बेळगाव जिल्ह्यात ‘नो क्रॉप’ उताऱ्यांवर पीक नोंद सुरु

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

बेळगाव -  मोबाईल ॲपद्वारे पीक सर्वेक्षणाला आजपासून (ता. ७) जिल्ह्यात सुरुवात झाली. सर्वेक्षणानंतर ही माहिती सातबारा उताऱ्यावर नोंद केली जाणार आहे. त्यामुळे, ‘नो क्रॉप’ लिहिलेल्या उताऱ्यांवर शेतकरी घेत असलेल्या पिकांची नोंदणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ७५० सर्वेक्षकांची नियुक्ती केली आहे.

बेळगाव -  मोबाईल ॲपद्वारे पीक सर्वेक्षणाला आजपासून (ता. ७) जिल्ह्यात सुरुवात झाली. सर्वेक्षणानंतर ही माहिती सातबारा उताऱ्यावर नोंद केली जाणार आहे. त्यामुळे, ‘नो क्रॉप’ लिहिलेल्या उताऱ्यांवर शेतकरी घेत असलेल्या पिकांची नोंदणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ७५० सर्वेक्षकांची नियुक्ती केली आहे.

पिके घेत असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ‘नो क्रॉप’ असल्याने अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे विरोध दर्शविला होता. त्यातच बॅंकांनीही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे टाळले होते. ही समस्या दूर करण्यासाठी आता कृषी खात्याने पीक सर्वेक्षण हाती घेतले आहे. याला राष्ट्रीय माहिती केंद्राची (एनआयसी) मदत मिळणार आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीकसर्वेक्षकांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले असून, यात मोबाईल ॲपचा कसा वापर केला जावा, याची माहिती दिली गेली आहे. शनिवारपासून पीक सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाणार आहे. यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या पीकसर्वेक्षणात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. सर्वेक्षक अंदाज बांधून आपले सर्वेक्षण करत होते. काही वेळेस शेतीला भेट न देताच काम पूर्ण केले जात होते. मात्र, ही समस्या आता दूर झाली आहे. मोबाईल ॲपवर सचित्र माहिती अपलोड करावयाची असल्याने सर्वेक्षकांना प्रत्येक ठिकाणी भेट देऊन माहिती संकलित करावी लागणार आहे.

जिल्ह्यात वनप्रदेशासह एकूण १३ लाख हेक्‍टर क्षेत्र असून १,१८१ गावे आहेत. यात सुमारे ७.३ लाख हेक्‍टर क्षेत्रावर पीक घेतले जाते. या सर्व जमिनींमधील पीकसर्वेक्षण हाती घेतले जात आहे. त्यासाठी ‘क्रॉप सर्व्ह’ नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. त्यावर पीक पाहून, त्याची माहिती सर्वेक्षकांना नोंद करावी लागेल. पीक नसलेल्या जमिनीची नोंद पडीक जमीन म्हणून करण्याचीही सोय ॲपमध्ये आहे. सर्वेक्षणासाठी ७५० कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. या सर्वांवर कृषी, फलोत्पादन, रेशीम खात्याच्या ३५ ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येकी पाच रुपये मानधन दिले जाणार आहे.

क्रॉप सर्व्ह ॲपमुळे शेतातील पिकांच्या संपूर्ण माहितीचे डिजिटलायजेशन होणार आहे. त्याद्वारे भूदाखल्यावरही स्पष्टपणे पिकांची नोंद करता येणार आहे. शनिवारपासून पीक सर्वेक्षण सुरू होईल. मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलित होणार असल्याने यात अधिक त्रुटी राहणार नाहीत. 
- वेंकटरायरेड्डी, सहसंचालक, कृषी विभाग.