्सर बसवले जातात. ही यंत्रणा सुरू करून निर्धास्त बाहेर जाता येते. सेन्सरमधून निघणारे किरण घरात वावरणाऱ्याची नोंद घेतात व क्षणात सायरन वाजू लागतो. मालकाने येऊन बंद करेपर्यंत तो वाजतच राहतो. मांजर, घुशी, उंदीर अशा प्राण्यांची मात्र तो दखल घेत नाही. मानवी रक्ताच्या तापमानावर काम करत असल्याने कक्षेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतो. क्ष किरण तत्त्वावर कार्य करतो. 

अनेक उपकरणे
बॅंका, पतसंस्था, सराफी दुकाने, रोख भरणा केंद्रे, सदनिका, बंगले, दुकाने, कार्यालये, संस्था,  प्रयोगशाळा, कार्यशाळा आदींच्या सुरक्षिततेसाठी  बाजारात अनेक स्वयंचलित उपकरणे उपलब्ध आहेत. त्यांच्या किमतीही आवाक्‍यात आहेत. सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चलती असली तरी ते गुन्हा रोखू शकत नाहीत. मिरजेतील एका ज्वेलर्समध्ये चोरी करताना चोरट्यांनी कॅमेऱ्यांनाही गंडवले. कॅमेऱ्यांचे छायाचित्रण उच्च दर्जाचे नसल्याने चोरट्यांचे चेहरे कॅमेऱ्यात दिसत नाहीत. काही बाबतीत चेहरे स्पष्ट होऊनही चोरट्यांचा माग लागलेला नाही. 

या पार्श्‍वभूमीवर चोरटे आत येताक्षणी अलार्म देणारी उपकरणे कॅमेऱ्यापेक्षा अधिक फायद्याची ठरतात. शॉक देणारी सुरक्षा बॅग, आगीची सूचना देणारी बिनतारी यंत्रणा, स्टाँगरूम अलार्म यंत्रणा, दूरध्वनीद्वारे चोरीची क्षणात माहिती देणारा सिक्‍युरिटी ॲटोडायलर अशी अनेक साधने बाजारात सध्या उपलब्ध आहेत. त्यांची विक्री आणि विक्रीपश्‍चात सेवा देणाऱ्या संस्था सांगली-कोल्हापुरात आहेत. चोरी-घरफोडी होताच पोलिस आणि नशिबाला दोष देत बसण्याऐवजी या उपकरणांचा अंगीकार करणे अधिक शहाणपणाचे आहे.

गोड गैरसमज
आमच्या घरात यापूर्वी कधीच चोरी झालेली नाही. त्यामुळे आम्हाला या साधनांची गरज काय, असा सर्वसामान्य प्रश्‍न असतो; मात्र घटना घडून गेल्यानंतर उपकरणांचे मोल स्पष्ट होते. पोलिस यंत्रणेच्या मर्यादा, विस्तारत्या रहिवासी वसाहती, अनोळख्या लोकांचा शहरात वाढता वावर, फ्लॅट संस्कृतीमुळे शेजाऱ्यांशी घटता संपर्क या पार्श्‍वभूमीवर स्वतःच्या सुरक्षेची काळजी स्वतःच घेण्याची निकड अधिक जाणवू लागली आहे. मोबाईल कसा वापरायचा याची माहिती नसणारेही पन्नास हजारांचा महागडा मोबाईल घेताना दिसतात; त्या तुलनेत सुरक्षेसाठी पाच-दहा हजारांचा खर्च म्हणजे नक्कीच शहाणपणाचा ठरू शकतो.

पोलिसांचेही आवाहन
सुरक्षिततेसाठी स्वयंचलित साधने बसवून घेण्याचे आवाहन पोलिसांनीही वारंवार केले आहे. मिरज-सांगलीत सराफांची बैठक घेऊन या साधनांची वेळोवेळी माहितीही दिली आहे. तंत्रज्ञानात लक्षणीय सुधारणा होत असल्याने ही साधने कसोटीला उतरली आहेत. सकाळी दुकान उघडताना चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिस ठाण्यात धाव घेण्यापेक्षा सुरक्षायंत्रणा बसवून घ्या आणि रात्रभर शांतचित्ताने झोप घ्या, असे पोलिसांचे आवाहन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com