भुयारीमार्गाचा खड्डा वाजवतोय धोक्‍याची घंटा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

भुईंज - पाचवड बस स्थानकासमोर असणाऱ्या या महामार्गावरील भुयारीमार्गाचा खड्डा अतिशय धोकादायक झाला असून, बस स्थानकातून बाहेर येणारी वाहने अथवा प्रवासी पडून मोठ्या अपघाताची शक्‍याता निर्माण झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष झाल्याने प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

भुईंज - पाचवड बस स्थानकासमोर असणाऱ्या या महामार्गावरील भुयारीमार्गाचा खड्डा अतिशय धोकादायक झाला असून, बस स्थानकातून बाहेर येणारी वाहने अथवा प्रवासी पडून मोठ्या अपघाताची शक्‍याता निर्माण झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष झाल्याने प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

पुणे- बंगळूर महामार्गावर पाचवड येथे सध्या सहापदरीकरणातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. उड्डाणपूल सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व सोपस्कर पाडले जात आहेत. उड्डाणपूल व बाजूचा रस्ता यावरील अडचणी दूर करण्याची कामे रिलायन्स कंपनीच्या ठेकेदार कंपनीकडून केली जात आहेत. उड्डाणपूलाखालून जाणारे रस्तेही साफ करण्यात आले आहेत. बस स्थानकासमोर सुमारे आठ वर्षांपूर्वी झालेल्या चौपदरीकरणातील भुयारी मार्गही या कंपनीने बुजावण्यासाठी काम सुरू केले. पोकलेन ब्रेकरच्या साह्याने हा भुयारी मार्ग पूर्णपणे उखडला व त्यातील स्टील ट्रॉल्या भरून काढून भंगारात नेण्यात आले. मात्र, त्यातील स्टील काढण्यात आल्यानंतर सुमारे १५ ते २० फूट झालेला खड्डा गेल्या अनेक महिन्यांपासून  त्याच अवस्थेत आहे. गेल्या १५ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले आहे. साठलेल्या पाण्यामुळे या खड्ड्याची खोली व पाण्याचा अंदाज नवख्या येणाऱ्या वाहनधारकांना व बाहेरील प्रवाशांना येत नाही. त्यामुळे त्यांची मोठी फसगत होत आहे. या खड्ड्याशेजारी एका बाजूला बस स्थानक व दुसऱ्या बाजूला उड्डाणपूल असून, त्यामधून अरुंद सेवा रस्ता आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा येतो.

त्यातूनही वाहनचालक अतिशय जिकिरीने आपले वाहन दामटत असतात. वाहनचालकांचा अंदाज फसल्यास कोणतेही मोठे वाहन या खड्ड्यात पूर्णपणे बुडल्याशिवाय राहाणार नाही. तर रात्रीच्या वेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने एखादा प्रवासी वाहनातून उतरून या ठिकाणाहून चालत गेल्यास खड्यात पडून दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी जोशीविहीर येथे सहापदरीकरणातील अशाच चुकीच्या कामामुळे खड्ड्यात पडून ओझर्डे येथील वृद्धाचा मृत्यू झाला होता. आजही या रस्त्याने महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या ठिकाणाहून येत जात आहेत. मात्र, हा प्रकार त्यांच्या लक्षात येत नाही. हा खड्डा बुजवून संभाव्य होणारा अपघात टाळावा, अशी मागणी सरपंच भरत गायकवाड, माजी सरपंच महेश गायकवाड, अनिल पवार, उत्तमराव पवार, दत्ताशेठ बांदल, विकास पवार यांनी केली आहे.

भुईंज बस स्थानकात महामार्गावरील गटारांचे पाणी 
महामार्गालगत सेवा रस्त्यांची गटरे व्यवस्थित न काढली गेल्याने भुईंज व पाचवड बस स्थानकात पावसाचे पाण्याचे मोठमोठे डोह होत आहेत. भुईंजला तर स्वच्छतागृहातील सर्व सांडपाणी बस स्थानकाच्या शेडपुढे येत असल्याने प्रवाशांना त्यातून चालत जावे लागत आहे.