भाजपला बळ, काँग्रेसला बदलाचे इशारे

भाजपला बळ, काँग्रेसला बदलाचे इशारे

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निकालाने जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बळ मिळाले. मात्र, वैभव हरवलेल्या काँग्रेसला बदल घडविण्याचा इशाराच मतदारांनी दिला. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप नक्‍कीच ‘फिनिक्‍स’ भरारी घेईल. मात्र, काँग्रेसने नेतृत्व बदल करून संघटनात्मक बांधणी केली नाही, तर जिल्ह्यात काँग्रेस शोधावी लागेल. 
 

जिल्ह्यातील मतदारांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊन जिल्हा परिषदेची सत्ता एक हाती ताब्यात दिली आहे. या निकालाने सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा, बालेकिल्ला असल्याचेच ‘राष्ट्रवादी’ने अधोरेखित केले. आगामी लोकसभा, विधानसभेची रंगीत तालीमच ‘राष्ट्रवादी’ने जिंकली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही मुसंडी मारली. विकासकामांचा ‘अजेंडा’ घेऊन त्यांनी लढलेल्या लढाईत जिल्हा परिषदेच्या सात जागांवर, तर पंचायत समितीच्या १३ जागांवर यश मिळाले. विशेषत: कऱ्हाड पंचायत समितीत सत्तेची संधीही उपलब्ध झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी जवळीक करून त्यांनी लोकसभा, विधानसभेची समीकरणेही जुळविण्यास सुरवात केली आहे. मात्र, शिवसेनेला हा धडा देणारा निकाल ठरला आहे. दमदार नेतृत्वाअभावी विस्कळित झालेली शिवसेना बांधली तर ठीक अन्यथा पाटणपुरतीच शिवसेना विजयी दिसेल. मात्र, एकेकाळी सुवर्णयुग असलेल्या काँग्रेस पक्षाला चार तालुक्‍यांतून हद्दपार व्हावे लागले, हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारी बाब आहे. सातारा, पाटण, महाबळेश्‍वर आणि जावळी तालुक्‍यांतून काँग्रेस पूर्णत: हद्दपार झाली आहे, तर खंडाळ्यामध्ये पंचायत समितीच्या एका, तर वाईत दोन गणांपुरतीच मर्यादित राहिली आहे. माण, खटाव, कोरेगाव व फलटणमध्ये प्रत्येकी एक गट व दोन गण काँग्रेसला मिळाले. कऱ्हाडमध्येही अवघ्या तीन गट, तर

पंचायत समितीच्या २४ पैकी चार गणांवर अल्पसंतुष्ठ राहावे लागले. ‘काळानुसार आपण बदलावे लागते, अन्यथा काळ आपल्याला बदलतो,’ हा परिवर्तनाचा नियम आहे. तसे न झाल्यास ‘नाना हटाव, काँग्रेस बचाव’ असा नाराही पक्षाअंतर्गत सुरू झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

निकाल अपेक्षेपेक्षाही वाईट लागला आहे. भाजपने सत्तेचा पुरेपूर वापर केल्याचे दिसून येते. कऱ्हाड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीशी आघाडी केली होती. मात्र, तेथेही सत्तेचा दुरुपयोग करून अविनाश मोहिते यांना तुरुंगात टाकण्यात आले. दोन दिवसांत पराभवाचे विश्‍लेषण करू.

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री. 

शिवसेनेने प्रथचम साताऱ्यात चिन्हावर निवडणूक लढविली. कमीतकमी साधनसुचितेतही प्रत्येक घरात शिवसेनेचे विचार, चिन्ह पोचविले. त्याचा आम्हाला विधानसभेला फायदा होईल. पाटणमध्ये शंभूराज देसाईंमुळे पक्षाला यश मिळाले. मात्र, मल्हारपेठमध्ये अंतर्गत वाद मिटविता आले नाहीत. विजयी झालेले आमचे उमेदवार मूळचे शिवसैनिक आहेत. भाजपला यश मिळाले असले तरी ते आयात आहेत.

- विजय शिवतारे, पालकमंत्री.

जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीसाठी आम्हाला दोन फ्रंटवर लढाई करावी लागली. आमच्यातीलच आम्हाला त्रास देत होते. त्यांना कमीतकमी गप्प बसविले, तर राष्ट्रवादीला टोकाचा विरोध करणाऱ्यांना पुन्हा एकदा जिल्ह्यात राष्ट्रवादीशिवाय पर्यायच नाही, हे कळून चुकले. जनतेने भरभरून प्रतिसाद देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाला दिलेला कौल शिरसावंद्य आहे.
- रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती, विधान परिषद.

सामान्य माणसाला समोर ठेवून भाजपने केलेली कामे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची जनतेने परतफेड केली. सातारा जिल्ह्यात जनतेने भाजपवर विश्‍वास दाखविला आहे. त्याची परतफेड करण्यासाठी आम्ही साताऱ्यावर लक्ष केंद्रित करून पाणीयोजना पूर्ण करू. आता विधानसभेच्या तयारीलाही आम्ही लागलो आहोत. 
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com