महाराष्ट्र एकिकरण समिती नेत्यांना गरज आत्मभानाची!

जितेंद्र शिंदे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

बेळगाव - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने सर्वच राजकीय पक्षांत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शक्तिप्रदर्शन होत आहे. अशात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत पुन्हा बेकीचीच चिन्हे दिसत असून आपलेच म्हणणे खरे, असे ठासून सांगण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील मराठी जनता पुन्हा वाऱ्यावर पडण्याची भीती असून मराठीसाठी राबणाऱ्या सर्वच नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

असे म्हणतात की, काळ हा सर्वात मोठे औषध असते. त्यामुळे सुमारे आठ वर्षांपूर्वी म. ए. समितीत पडलेली दरी कमी होणे सर्वांच्याच हिताचे होते. पण, समितीच्या एका गटाने एकीसंदर्भात घेतलेल्या बैठकीत बेकीचा सूरच अधिक दिसून आला. जनतेच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज असताना काहींनी वादाला वैयक्तिक राजकीय स्वरूप दिल्याचे दिसून आले. काहींनी संयमाची भूमिका घेऊनही त्यांना फारसे महत्त्व देण्यात आले नाही. गेल्या आठ वर्षांपासून दोन्ही बाजूंनी असाच प्रकार घडताना दिसतोय. त्यामुळे संघटना वाढीस मर्यादा येत असून याचा लाभ राजकीय पक्षांना झाल्याचे तालुका, जिल्हा, एपीएमसी निवडणुकांत दिसून आले आहे. राष्ट्रीय पक्षांनी आगामी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. समितीतील कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे काम सुरू आहे. दोन्ही गटाचे दुसऱ्या,

तिसऱ्या फळीतील काही कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षात सामील झाले आहेत. काही कट्टर म्हणवून घेणारे किंबहुना ज्यांच्यामुळे समितीत फूट पडली असे नेते राष्ट्रीय पक्षांच्या वरिष्ठांबरोबर गळ्यात गळे घालताना दिसताहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना संभ्रमावस्थेला सामोरे जावे लागत आहे. अस्तित्वाच्‍या लढाईत आमिषांचा पाऊस पडत असून समिती नेत्यांना आत्मभान कधी येणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

राजकारणच नको; समस्याही पाहा
निवडणुकीमुळे आतापासूनच आरोप-प्रत्यारोपांना ऊत येण्याची चिन्हे आहेत. सोमवारच्या बैठकीपासून ते सुरू झाले आहे. पण मराठी लोकच आपापसात आरोप-प्रत्यारोप करत राहावेत आणि आपण मते पदरात पाडून संधी साधावी, असे इतर पक्षांना वाटते. गेल्या दोन्ही वेळच्या विधानसभा निवडणुकीत हेच घडत आले आहे. त्यामुळे मराठीच्या राजकारणात नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होण्याची भीती असून राष्ट्रीय पक्षांना नमवायचे असल्यास आपापसांतील भांडण थांबवून एकजुटीने उभारण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही.