भाजपला प्रत्येक राज्यात वाढता विरोध  - पवार

sharad pawar
sharad pawar

सातारा - सत्ताधारी भाजपला विरोध करणारे पक्ष प्रत्येक राज्यात आहेत. त्या पक्षांचे त्यांच्या राज्यात स्थान आहे. ही अनुकूल परिस्थिती काँग्रेसने मान्य केली पाहिजे. त्यामुळे किती जागा मिळवू, हे आज बोलणे योग्य नाही; पण देशात बदलाचे वातावरण आहे, असे राजकीय भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज येथे व्यक्‍त केले. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवार यांनी आज  त्यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘‘निवडणुकीतील ट्रेंड सध्या बदलत आहे. तो आम्हाला अनुकूल आहे. पण, लगेच किती जागा मिळवू, या निष्कर्षापर्यंत जाण्याचे माझे निरीक्षण नाही. बाजारात तुरी....कोण कोणाला मारी..अशी अवस्था आहे. सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे, सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, अशी राहुल गांधी यांची भूमिका आहे. ते सध्या राष्ट्रीय प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहत आहेत. पंतप्रधान हे मर्यादेच्या बाहेर कधी बोलत नाहीत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग आदी अनेक पंतप्रधानांची भाषणे ऐकली; पण त्यांनी कधी मर्यादा सोडल्या नाहीत, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. 

धनगर समाजाला आदिवासी जातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी बारामतीच्या सभेत आश्‍वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मंडळाच्या चर्चेत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे सांगितले होते. पण, त्यात अजून काही हालचाली नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधानांनी अनेक घोषणा केल्या. चार वर्षे झाली तरीही त्या पाळल्या गेल्या नाहीत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत त्यांची इच्छा दिसत नाही, अशी टीकाही पवार यांनी केली. छगन भुजबळ यांना जामीन मिळाला याचा आनंद आहे. मूळ खटल्यामधून ते बाहेर येतील त्यावेळी आम्हाला हर्षवायू होईल, असे दिलखुलास उत्तर त्यांनी एका प्रश्‍नावर दिले.

‘रयत’ उभारणार तीन संशोधन केंद्रे
सिंगापूर येथील टाटा टेक्‍नॉलॉजी संस्थेशी रयत शिक्षण संस्थेने करार केला. त्या माध्यमातून खारघर, हडपसर (पुणे) आणि सातारा येथे विद्यार्थी, उद्योजक आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करणारी तीन केंद्रे उभारली जातील. संस्थेच्या शताब्दी वर्षातील हा महत्त्वाकांक्षी शताब्दी प्रकल्प आहे, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com