विद्यार्थ्यांना रांगेतून प्रवेश; प्रवाशांचे खिडकीतून आरक्षण!

भुईंज - स्थानकात बसमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी लावलेली रांग.
भुईंज - स्थानकात बसमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी लावलेली रांग.

भुईंज - बस स्थानकात येताच अनेक प्रवासी खिडकीतून हलके साहित्य टाकून जागा पकडतात. मात्र, लहान विद्यार्थ्यांना ते शक्‍य होत नाही. त्यातूनही एखादा विद्यार्थी तेथे पोचलाच तर वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. त्यातूनही एखाद्याच विद्यार्थ्याला बसण्यासाठी जागा मिळते. अन्य विद्यार्थ्यांना रांगेप्रमाणेच एसटीतही उभे राहूनच प्रवास करावा लागतो. जादा फेऱ्या सोडून ही समस्या सोडण्याबाबत विचार होण्याची आवश्‍यकता दिसते. 

बसमध्ये एखादी वस्तू टाकून जागा निश्‍चित करणारे प्रवासी व मोठ्या गर्दीत रांगेत वाट काढत जागा मिळविणारे विद्यार्थी यांच्यात सतत वाद होतात. या वादामुळे अनेकदा बस सुटण्यास उशिर होतो. वाद चिघळला तर बस पोलिस स्टेशनला न्यावी लागते. त्यामुळे एसटीचा वेळ व पैसा वाया जातो, प्रवाशांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागते. हे प्रकार एसटीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याची गरज आहे. बस स्थानकात एसटी उभी करण्यापूर्वीच त्या बसच्या खिडक्‍यातून साहित्य टाकणाऱ्यांवर कारवाई करावी वा बसमध्ये चढण्यासाठी त्यांनाही रांगेत उभे राहण्यास भाग पाडावे, यासाठी बस स्थानकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक नियंत्रकाने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. रांगेतून बसमध्ये प्रवेश करण्यास प्रवाशांनाही भाग पाडावे. दांडगाईने खिडकीतून साहित्य टाकणाऱ्यांना बसमध्ये प्रवेश मिळतोच. मात्र, ग्रामीण भागातील एखाद्या गावाला जाणारी ती शेवटची बस असेल आणि विद्यार्थ्याला त्या बसमध्ये प्रवेश मिळाला नाही, तर त्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. असा प्रसंग येऊ नये म्हणून विद्यार्थी जिवाची पर्वा न करता बसच्या दाराला लोंबकळत का होईना, पण घरी जाण्यासाठी धडपड करतात. 

स्थानकात येताना बसचा वेग सुसाट
काही वेळेला रस्त्यावरून बस स्थानकात येणारी गाडी चालक वेगात स्थानकात घेऊन येतो, अशा वेळी स्थानकाच्या प्रांगणात उभे असलेले विद्यार्थी व वृद्ध प्रवाशांना कुठे जावे, हेच समजत नाही. अशा गंभीर प्रकारांमुळे अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. हे प्रकार पाचवड बस स्थानकात अनेक वेळा घडलेही आहेत. भुईंज बस स्थानकातही किरकोळ प्रकार घडत आहेत. याप्रश्‍नी एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी लक्ष घालून असे प्रकार टाळण्याबाबत स्थानिक वाहतूक नियंत्रकांना सूचना कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com