भाजपला पाठिंबा देण्यास सेना अनुकूल 

भाजपला पाठिंबा देण्यास सेना अनुकूल 

कोल्हापूर - जिल्ह्यातील विविध पक्षांतील राजकारण आणि नेत्यांमधील हेवेदावे पाहता झेडपीसाठी भाजपला पाठिंबा देण्यावरून सेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. तथापि बेरजेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून सेनेच्या बहुतेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप नैसर्गिक मित्र असल्याचे सांगत अनुकूलता दर्शवली. याउलट विरोध करणाऱ्या गटाने मात्र भाजपपासून चार हात दूर राहण्याची भूमिका घेतली. यामुळे रविवारी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामधाम येथे ही बैठक झाली. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून सेनेला सन्मानपूर्वक संधी दिल्यास भाजपबरोबर जाण्यास हरकत नाही, असे श्री. दुधवडकर यांनी या वेळी स्पष्ट केले. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सत्ता कोणाची स्थापन होणार, अध्यक्ष कोण होणार, यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आघाडीला अधिक संधी आहे; पण पूर्ण बहुमतासाठी शिवसेनेच्या टेकूची गरज आहे. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर कमालीचे शत्रुत्व निर्माण झाले होते. भाजपला पाण्यात पाहण्याची एकही संधी शिवसेनेचे नेते सोडत नव्हते; परंतु मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेते, यावर सत्ता कुणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होणार आहे. 

शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी जिल्ह्यातील सेनेचे आमदार, जिल्हा प्रमुख आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल घेतली. बंद खोलीत त्यांनी प्रत्येकाचे मत आजमावून घेतले. कोणाबरोबर जाण्याने पुढील राजकारणावर नेमके काय परिणाम होतील, यासंबंधी चर्चा केली. चर्चेवेळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो पाळणे आवश्‍यक असल्याचेही सांगण्यात आले. सेनेच्या बहुतांशी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपबरोबरच सत्तेत सहभागी होणे योग्य असल्याचे मत व्यक्त केल्याचे समजते. 

सर्वांची भूमिका वैयक्तिकरीत्या ऐकून घेतल्यानंतर श्री. दुधवडकर यांनी झालेल्या चर्चेचा अहवाल कार्याध्यक्ष ठाकरे यांना दिला जाईल, त्यांच्याशी चर्चा करून 15 तारखेला नेमकी काय भूमिका घ्यायची, यासंबंधीचा निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट केले. 

बैठकीला सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सत्यजित पाटील, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, संजय घाटगे आदी उपस्थित होते. 

स्थानिक राजकारणाला महत्त्व 
बैठकीनंतर श्री. दुधवडकर यांनी जाता जाता स्थानिक राजकारणाला महत्त्व असेल, असे सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. कोणाबरोबर गेल्याने नेमके काय परिणाम होतील, अधिक सोयीचे कोणते हेही पाहिले जाईल, असेही स्पष्ट केले. 

10 जागा मिळवून उपयोग काय? 
झेडपीसाठी भाजपला पाठिंबा दिला नाही तर राष्ट्रवादीला हाताशी धरून भाजप सत्ता स्थापन करेल. यामुळे जिल्ह्यात 10 जागा मिळवूनही सत्तेबाहेरच राहावे लागेल. तसेच राज्यातील सत्तेत भाजप मोठा भाऊ असल्याने झेडपीच्या पातळीवर निधी मिळवताना अडचणी येतील, अशी भीती आमदारांनी व्यक्त केली. यामुळे नैसर्गिक मित्र असल्याने भाजपलाच पाठिंबा द्यावा, असा सूर बैठकीत व्यक्त झाल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com