चिक्कोडी तालुक्यात वसतिगृह विद्यार्थिनींची सुरक्षा रामभरोसे

राजेंद्र कोळी
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

चिक्कोडी - तालुक्‍यात समाजकल्याण खात्याच्या वतीने मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकनंतरचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती-जमातींतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी १६ वसतिगृहे चालविली जात आहेत; पण तेथे आवश्‍यक कर्मचारी भरण्यात आले नसल्याने गैरसोय होत आहे. तालुक्‍यात या खात्यात १०७ पैकी तब्बल ६८ पदे रिक्त आहेत.

चिक्कोडी - तालुक्‍यात समाजकल्याण खात्याच्या वतीने मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकनंतरचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती-जमातींतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी १६ वसतिगृहे चालविली जात आहेत; पण तेथे आवश्‍यक कर्मचारी भरण्यात आले नसल्याने गैरसोय होत आहे. तालुक्‍यात या खात्यात १०७ पैकी तब्बल ६८ पदे रिक्त आहेत. खात्याकडून कंत्राटी कामगारांचा वापर केला जात आहे. रात्री रखवालदाराअभावी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

समाजकल्याण खात्याच्या वतीने तालुक्‍यात अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी सदलगा, निपाणी, कब्बूर, नेज, केरूर, हुन्नरगी, चंदूर, चिंचणी, बेडकिहाळ व चिक्कोडीत प्रत्येकी दोन वसतिगृहे चालविली जात आहेत. सोळा वसतिगृहांत १११० विद्यार्थ्यांच्या निवासाची मोफत सोय आहे; तर प्रत्यक्षात या वसतिगृहासोबत एससी व एसटी समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात; पण या खात्यातील १०७ पैकी तब्बल ६८ पदे रिक्त आहेत. 

रात्रपाळी सुरक्षारक्षकांच्या १६ जागा मंजूर असून सर्व पदे रिक्त आहेत. चिक्कोडी, सदलगा, शिरदवाड येथे एकूण ४ विद्यार्थिनींची वसतिगृहे आहेत. रात्रपाळीत सुरक्षारक्षकांची नितांत गरज असतानाही ही पदे रिक्त असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

समाजकल्याण खात्याच्या चिक्कोडी येथील कार्यालयातही द्वितीय दर्जा साहाय्यक व लिपिक अशा २ जागा रिक्त आहेत. खात्याच्या वसतिगृहांसाठी सिनिअर वॉर्डनची ३ व ज्युनिअर वॉर्डनची १३ अशी १६ पदे मंजूर असून सिनिअर वॉर्डनची तिन्ही पदे भरण्यात आली आहेत. तर ज्युनिअर वॉर्डनच्या १३ पैकी ११ पदे भरण्यात आली असून २ पदे रिक्त आहेत. स्वयंपाक कर्मचाऱ्यांची ३५ पदे मंजूर आहेत. त्यांतील केवळ १५ पदे भरली आहेत. स्वयंपाक साहाय्यकांची ३१ पदे मंजूर असून केवळ ३ जण कार्यरत तर २८ पदे रिक्त आहेत. 

अनुसूचित जाती-जमातींसाठी चिक्कोडी तालुक्‍यात १६ वसतिगृहे चालविली जात असून, १०७ पैकी केवळ ३९ पदे भरण्यात आली आहेत. ६८ पदे रिक्त असून, त्यासाठी कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली आहे.  
- एस. एस. बडीगेर, 

सहायक संचालक, समाजकल्याण खाते