भाजप नगरसेवकाच्या मदतीला विरोधक धावले

विजयकुमार सोनवणे
रविवार, 15 एप्रिल 2018

महापालिका सभेने मदतीचा ठराव जरी केला तरी प्रशासनाकडून त्याची कार्यवाही कधी होईल याची खात्री नाही. त्याएवजी सर्व नगरसेवकांनी आपले महिन्याचे
मानधन दिले तर ती मदत वेळेत होईल व सहकाऱ्याला मदत केल्याचे समाधानही मिळेल.
- रियाज खरादी, नगरसेवक (एमआयएम)

सोलापूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांना महापालिकेतर्फे 20 लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव देत विरोधी पक्षातील नगरसेवक पाटील यांच्या मदतीला धावले आहेत. विरोधकांनी अचूक डाव टाकीत सत्ताधार्यांना अडचणीत आणले आहे. त्यामुळे या प्रस्तावावर मंगळवारी काय निर्णय होतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

श्री. पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याची चर्चा आहे. बॅाम्बे हास्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांच्या शरीरात थेलियम या विषाचे अंश आढळले. या प्रकरणी मुंबई पोलिसांत गु्न्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, पाटील यांना उपचारासाठी आतापर्यंत 30 ते 32 लाख रुपयेखर्च आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने त्यांना 20 लाख रुपये द्यावेत, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. कांग्रेसचे चेतन नरोटे, प्रवीण निकाळजे, नरसिंग कोळी, विनोद भोसले, शिवलिंग कांबळे, रियाज हुंडेकरी, बाबा मिस्त्री, एमआयएमचे तौफीक शेख, राष्ट्रवादी कांग्रेसचे किसन जाधव, सुनीता रोटे व बहुजनसमाज पक्षाचे आनंद चंदनशिवे यांनी हा प्रस्ताव दिला आहे. 

पाटील यांना मदत करण्याचा प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकांकडून येणे अपेक्षित होते. मात्र हा प्रस्ताव विरोधातील शिवसेनावगळता उर्वरीत पक्षाच्या नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकाची काळजी भाजपच्या नगरसेवकांना नाही असे वातावरण निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले आहेत.
तर महापालिकेचा निधी देण्याएेवजी सर्व नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन  पाटील यांना द्यावे, अशी भूमिका काही नगरसेवकांनी मांडली आहे. महापालिकेत 107 नगरसेवक आहेत. त्यांना दरमहा प्रत्येकी 10 हजार रुपये मानधन मिळते. सर्व नगरसेवकांनी मानधन दिल्यास ही रक्कम 10 लाख 70 हजार रुपये होते. त्यामुळे
पालिकेच्या तिजोरीवर बोजाही पडणार नाही आणि आपला सहकारी म्हणून श्री. पाटील यांना मदत केल्याचे समाधान सर्वच पक्षातील नगरसेवकांना होईल, असाही सूर निघत आहे. श्री. पाटील यांना मदत देण्यावर या घडामोडी सुरु असल्या तरी, आपल्याच पक्षातील सहकाऱ्याबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये आपुलकी नसल्याचे दाखवून देण्यात विरोधक या प्रस्तावाच्या माध्यमातून यशस्वी झाले आहेत. 

महापालिका सभेने मदतीचा ठराव जरी केला तरी प्रशासनाकडून त्याची कार्यवाही कधी होईल याची खात्री नाही. त्याएवजी सर्व नगरसेवकांनी आपले महिन्याचे
मानधन दिले तर ती मदत वेळेत होईल व सहकाऱ्याला मदत केल्याचे समाधानही मिळेल.
- रियाज खरादी, नगरसेवक (एमआयएम)

Web Title: BJP corporater in Solapur Municipal Corporation