सोलापुरात भाजप, शिवसेनेला चुकीच्या उमेदवाराचा फटका

Taufiq Hatture
Taufiq Hatture

सोलापूर ; महापालिका पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे तौफीक हत्तुरे विजयी झाले. त्यांची लढत एमआयएमचे पीरअहमद शेख यांच्याशी झाली. भाजप आणि शिवसेनेने चुकीचे उमेदवार दिल्याने त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. 

सार्वत्रिक निवडणुकीत एमआयएमने दिवंगत नगरसेवक रफीक हत्तुरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. पोटनिवडणुकीत मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले पीरअहमद शेख यांना उमेदवारी दिली. दुसऱ्या पक्षातील उमेदवार लादल्याने एमआयएममध्ये नाराजी पसरली होतीच, मात्र श्री. शेख यांना मिळालेली मते पाहता, त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. 

एमआयएमच्या तुलनेत भाजप-शिवसेनेसंदर्भातील अंदाज खोटे ठरले. मुस्लिम मतांमध्ये होणाऱ्या विभाजनाचा फायदा घेऊन भाजप किंवा शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल, अशी अटकळ सुरवातीपासूच बांधली जात होती. मात्र या दोन्ही पक्षांना एकाही बूथवर चार आकडी मते मिळविता आली नाहीत. या दोन्ही पक्षाकडून स्थानिक प्रभागातील उमेदवार इच्छुक होते. मात्र दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा फटका त्यांना बसला. या प्रभागात सार्वत्रिक निवडणुकीत भाजपकडून उपेंद्र दासरी यांनी दिवंगत हत्तुरे यांना चांगली टक्कर दिली होती. ते यंदाही इच्छुक होते, त्यांनी उमेदवारीही दाखल केली. मात्र "मालकां'च्या "विनंती'ला मान देत त्यांनी उमेदवारी मागे घेतली. शिवसेनेकडून ढगे यांना मिळालेली उमेदवारी अनेक निष्ठावंत "शिवसैनिकां'ना रूचली नाही. भाजप व शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढविली असती तरी, त्यांचा पराभवच झाला असता हे मतदानाची आकडेवारी पाहिले की स्पष्ट होते. एकंदरीतच मुस्लीमबहुल प्रभागात चुकीचा उमेदवार देण्याचे परिणाम भाजप व शिवसेनेला भोगावे लागले. माकपच्या नलिनी कलबुर्गी यांनी चांगला प्रयत्न केला व ढगेंच्या तुलनेत जादा मते मिळवली. एकंदरीत भाजप-शिवसेनेने युती करून स्थानिक भागातील मुस्लिम उमेदवार दिला असता तर, या पोटनिवडणुकीचे चित्र काही वेगळे दिसले असते. 

मतविभागणीचा परिणाम झालाच नाही 
या पोटनिवडणुकीत तब्बल सहा मुस्लीम उमेदवार रिंगणात होते. त्यांच्यामध्ये होणाऱ्या मतविभागणीचा फायदा भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला होईल, असा सूर होता. भाजपचा प्रभाव असलेल्या परिसरातील बूथवर गठ्ठा मतदान होणार आणि मुस्लिम मते विभागली जाणार. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार अशी अटकळ भाजप नेत्यांनी बांधली होती. मात्र मुस्लिम मतांच्या विभागणीचा काहीही परिणाम श्री. हत्तुरे यांच्या मताधिक्‍क्‍यावर झाला नाही. पीरअहमद शेख वगळता इतर मुस्लिम उमेदवारांमध्ये विभागणी झालेल्या मतांची संख्या 1444 आहे, तर श्री. हत्तुरे यांनी 1604 मतांनी विजय मिळवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com