भाजपला शेवटी उमेदवार शोधण्याची वेळ

भाजपला शेवटी उमेदवार शोधण्याची वेळ

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असताना हवा निर्माण करणाऱ्या भाजपची साथ अर्ज भरण्याच्या तोंडावर अचानक स्वाभिमानीने सोडल्यामुळे, त्याचप्रमाणे शिवसेनेबरोबरची युती तुटल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपवर शेवटी उमेदवार शोधण्याची वेळ आली. या निवडणुकीत एकही राजकीय पक्ष जिल्हा परिषदेच्या ६७ व पंचायत समितीच्या १३४ जागांवर आपले उमेदवार उभे करू शकला नाही.

राज्यात सत्तेवर आल्यानंतर भाजपने आपले लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीवर केंद्रित केले. याचा त्यांना पक्षवाढीसाठी फायदा झाला. पालिकेच्या निवडणुकीत तर ज्या ठिकाणी एक-दोन सदस्य त्यांचे होते, त्या ठिकाणी त्यांनी भाजपची सत्ता स्थापन केली. यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना जाळ्यात ओढले. यात भाजपला चांगले यश मिळाले. तोच फॉर्म्युला त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत वापरण्याचे ठरविले. यात काही कार्यकर्ते त्यांच्या हाताला लागले; पण तो टेंपो उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत त्यांना टिकविता आला नाही.

मुळात महापालिका किंवा नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक यात खूप फरक आहे. महापालिका, नगरपालिका यांचे प्रभाग छोटे असतात. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक वेगळी असते. जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघात दहा ते पंधरा गावे असतात. यामुळे अपक्ष निवडणूक लढवणे तेवढे सोपे नसते आणि या निवडणुकीला उभारणाऱ्या कार्यकर्त्याला किमान चार-पाच गावांत ओळखणारे कार्यकर्ते लागतात. अशा परिस्थितीत भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही हा फॉर्म्युला वापरण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी जुळवाजुळव सुरू केली. 

पहिल्या टप्प्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्यांच्या हाताला लागले. त्यामुळे त्यांची पहिली यादी तगडी झाली. पहिल्याच यादीत ताकदवान उमेदवार दिसल्यामुळे भाजप आघाडीची हवा निर्माण झाली. या दरम्यान मुंबईतील भाजप-शिवसेनेची युती तुटली. महाआघाडीचा घटक पक्ष असलेली स्वाभिमानी व भाजप यांच्यात धुसफूस सुरू होती. त्यामुळे आघाडीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. 

स्वाभिमानीचा जोर से धक्का
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भरवशावर भाजप होता. पूर्वेकडील तालुक्‍यांत स्वाभिमानीचे वर्चस्व आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगळी चूल मांडेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वाटले नव्हते. स्वाभिमानी भाजपसोबतच राहील अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे भाजपने ४४ जागा आपल्याकडे ठेवल्या होत्या. यातीलच ते काही जागा स्वाभिमानी व शिवसेनेला देणार होते. पण शेवटच्या क्षणी स्वाभिमानीने भाजपशी काडीमोड घेतला. त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेल्या ४४ जागांवरदेखील ते उमेदवार उभे करू शकले नाहीत.

नव्याने जागावाटप
भाजपची शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साथ सोडल्यामुळे नव्याने जागावाटप करावे लागले. यामध्ये भाजपने आपल्या जागा कमी करून ४१ घेतल्या. जनसुराज्यला १३, ताराराणी आघाडी ६, युवक क्रांती दल ६ व जनता दलाला १ जागा, असे जागावाटप निश्‍चित झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com