सांगलीत सोमवारी 'पक्षी वाचवा' मोहीम 

birds save mission starts in Sangli
birds save mission starts in Sangli

सांगली - बसस्थानक परिसरातील शास्त्री उद्यानात गेल्या चार-पाच दिवसांपासून धावपळ सुरू आहे. कुणी स्वच्छतेला लागला, तर कुणी झाडे रंगवायला लागलेत. तर कुणी त्यांच्यासाठी आसरा तयार करतोय. ही सारी पळापळ पक्ष्यांसाठी सुरू आहे. शहराला वैभव प्राप्त झालेल्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी व्यापक मोहीम यंदा हाती घेण्यात आली आहे. तर सांगलीकरहो...चला पक्षी वाचवायला. 

"सकाळ माध्यम समूह', शहरातील विविध पक्षी-प्राणिप्रेमी संघटना, महानगरपालिका, वन विभाग आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने "चला, पक्षी वाचवूया' उपक्रम राबवला जात आहे. सोमवारी (ता.20) राममंदिर चौकातून "पक्षी दिंडी' निघेल. त्यात शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व सजग सांगलीकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता शास्त्री उद्यानात मुख्य कार्यक्रम होईल. महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे, आयुक्त रवींद्र खेबुडकर, विभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण, "आयएमए'चे अध्यक्ष डॉ. अनिल मडके यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होईल. त्यानंतर तीन महिने ही मोहीम शहरात राबवली जाणार आहे. तीन महिने ही मोहीम शहरात राबवली जाणार आहे. पक्षी पुनर्वसन केंद्रासह शाळा-महाविद्यालयांत प्रबोधनात्मक व्याख्याने, जखमी पक्ष्यांसाठी हेल्पलाइन, उद्यानात कृत्रिम घरटी असे विविध उपक्रम राबवले जातील. सांगलीकर नागरिकांनीही यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, येथील शास्त्री उद्यानात उभारण्यात येणाऱ्या पक्षी पुनर्वसन केंद्राची आयुक्त खेबुडकर यांनी आज पाहणी केली. अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी, उपमहापौर घाडगे, नगरसेवक शेखर माने उपस्थित होते. यावेळी अजित काशीद, सचिन शिंगारे, शशिकर भारद्वाज, किरण नाईक, मुस्तफा मुजावर, शंकर माळी उपस्थित होते. 

सहभागी संस्था 
"सकाळ माध्यम समूह', साम टीव्ही, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क, महानगरपालिका, वन विभाग, आयएमए, वेलनेस, ऍनिमल सहारा फाऊंडेशन, खोप बर्ड हाऊस, ऍनिमल राहत, इन्साफ फाऊंडेशन, बर्ड सॉंग्स्‌, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप, रॉयल्स यूथ स्टुडंट फाऊंडेशन. 

सोमवार, तारीख 20 मार्च 2017 
पक्षी दिंडी 
* स्थळ ः रामंदिर चौक, सकाळ कार्यालयासमोर, सांगली. 
* वेळ ः सकाळी 9 वाजता. 
मुख्य कार्यक्रम 
* स्थळ ः शास्त्री उद्यान, बसस्थानक जवळ, सांगली. 
* वेळ ः 10.30 वाजता.

-----------------------
एक आवाहन सजग सांगलीकरांसाठी 

"सांगली शहराला लाभलेले पक्षी वैभव जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यासाठी जागतिक चिमणी दिनाचे औचित्यसाधून ही मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात जखमी पक्ष्यांसाठी पुनर्वनस केंद्र उभारले आहे. पुढील टप्प्यात पक्षी उद्यानाचीच निर्मिती करू. मोहिमेत सांगलीकरांनी सहभागी व्हावे.'' 
रवींद्र खेबुडकर, आयुक्त, सांगली महानगरपालिका. 
.... 
"कीटकनाशकांच्या फवारणीमुळे पक्ष्यांची जैविक अन्नसाखळीच विस्कळित झाली आहे. त्यामुळे कीटकनाशकांवरही निर्बंध आणले पाहिजेत. पक्षी वाचवण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही करतो, पण यंदा एकत्रितपणे व्यापक मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेत सर्व डॉक्‍टर्स सहभागी असून शहरातील पाच उद्यानात कृत्रिम घरटी उभारली जाणार आहेत. तसेच पुढील टप्प्यातही आयएमए सक्रिय सहभागी राहील.'' 
- डॉ. अनिल मडके, अध्यक्ष, आयएमए, सांगली 
.... 
"पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकारी असतो, हे माणसानं मान्य केलं पाहिजे. प्रशस्त रस्ते, इमारतीबरोबरच निसर्गही सांगलीचे वैभव आहे. त्याची जपणूक करण्यासाठी साऱ्यांनी एकत्रित आले पाहिजे. पक्षी मोहिमेतही आम्ही सक्रिय सहभाग घेतलाय. सर्व लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेणार आहोत. तर सांगलीतील नागरिकांनीही सहभागी व्हावे.'' 
- शेखर माने, नगरसेवक 
....
"गेल्या चार-पाच वर्षांपासून पक्षी संवर्धनासाठी आम्ही काम करतो आहे. आजवर अनेक पक्ष्यांना जीवदान देण्यात आम्हाला यश आले आहे. परंतु जखमी पक्ष्यांचे प्रमाण अधिक असल्याने आमचे हात अपुरे पडतात. यंदा "सकाळ'ने पुढाकार घेतल्याने मोहिमेला व्यापकता आली आहे. त्यामुळे सर्व संघटना एकत्रित आल्या आहेत.'' 
- अजित काशीद, अध्यक्ष, ऍनिमल सहारा फाऊंडेशन 
........ 
"गेल्या काही वर्षांपासून पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी आम्ही तयार करतो. विविध ठिकाणी पक्ष्यांची ही घरटी लावल्याने अनेक पक्ष्यांना हक्काचे घर तयार झाले. या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील पाच उद्यानात ही घरटी लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे.'' 
- सचिन शिंगारे, खोप बर्ड हाऊस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com