#VoteTrendLive भाजपची खेळी; काँग्रेस, राष्ट्रवादी खिळखिळी

#VoteTrendLive भाजपची खेळी; काँग्रेस, राष्ट्रवादी खिळखिळी

मिरज, जत, पलूस, आटपाडी किंगमेकर - बलराज पवार 
निवडणुकीच्या ऐन तोंडावर दोन्ही काँग्रेस आपल्यातील आऊटगोईंग रोखू शकल्या नाहीत, भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली. एकीकडे काँग्रेसअंतर्गत सुरू असलेल्या वादाचा फायदा भाजपला झाला, तर राष्ट्रवादीत कोणी नेतेच उरले नाहीत, याचाही फायदा त्यांनी उठविला. त्यामुळे शून्यातून त्यांनी २५ जागांपर्यंतची मजल मारत सत्तेवर आपला दावा सांगितला आहे.

भाजपने प्रथमच पक्षाच्या चिन्हावर जिल्ह्यात ३९ जागा लढवल्या. त्यापैकी २५ जागा जिंकल्या. विशेष म्हणजे पलूस, कडेगाव आणि आटपाडी या तीन तालुक्‍यांत दिलेल्या सर्व जागा जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला; तर जत आणि मिरजेत काँग्रेसचे कडवे आव्हान त्यांना होते. परंतु दादा आणि कदम गटातील टोकाच्या वादाने भाजपला साथ दिली; तर भाजपच्या नेत्यांनी आपापले तालुके सांभाळताना ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आणि विलासराव जगताप यांनी पक्षाकडून आलेला आदेश शिरसावंद्य मानत एकजुटीने जिल्हा परिषदेचा किल्ला लढवला आणि आपापल्या मतदारसंघात यश मिळवून दिले. राजेंद्रअण्णांचा भाजप प्रवेश फायद्याचा ठरला. आटपाडी, पलूस, मिरज, कडेगाव आणि जत अशा पाच पंचायत समित्याही भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. 

शिराळ्यात मात्र आमदार शिवाजीराव नाईक यांना दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमुळे यश मिळविता आले नाही. तासगावात खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडले; पण त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. या उलट कडेगाव, पलूस आणि मिरज या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये फार अपेक्षा नसतानाही भाजपने या तीन तालुक्‍यांत एकूण १९ पैकी १३ जागा मिळवत दादा आणि कदम गटाचे बालेकिल्ले उद्‌ध्वस्त केले. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पलूस, कडेगावमध्ये मोहनराव व पतंगराव या दोन्ही आमदारांना अस्मान दाखवले. जतमध्ये काँग्रेसमधील गटबाजीचा विलासरावांनी फायदा उठविला.

मिरज तालुक्‍यात तशी काँग्रेसची ताकद मोठी असूनही कदम-दादा गटातील वादाचा फायदा भाजपने नेटकेपणाने मिळविला.

जे होते तेही कदम-दादा गटबाजीत संपले - जयसिंग कुंभार
वसंतदादांचा गड,  काँग्रेसचा गड, अशी एकेकाळची ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात उरलेसुरले अस्तित्वही आता या निवडणुकीत लयाला गेले आहे. खासदारकी गेली, आमदारक्‍या गेल्या, उरले फक्‍त पतंगराव कदम, अशी या पक्षाची अवस्था. जिल्ह्याच्या इतिहासात मिरज पंचायत समितीवरील काँग्रेसची पहिल्यांदाच सत्ता गेली. म्हणजे जिल्ह्यात आजघडीला काँग्रेसकडे एकमेव सांगली महापालिका सत्ताकेंद्र उरले आहे. तेही सध्या बंडाळीने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाने ग्रासले आहे. ही सारी वाताहत कशामुळे झाली? आजच्या घडीला पाच तालुक्‍यांत मिळून फक्‍त एक गट या पक्षाला मिळाला आहे. गटबाजी आणि पक्षनेत्यांची शहामृगी वृत्ती. पतंगराव कदम, प्रतीक पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील, सदाभाऊ पाटील, शिवाजीराव देशमुख अशी काही नेतेमंडळी आज जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व करतात. त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून एकत्रित अशी बैठकही झालेली आठवत नाही. 

यात शिवाजीराव देशमुख यांनी दोन जिल्हा परिषद मतदारसंघापुरते आपले अस्तित्व टिकवून ठेवले. 

जिल्हा परिषदेत २३ जागांचे बळ असलेल्या काँग्रेसची घसरण १० जागांवर आली. निवडणुकीआधी स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदारसंघातील विजयाने हुरळून गेलेल्या मोहनराव कदम यांनी स्वबळाचा नारा दिला आणि ते जे गायब झाले ते झालेच. त्यांना त्यांच्या कडेगाव तालुक्‍यातून बाहेर पडणेही मुश्‍कील झाले. पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी या तालुक्‍यांच्या पंचायत समित्यांमधून काँग्रेस हद्दपार झाली. जतमध्ये विजयाची संधी होती, मात्र कदम-वसंतदादा घराण्यातील वादामुळे तिथेही दादानिष्ठांनी आघाडी करून काँग्रेस उताणी कशी पडेल याची पक्की व्यवस्था केली. मिरजेतही असाच गाफीलपणा नडला.  मिरज पूर्वमधील मदन पाटील यांच्या निष्ठावान गट जशाच्या तसा भाजपच्या गोटात दाखल झाला. पश्‍चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भांडण म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा भाग आंदण दिला. इथले कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले. या पोकळीत भाजपने समडोळीसारखा हक्काचा जिल्हा परिषद मतदारसंघ कधी गायब केला हे देखील समजले नाही. तेच वसंतदादांचा कट्टर बेल्ट असलेल्या माधवनगर, कवलापूर या जिल्हा परिषद मतदारसंघाचे झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण लाड यांच्यासोबत योग्यवेळी आघाडी करून कदम यांच्याविरोधातील मतविभागणी टाळली. आज काँग्रेसचे अस्तित्व जिल्हाभरात जागोजागी केवळ एक दोन जागांपुरते उरले आहे. भाजपच्या मुसंडीपुढे काँग्रेस पुरती हतबल झाली आहे. 
 

आऊटगोईंग, अपारदर्शी कारभाराने गोत्यात - विष्णू मोहिते 
गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या आणि त्यापूर्वीही पाच वर्षे काँग्रेसबरोबर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीवर सत्ता गमावण्याची नामुष्की आली आहे. राज्यात सत्ता नसल्याने हतबल झालेले विविध तालुक्‍यांचे सरदार भाजपमध्ये गेले. निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्रअण्णा देशमुखांनी राष्ट्रवादी सोडण्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला. अर्थात आऊटगोईंग जिल्ह्याचे नेते असलेल्या जयंतरावांना रोखता आले नाही. त्यामुळे आलेख ३६ वरून केवळ १४ इतक्‍या खाली आला. पंचायत समितीत ३३ सदस्य निवडून 
आले आहेत. 

बागणीतील बंडखोर संभाजी कचरे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते अन्‌ कवठेमहांकाळ तालुक्‍यातील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या आघाडीच्या दोन सदस्यांची गोळाबेरीज १७ पर्यंतच पोहोचते. यामुळे काहीसा राष्ट्रवादीचा बचाव झाला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना वाळवा तालुक्‍यातील ११ जागांपैकी गेल्यावेळी सात जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदा आणखी दोननी घटून सध्या ५ जागांच मिळाल्या. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात आर. आर. पाटील यांच्या निधनानंतरही आमदार सुमन पाटील यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवले. अर्थात कवठेमहांकाळ तालुक्‍यात त्यांना अजितराव घोरपडे यांची चांगली साथ मिळाली. पलूस-कडेगाव तालुक्‍यात राष्ट्रवादीने भाजपशी आघाडी केली. अर्थात त्यामुळे आमदार पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या शरद लाड यांचा मोठा विजय झाला.

विसापूरमध्ये सुनील पाटील यांनी भाजपात प्रवेश करूनही राष्ट्रवादीने हा गड राखला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे व ॲड. चन्नाप्पा होर्तीकर यांचा पराभव या पक्षाला जागा करणारा आहे. जयंतरावांनी काँग्रेसपुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्यांनी तो नाकारला, हे देखील एक कारण आहे. पारदर्शी नसणे व कोणतेही ठोस विकासकाम नसणे हे देखील राष्ट्रवादीला नडले असून गुणवत्ता नसलेल्या सदस्यांना पदे देणे देखील लोकांना आवडले नाही.

शिवसेनेने जिल्ह्यात ‘डरकाळी’ फोडली - घनशाम नवाथे
शिवसेनेने यंदाच्या प्रथमच जिल्हा परिषदेच्या २६, आणि पंचायत समितीच्या ४९ जागांवर उमेदवार उभे करून डरकाळी फोडली. सेनेचे आमदार अनिल बाबर यांनी खानापूर तालुक्‍यात करिश्‍मा दाखवला. जि. प.च्या तीन जागा खेचून पंचायत समितीवरही भगवा फडकवला. सेनेने जिल्ह्यात दहाही तालुक्‍यांत जि. प. व  पं. स. साठी उमेदवार उभे केले होते. परंतु दुष्काळी खानापूर तालुक्‍यात वाघाची डरकाळी घुमली. भाजपला मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवण्यासाठी सेनेची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे 
येथे ‘किंगमेकर’च्या भूमिकेत सेना दिसेल.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील आणि दिवंगत अशोक घाडगे यापूर्वी जिल्हा परिषदेत निवडून आले होते. त्यानंतर सेनेला झेडपीत प्रवेश मिळाला नव्हता. जिल्ह्यात मोजक्‍या ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवण्यापलीकडे सेनेची कामगिरी आतापर्यंत उंचावली नव्हती. शिवसेनेने येथून १६ वर्षांपूर्वी नितीन शिंदे यांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिले. त्यांना फारसा चमत्कार घडवता आला नाही. अनिल बाबर यांनी सेनेकडून विधानसभेत जिल्ह्यात प्रथमच खाते उघडले. विटा पालिकेत त्यांना करिश्‍मा दाखवता आला नाही. परंतु ग्रामीण भागात आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. खानापुरात जि.प.च्या तीनही जागांवर विजय मिळवला. पंचायत समितीच्या पाच जागांवर विजय मिळवत प्रथमच पंचायत समितीवर झेंडा फडकवला. वाळवा तालुक्‍यात जि. प. च्या ७ आणि पं. स. च्या १४ जागांवर सेनेचे उमेदवार उभे होते. उमेदवारांनी त्यांच्या ताकदीप्रमाणे ‘डरकाळी’ फोडली. प्रथमच जिल्ह्यात सेना ताकदीने लढली. खानापूर पंचायत समितीवर तर त्यांचा झेंडा फडकला. तसेच मिनी मंत्रालयातही ‘किंगमेकर’ची भूमिका बजावण्यासाठी सेना सज्ज आहे. परंतु त्यासाठी मुंबईतून आदेशाची प्रतीक्षा करावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com