बेळगाव : आयटी पार्क व्हावे पर्यावरणही जपावे

तुर्कमट्टीत पर्यावरणप्रेमींचा विरोध
Environment
Environment

दुर्मिळ वनस्पती, पशुपक्ष्यांचा अधिवास नष्ट होणार

राजधानी बंगळूरप्रमाणे बेळगावात माहिती व तंत्रज्ञानाचा (आयटीबीटी) पाया भक्कम करण्यासाठी राज्य सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. संरक्षण विभागाच्या अखत्यारितील तुर्कमट्टी येथील जमीन संपादित करण्याची तयारी आहे. मात्र, भूसंपादनाला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. जमीन हस्तांतर आणि त्याठिकाणी आयटी पार्क निर्मितीला आक्षेप घेतला आहे. निसर्गसौंदर्य, वनसंपदा, दुर्मिळ वनस्पती आणि वन्यप्राणी, पक्ष्यांचा तेथे अधिवास आहे. या स्वरुपाच्या जागेवर आयटी पार्क निर्मिती केल्यास वनसंपदा नष्ट होईल. पर्यावरण समतोल बिघडेल, असा आरोप करून भूसंपादनाला आक्षेप घेतला आहे. यामुळे आयटी पार्क भूसंपादनाची प्रक्रिया चिघळण्याची शक्यता आहे.

- महेश काशीद

तुर्कमट्टीत आयटी पार्कचा प्रस्ताव

तुर्कमट्टीतील सुमारे ७५० एकर जमीन लष्कराच्या अखत्यारित आहे. या जमिनीचे हस्तांतर राज्य सरकारकडे करण्याची मागणी आहे. आयटी पार्क निर्मितीमुळे आयटी क्षेत्राचा पाया भक्कम होईल. इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर, एरोस्पेससह सुटे भाग उत्पादन उद्योगांना चालना मिळेल. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाजवळ (सर्व्हे क्र. १३०४, १३९७) ठिकाण असल्यामुळे विकासाला फायदेशीर ठरेल.

वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर घाला

तुर्कमट्टीला विपुल वनसंपदा, निसर्गसौदर्य, दुर्मिळ वनस्पती, वन्यजीव व प्राण्यांचा अधिवास आहे. हा परिसर हिरवळीने नटला आहे. येथे आयटी पार्क निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मोठ्या स्वरुपामध्ये येथील झाडांची कत्तल होईल. वनप्रदेश नष्ट होईल. उष्मा वाढेल व पर्यावरण समतोल ढासळेल, असा आरोप आहे. शहरात आयटी पार्कमुळे वाहनांची वर्दळ वाढेल. प्रदूषणात भर पडेल. असा सूर आहे.

राजकीय, प्रशासकीय हालचाली

तुर्कमट्टीतील जमीन संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असल्यामुळे याबाबतच्या हालचाली दिल्लीतून सुरु आहेत. केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी, खासदार इरण्णा कडाडी व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची दिल्लीत २ दिवसांपूर्वी भेट घेऊन भूसंपादन व योजनेकडे लक्ष वेधले आहे. उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण, आमदार अभय पाटील यांनीही राजनाथसिंहांची भेट घेतली होती.

देसूरमधील प्रस्ताव पडला मागे

आयटी पार्कचा निर्मितीचा पहिला प्रस्ताव नाही. २००८-०९ पासून हालचाली सुरु आहेत. शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देसूरला प्रकल्पाची निर्मिती होणार होती. त्यासाठी सुमारे ४२ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, तेथे रस्ते, वीज, पाणी व इतर मूलभूत सुविधा नसल्यामुळे गुंतवणूकदारांनीही पाठ फिरवली. यामुळे प्रस्ताव मागे पडला.

सुवर्णसौधचा प्रस्ताव पाडला हाणून

बेळगावात सुवर्णसौध निर्मितीसाठी २०१०-११ मध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठजवळचा परिसर, व्हॅक्सीन डेपो व तुर्कमट्टी भागामधील जागेची पाहणी करण्यात आली होती. यापैकी चन्नम्मा विद्यापीठाचा परिसर महाजन अहवालानुसार महाराष्ट्रात जाऊ शकतो, या भितीपोटी प्रस्ताव रद्द केला. व्हॅक्सीन डेपो परिसर निसर्गसौंदर्यानी नटलेला आहे, या कारणांनी तेथील प्रस्ताव रद्द केला. तर तुर्कमट्टी येथील जागा संरक्षण मंत्रालयाची आहे. त्यासाठी लष्कराने भूसंपादनाला आक्षेप घेऊन या प्रस्तावाची माहिती मिळताच तेथे लष्कर छावणी उभारली. यामुळे अखेर हालगा-बस्तवाडला सुवर्णसौध उभारले.

आयटी पार्कला विरोध नाही. मात्र, त्यासाठी निवडलेली जागा अयोग्य आहे. वृक्षवल्ली व हिरवळीने नटलेल्या भागात आयटी पार्क आल्यास विपुल वनसंपदा नष्ट होईल. हरितपट्ट्याचा ऱ्हास होईल. तसेच पर्यावरण प्रदूषण वाढेल. अलीकडे बेळगाव दक्षिण सामान्य, कॅम्पला मध्यम हवामानाची अनुभूती येत आहे. त्यापेक्षा वाईट स्थिती येथील भागावर ओढवेल. त्यामुळे आयटी पार्कसाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याबाबत निवेदन देणार आहे. रहिवाशांची बैठक आयोजिली जाणार आहे.

- ॲड. एन. आर. लातूर, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com