महाआघाडीची गळती सुरूच 

महाआघाडीची गळती सुरूच 

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षालाही भाजपच्या कार्यपद्धतीचा फटका या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बसला आहे. चर्चेच्यावेळी जिल्हा परिषदेच्य दोन व पंचायत समितीच्या सात जागा देण्याचे मान्य केले असतानाही जाहीर झालेल्य यादीत आठवले गटाच्या एकाही कार्यकर्त्याचे नाव उमेदवाराच्या यादीत नसल्याने नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे पर्याय उपलब्ध असेल तिकडे जाण्याच्या हालचाली या पक्षाच्या सुरू आहेत. 

विधानसभा निवडणुकीत महाआघाडीची जी मोट बांधण्यात आली होती, त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट पहिल्या गाडीने सामील झाला होता. त्यानंतरच्या काही निवडणुकीत ही महाआघाडी कायम राहिली. त्यानंतर या महाआघाडीला गळती सुरू झाली. मुंबई निवडणुकीच्या निमित्ताने प्रथम शिवसेनेने गेल्या दोन दशकापेक्षा अधिक काळ असणारी भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडली. मुंबईत युती तुटल्याचे जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात अन्य ठिकाणी युती होणे शक्‍यच नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ही युती राहिली नाही. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतील जागा वाटपावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतली. संघटेनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या विरोधकांनाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जवळ केल्यामुळे त्यांच्या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री पाटील यांना आपला निर्णय कळविल्यानंतर खासदार शेट्टी यांनी उमेदवारही जाहीर केले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आघाडीतील जनसुराज्य शक्‍ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांशी एकाच दिवशी चर्चा केली. या चर्चेत आरपीआयला दोन जिल्हा परिषद व तीन पंचायत समितीच्या जागा देण्याचे मान्य करण्यात आहे. असे बैठकीनंतर सांगण्यात आले. सांगरुळ, उचगाव हे आरपीआयने जिल्हा परिषदेसाठी मतदारसंघ देण्याचे ठरले होते, असे असताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने कमळ चिन्हावर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याचे स्पष्ट झाले. अर्ज भरण्याच्या मुदतीत आरपीआयने देखील रेंदाळ, किणी, सिद्धनेर्ली, उचगाव, बड्याचीवाडी, राशिवडे या जिल्हा परिषद मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

पर्याय खुले - कांबळे 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जे ठरले होते. त्याप्रमाणे भाजपचे नेते वागले नाहीत. त्यामुळे आघाडीत राहून काय उपयोग? दोन दिवसात पालकमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचा निरोप आहे. यामध्ये जर समाधानकारक निर्णय झाला नाही, तर आम्हाला आमचे पर्याय खुले आहेत. जे आम्हाला मदतीचा हात पुढे करतील त्यांना आम्ही साथ देऊ, असे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com