‘ब्रेक टेस्ट’साठीची कऱ्हाडवारी थांबणार - शिवेंद्रसिंहराजे

नागपूर - मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले.
नागपूर - मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले.

सातारा - येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना पासिंगसाठी कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे मारावे लागतात. वाहनधारकांचा हा त्रास संपुष्टात येण्यासाठी तातडीने सातारा येथील उपप्रादेशिक कार्यालयासाठी नवीन ट्रॅक उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. श्री. रावते यांनी तातडीने याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिल्यामुळे सातारकरांची ‘ब्रेक टेस्ट’साठीची वारी आता लवकरच थांबणार आहे. 

यासंदर्भात आमदार भोसले यांनी नागपूर येथील अधिवेशनादरम्यान श्री. रावते यांची भेट घेतली. निवेदन देवून या समस्येसंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चाही केली. वाहनांचे पासिंग करताना त्याची ब्रेक टेस्ट घ्यावी लागते.

यापूर्वी ही टेस्ट वर्ये येथे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर घेतली जात असे. 
दरम्यान, काही दिवसांपासून या ट्रॅकवर ब्रेक टेस्ट घेण्यास बंदी घातली गेली. याला पर्याय म्हणून कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वाहने पासिंगसाठी पाठवण्याचा निर्णय परिवहन कार्यालयाने घेतला. त्यामुळे सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पासिंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांना आता कऱ्हाडला हेलपाटे मारावे लागत आहेत. केवळ हेलपाटे मारून भागत नाही तर, वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

तसेच कऱ्हाडमधील वाहनांचे पासिंगही त्याठिकाणी होत असल्याने साताऱ्यातील वाहनधारकांना ताटकळत बसावे लागते. वाहनधारकांची ही 
गैरसोय टाळण्यासाठी साताऱ्यात नवीन ट्रॅक उपलब्ध करून देणे अत्यावश्‍यक आहे. याबाबत आपण तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी श्री. रावते यांच्याकडे केली. 

याबाबत आपण यापूर्वी परिवहन विभागाच्या सचिवांशीही चर्चा केली असून, आपण स्वत: लक्ष घालून सातारा येथील वाहनधारकांची ही जटील समस्या तातडीने सोडवावी, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी श्री. रावते यांना सांगितले. श्री. रावते यांनी आपण स्वत: लक्ष घालून सातारा कार्यालयासाठी नवीन बेक्र टेस्ट ट्रॅक लवकरात लवकर तयार करण्याचे आदेश संबंधितांना देतो असे सांगून याबाबत लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, असे आश्‍वासन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com