महामार्गावरील उड्डाण पुलांना सोसवेना भार..?

भुईंज - उड्डाण पूल तयार असूनही तो खुला झाला नसल्याने सेवारस्त्यावरून सुरू असलेली जीवघेणी वाहतूक.
भुईंज - उड्डाण पूल तयार असूनही तो खुला झाला नसल्याने सेवारस्त्यावरून सुरू असलेली जीवघेणी वाहतूक.

भुईंज - गेल्या तीन-चार वर्षापासून सुरू असलेल्या सहापदरी महामार्गासाठी अनेक ठिकाणी कामे सुरू झाली. त्यानंतर ती पूर्णत्वास जाऊन रस्ताही वाहतुकीस खुला झाला. मात्र, भुईंज-पाचवड येथील उड्डाण पूल अद्यापही पूर्णपणे वाहतुकीस खुला झालेला नाही. तर सुरूर येथील उड्डाण पूल म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा असाच झाला असला तरी, निद्रिस्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला त्याचे काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महामार्गावरील उड्डाण पुलांना सोसवेना का वाहनांचा भार, अशीच प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्‍त होत आहे. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सध्या पूर्णत्वाकडे जात आहे. अनेक ठिकाणी नव्या मार्गावरून वाहतूकही सुरू झाली आहे.

मात्र, वाई तालुक्‍यातील सुरूर, भुईंज, पाचवड येथील उड्डाण पुलांना काही मुहूर्त लागत नाही, असे दिसत आहे. सध्या दोन्ही पुलांची कामे पूर्ण झाली असून अनेकवेळा त्याची चाचणीही घेण्यात आली आहे. पण, चाचणीनंतर संबंधित पूल वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या उड्डाण पुलाशेजारून काढलेल्या सेवारस्त्यांवरूनच वाहतूक वळविण्यात आली आहे. परंतु, हे सेवारस्ते अरुंद असल्याने त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. तसेच एखाद्या वेळी मोठे वाहन मध्येच बंद पडले तर वाहनांची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. 

हा महामार्ग कायमस्वरूपी वर्दळीचा आहे. त्यातूनच जर आठवड्यात जोडून सुट्या आल्याच तर महामार्गावरील वाहतूक ओसंडून वाहू लागते. अशा स्थितीत या ठिकाणी हमखासपणे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहतात. त्यावेळी वाहतुकीचा बोजवारा उडून, स्थानिक लोकांसह महामार्गावरील वाहनचालकांना हकनाक छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. उड्डाण पुलाखालील मार्ग भुईंज, पाचवड गावातील व परिसरातील लोकांना वर्दळीसाठी सोयीस्कर असले तरी, पूर्ण झालेले उड्डाण पूल खुले केले नसल्याने वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या रांगेतून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. पाचवडवरून कुडाळला जाण्यासाठी उड्डाणपुलाशेजारील रस्त्याचा वापर केला जातो. मात्र, बऱ्याचवेळा हा रस्ता विरुद्ध दिशेने येणारी वाहने शॉर्टकट म्हणून वापरतात आणि त्यातूनच अनेकवेळा अपघात घडल्याचे दिसून येते. एसटी बससह अनेक मोठी वाहने या रस्त्यावरून जात असल्याने वाहनचालकांची वादावादीही नित्याचीच ठरली आहे. पाचवड हे तीन तालुक्‍यांचे जंक्‍शन असून या ठिकाणाहून पाचगणी,

महाबळेश्‍वर आदी ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे सतत वाहनांची कोंडी झालेली दिसून येते. परिणामी पाचवडसह भुईंज येथील उड्डाणपूल तातडीने खुले करून, परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. 

सुरूरच्या पुलाला निर्मितीपासून मुडदूस
मुंबई, पुण्याकडून येणारे पर्यटक, वाहनचालक महामार्गावरून वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर व तेथून पुढे जाण्यासाठी सुरूर (ता. वाई) फाट्याला अधिक पसंती देतात. त्यामुळे येथे अनेक वाहनांची वर्दळ सुरू असते.

दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणावेळी येथील उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र, या पुलाचे बांधकामच अत्यंत निकृष्ट दर्जाचे राहिल्याने हा पूल कायमस्वरूपी ढिसाळ कामाबाबत चर्चेत राहिला. पुलाला वारंवार भेगा पडणे, स्लॅब खचणे अशा प्रकारांमुळे येथे कधीच दुहेरी वाहतूक झाली नाही.

निर्मितीपासून या पुलावर एकेरी वाहतूक आणि मधोमध उभे केलेले बॅरल वाहनचालकांच्या निदर्शनास येत आहेत. पण, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला त्याचे सोयरसुतक कधीच वाटलेले नाही. त्यामुळे येथे वाहनचालकांची, स्थानिकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक झाली आहे. परिणामी या पुलाला निर्मितीपासून झालेला मुडदूस दूर कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

तारीख पे तारीख...
महामार्गावरील भुईंज, पाचवड या ठिकाणचे उड्डाण पूल सुरू करण्याबाबत महामार्ग पदाधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपासून अनेक तारखा सांगितल्या. मात्र, अद्यापही उड्डाण पूल खुला करण्यात आलेला नाही किंवा त्याबाबत असणाऱ्या अडचणीही लोकांना सांगितल्या जात नाहीत. तर सातारा शहरानजीक अजंठा चौक आणि शिवराज पेट्रोल पंप चौक या ठिकाणचेही उड्डाणपूल अद्याप खुले झालेले नाहीत. त्यामुळे या उड्डाण पुलांना मुहूर्त लागणार कधी? असा प्रश्‍न व्यापारी, ग्रामस्थ व वाहनधारक करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com