शिराळा, पलूस तालुक्‍यात भाजप स्वबळावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

इस्लामपूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शिराळा व पलूस तालुक्‍यात भाजप स्वबळावर लढेल, तर वाळवा तालुक्‍याचा निर्णय मित्रपक्षांच्या चर्चेनंतर पुढच्या आठवड्यात घेण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत झाली.

इस्लामपूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शिराळा व पलूस तालुक्‍यात भाजप स्वबळावर लढेल, तर वाळवा तालुक्‍याचा निर्णय मित्रपक्षांच्या चर्चेनंतर पुढच्या आठवड्यात घेण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत झाली.

येथील दत्त मंगल कार्यालयात पलूस व शिराळा तालुक्‍यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यावेळी हा निर्णय घोषित केला. माजी आमदार भगवानराव साळुंखे, नगरसेवक विक्रम पाटील, भाजपचे शिराळा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, पलूस तालुकाध्यक्ष विजय पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष शंकर पाटील, विजय कुंभार यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या.

देशमुख म्हणाले, 'शिराळा तालुक्‍यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण तसेच पलूस तालुक्‍यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणासाठी आज मुलाखती झाल्या. जिल्ह्यात भाजप मजबूत पक्ष असून एक खासदार, चार आमदार, वाळवा तालुक्‍यात मित्र पक्षाचा एक खासदार व सदाभाऊ खोत मंत्री आहेत. भाजपला ताकद वाढवण्यासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी स्वबळावर सर्व काही ठिकाणी मित्रपक्षांशी युती करून निर्णय घेतला जाईल. वाळवा तालुक्‍यात योग्य प्रस्ताव वाटला तर विकास आघाडी मार्फत निवडणूक लढवली जाईल. जिल्ह्यात भाजप सत्तेवर येईल.''

शिवाजीराव नाईक म्हणाले, 'शिराळा तालुक्‍यात भाजपची भीती घेऊन राष्ट्रवादी व कॉंग्रेसने युती केली आहे. शिराळा तालुक्‍यातील झेडपीच्या चार व पंचायत समितीच्या आठ जागा कमळ चिन्हावर लढवणार आहोत. येत्या काही दिवसांत शिराळ्यातील अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वाळवा तालुक्‍यात सर्वांचा शत्रू एकच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय युती होण्याची शक्‍यता आहे.''

ते आले तर विचार करू
खानापूर, आटपाडी तालुक्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी लढणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती उद्या होणार आहेत. वाळवा तालुक्‍यात कॉंग्रेसला बरोबर घेणार का? यावर शिवाजीराव नाईक म्हणाले, 'आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. मात्र ते आले तर विचार करू.''

Web Title: bjp self power in shirala palus zilla parishad election