मॅजिक फिगर ३१ साठी भाजपची जुळवाजुळव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

सांगली - जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २५ जागा पटकावून जोरदार मुसंडी मारली. सत्ता स्थापनेसाठी आवश्‍यक ३१ सदस्यांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आघाड्यांशी चर्चा सुरू आहे.

वाळवा तालुक्‍यात रयत विकास आघाडीत मात्र पाठिंब्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. मतमोजणीनंतर लगेचच इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्याशी रात्री चर्चा केली. मात्र, आमदार बाबर यांनी याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत निर्णय झाला तर सांगलीत काय होणार, याकडे सर्वांची नजर आहे.

सांगली - जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २५ जागा पटकावून जोरदार मुसंडी मारली. सत्ता स्थापनेसाठी आवश्‍यक ३१ सदस्यांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आघाड्यांशी चर्चा सुरू आहे.

वाळवा तालुक्‍यात रयत विकास आघाडीत मात्र पाठिंब्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. मतमोजणीनंतर लगेचच इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्याशी रात्री चर्चा केली. मात्र, आमदार बाबर यांनी याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत निर्णय झाला तर सांगलीत काय होणार, याकडे सर्वांची नजर आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. सत्तास्थापनेसाठी आवश्‍यक असलेले आणखी सहा सदस्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागण्याची शक्‍यता आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांनी विश्‍वासात न घेता रयत आघाडीचा भाजपला पाठिंब्याबाबत जाहीर केलेल्या भूमिकेवर महाडिक गटाकडून टीका करण्यात आल्याने आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. नाना महाडिक व आमदार शिवाजीराव नाईक यांनी मात्र इस्लामपूर येथे रयत विकास आघाडीचे विजयी उमेदवार आणि नेत्यांची शनिवारी बैठक होत असल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला बराच कालावधी असल्याने आम्ही नंतर निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. 

भाजपला सत्तेत येण्यासाठी रयत विकास आघाडीसह शिवसेनेचीही मदत हवी आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मतमोजणीनंतर गुरुवारी सायंकाळीच आमदार अनिल बाबर यांच्याशी चर्चा केली. आमदार बाबर यांनी पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आमच्यावर बंधनकारक असेल असे स्पष्ट केले आहे. नव्या सदस्यांची इनिंग २१ मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या बैठकीपासून सुरू होईल. एकहाती सत्ता मिळवण्याएवढे कुणाकडे संख्याबळ नाही. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला गती येणार आहे. 

पॉईंटर...
सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली...

० मंत्री सदाभाऊ खोत यांचे भाजपला रयत आघाडीच्या पाठिंब्याबाबत भाष्य 
० रयतचा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी चर्चा न केल्याचा राहुल महाडिकांचा आक्षेप
० पाठिंब्यावरून रयत आघाडीत सुरू झाली धुसफूस
० रयतचे नेते नाना महाडिक म्हणाले, ‘‘आम्ही एकत्रित निर्णय घेणार’’
० रयत विकासमध्ये महाडिक गटाचे ३ झेडपी सदस्य
 

सत्ता स्थापनेसाठी जनतेने भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष भाजपचाच असेल. त्यासाठी आघाड्यांशी चर्चा करू. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष म्हणूनही नैतिकदृष्ट्या आमचाच अध्यक्षपदावर हक्क असेल. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने पूर्णपणे नाकारले आहे.
- संजय पाटील, खासदार, सांगली

‘‘रयत विकासच्या सदस्यांच्या सत्कारासाठी सर्व नेत्यांसमवेत उद्या (ता. २५) बैठक आहे. नेत्यांची स्वतंत्र बैठक होईल. आम्ही एकत्रितच निर्णय घेऊ. अध्यक्षपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत चर्चा होईल. अध्यक्ष निवडीला २५ दिवसांचा अवधी असल्याने पुन्हा एखादी बैठक होईल. शिवसेनेच्या तीन सदस्यांना बहुमतासाठी विचारू. राज्यपातळीवर काहीही निर्णय झाले तरी स्थानिक राजकीय परिस्थितीत येथे निर्णयाची मुभा देण्याबाबत पक्ष विचार करेल.’’
- शिवाजीराव नाईक, आमदार शिराळा.

सत्ता स्थापनेसाठी अद्याप बराच कालावधी आहे. मला सत्तेसाठी एकाही पक्ष, नेत्याकडून विचारणा झाली नाही. ऑफर नसताना पाठिंब्याबाबत निर्णय घेणार नाही. कोणाच्या पाठीमागेही लागणार नाही. ‘गहू तेव्हा पोळ्या’ म्हणीप्रमाणे ज्या-त्या वेळी निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांशीही चर्चेची तयारी आहे.
- अनिल बाबर, शिवसेना आमदार