लाच मागण्यासाठीची भाषाही येणार अंगलट

Bribe
Bribe

कोल्हापूर - एखादे शासकीय काम करून देण्यासाठी लाच हा तर गुन्हा आहेच; पण प्रत्यक्षात लाच न घेता फक्‍त लाच घेण्याची भाषा जरी केली तरी आता अंगलट येऊ शकणार आहे. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने काम करून देण्यासाठी लाच पाहिजे, असा अर्थ निघू शकेल, असे संभाषण केले व ते टेप केलेले संभाषण फिर्यादीने तक्रारीत नोंदवले तर ते संभाषणही कारवाईस कारणीभूत ठरणार आहे. करवीर तालुक्‍यात एका तलाठ्यावर झालेली कारवाई अशा संभाषणातूनच झाली आहे. त्यामुळे काम करून देण्यासाठी पैशाची भाषा किंवा अन्य अपेक्षा व्यक्‍त करणाऱ्यांना पोलिस कोठडीत घालवणे आणखी सोपे झाले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे एखादा शासकीय कर्मचारी लाच मागतो अशी तक्रार केली की ‘लाचलुचपत’चे अधिकारी तक्रारीची छाननी करतात. त्या प्रक्रियेनुसार खात्री करून घेण्यासाठी तक्रारदाराला त्या कर्मचाऱ्यांशी फोनवर बोलायला लावतात. जेणेकरून तो कर्मचारी काम करून देण्यासाठी लाच किंवा अन्य अपेक्षा त्या संभाषणातून व्यक्‍त करतो. हे संभाषण टेप करून घेतले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष लाच देण्यासाठी तक्रारदाराला पाठवले जाते. यावेळी आजूबाजूला ‘लाचलुचपत’ खाते आधुनिक तंत्राचा वापर करून सापळा लावते. काहीवेळा लाच घेणारा सावध होतो व तो लाच स्वीकारत नाही पण त्याने लाच स्वीकारली नाही म्हणून तो कारवाईतून सुटू शकत नाही. त्याने लाच मागण्यासाठी जे संभाषण केले त्या संभाषणाच्या आधारेही त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. करवीर तालुक्‍यातील तलाठ्यावर याच पद्धतीने चार दिवसांपूर्वी कारवाई केली गेली आहे. 

गेल्या काही दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची करवाई धडाक्‍यात ऑसुरू आहे. त्यामुळे लाच घेण्याचे पूर्ण थांबले असे अजिबात नाही, पण लाच घेण्याऱ्या प्रवृत्तीचे कर्मचारी, अधिकारी, लोकसेवक अधिक सावध झाले आहेत. ते सवयीप्रमाणे लाच मागतात पण नंतर सावध होतात. प्रत्यक्षात लाच स्वीकारण्याच्या क्षणी ते लाच नाकारतात, दुसऱ्याला स्विकारायला लावतात किंवा अमुक एका ठिकाणी पैशाचे पाकीट ठेवा असे सांगतात. लाच स्वीकारताना आजूबाजूला कोणी नाही याची खबरदारी बाळगतात. त्यामुळे ते कारवाईतून सुटतात. पण आता लाचलुचपत प्रधिबंधक विभाग अधिक सतर्क झाला आहे. लाच स्वीकारायची राहू दे पण मागणारे संभाषण झाले असले तरी कारवाई होणार हे स्पष्ट आहे.

एरवी काम करून देण्यासाठी लाच मागितली किंवा अपेक्षा व्यक्‍त केली तर कारवाई सुरू करण्यापूर्वी त्याची खात्री करून घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जी आवश्‍यक आहे ती यंत्रणा वापरते. लाच घेणे पुढचा भाग राहिला, पण लाच मागितली तरी कारवाई होऊ शकते. लोकांनी आता निर्भयपणे पुढे यावे व अशा लाचखोर प्रवृत्तीचा लोकांना पकडून द्यावे.
- गिरीश गोडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 

लोकप्रतिनिधीही संज्ञेत -
लाच स्वीकारताना फक्‍त शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना पकडले जात असे नाही. लोकसेवक म्हणून जे लोकप्रतिनिधी शासकीय भत्ते घेतात त्यांनीही एखाद्या कामासाठी पैशाची मागणी केली तरी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार, खासदार, मंत्र्यापर्यंत सर्वजण लोकसेवक या संज्ञेत येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com