सीमाप्रश्‍नी मुख्यमंत्री-केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार: मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा 
रात्री नागपूरकडे परतताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची म. ए. समिती नेत्यांनी पुन्हा भेट घेतली. त्यावेळी सीमाप्रश्‍नी समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी सीमाप्रश्‍नी दिल्लीतील ज्येष्ठ वकिलांची भेट घेणार आहे, अशी माहिती शिष्टमंडळाला दिली. 

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सोडवणुकीसाठी आपण मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असून मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे केंद्रातील मंत्री यांची लवकरच बैठक बोलावण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिली. 

कोल्हापूर दौऱ्याला आलेले मंत्री मुनगंटीवार हे नागपूरहून विशेष विमानाने सोमवारी (ता. 21) बेळगावात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्‍नी चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाच्या वतीने मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकारने अतिशय सजगपणे कार्य करणे आवश्‍यक आहे. केंद्र सरकारचे वकील आपली भूमिका कशी बदलत आहेत, याची माहिती मंत्री मुनगंटीवार यांना देण्यात आली. सीमाभाग केंद्रशासित करावा, यासाठी मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या तज्ज्ञ समिती सदस्य व अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतील निर्णयांबाबत त्यांना माहिती देण्यात आली. त्यासंबंधिचे कागदपत्रे दाखविण्यात आले. लवकरात लवकर हा प्रश्‍न निकाली निघावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे केंद्र सरकारमधील मंत्री यांची बैठक होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने केली. 

सीमाप्रश्‍नी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर केंद्रीय मंत्र्यासोबत होणाऱ्या बैठकीला आपण समिती नेत्यांना निमंत्रण देऊ, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी दिल्लीतील ज्येष्ठ वकिलांच्या बैठकीवेळी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी, कायदा विभागाचा अधिकारी उपस्थित राहावा, अशी विनंतीही त्यांना करण्यात आली. 
शिष्टमंडळात आमदार अरविंद पाटील, मालोजी अष्टेकर, ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे, जगन्नाथ बिर्जे, गोपाळ देसाई आदी उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा 
रात्री नागपूरकडे परतताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची म. ए. समिती नेत्यांनी पुन्हा भेट घेतली. त्यावेळी सीमाप्रश्‍नी समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी सीमाप्रश्‍नी दिल्लीतील ज्येष्ठ वकिलांची भेट घेणार आहे, अशी माहिती शिष्टमंडळाला दिली.