दप्तराचे ओझे कमी करण्यास जिल्हा परिषदेचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेने यंदा सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांमध्ये फायबरची कपाटे घेण्यासाठी पाच लाखांची तरतूद केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.

सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेने यंदा सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांमध्ये फायबरची कपाटे घेण्यासाठी पाच लाखांची तरतूद केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा विषय हा राज्यपातळीवरील आहे. याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या आहेत. काहीही करा पण विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या सूचना न्यायालयाने राज्याच्या शिक्षण विभागाला दिल्या आहेत. मात्र, त्यामध्ये फारशी प्रगती झालेली नाही. विद्यार्थ्यांना अद्यापही दप्तराचे ओझे सहन करावे लागत आहे. या अडचणीवर कशी मात करावी, याबाबत मतमतांतरे आहेत. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी शिक्षण विभागात वेगवेगळे बदल केले आहेत. शिक्षण विभागात त्यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 450 शाळांना "आयएसओ' मानांकन मिळाले आहे. "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' या उपक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. गुणवत्तेच्या बाबतीतही सोलापूर आघाडीवर असून, विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे होऊ नये, यासाठीही जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात फायबरची कपाटे खरेदीसाठी तरतूदही केल्याने शाळेमध्ये या कपाटांमध्ये विद्यार्थ्यांना आपली दप्तरे ठेवता येणार आहेत. शिक्षकांनी जेवढा अभ्यास सांगितला आहे, तेवढीच पुस्तके विद्यार्थी घरी घेऊन जाणार आहेत. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांचे दप्तर, पाण्याची बाटली, डबा या सगळ्या ओझ्यातून सुटका करण्यासाठी शाळेतच कपाट खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. शाळेमध्ये कपाटे आल्यानंतर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीही हे चांगले आहे.
- अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

Web Title: books weight decrease initiative by zp