गॅस दरवाढीमुळे मोडले कंबरडे

- युवराज पाटील
शुक्रवार, 3 मार्च 2017

कोल्हापूर - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅसच्या दरात महिन्यात १६१ रुपयांची वाढ झाली आहे. व्यापारी वापराचा गॅसही १४४५ रुपयांवर पोचला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक व हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. साहजिकच यामुळे आता महिन्याचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे दिसते. पूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’ अशी एक म्हण प्रचलित होती. नंतर चुलीची जागा गॅसने घेतली. मात्र गॅस सिलिंडरचे वाढते दर पाहता चूलच बरी म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. 

कोल्हापूर - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅसच्या दरात महिन्यात १६१ रुपयांची वाढ झाली आहे. व्यापारी वापराचा गॅसही १४४५ रुपयांवर पोचला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक व हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. साहजिकच यामुळे आता महिन्याचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे दिसते. पूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’ अशी एक म्हण प्रचलित होती. नंतर चुलीची जागा गॅसने घेतली. मात्र गॅस सिलिंडरचे वाढते दर पाहता चूलच बरी म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. 

गॅस आणि पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय उलाढालीवर अवलंबून असतात, याची फार कमी लोकांना माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे भाव वाढले की, त्याचा परिणाम गॅसच्या दरवाढीवर होतो. दर महिन्याच्या १ तारखेला गॅसचे दर बदलतात. शहरात गॅसधारकांची संख्या एक लाख दहा हजारांच्या घरात आहे. घरोघरी गॅस सिलिंडर आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. गेल्या महिन्यात ६९७ रुपये गॅससाठी मोजावे लागत होते. काल (ता. १) पासून यात अचानक ९० रुपयांची वाढ झाली. गेल्या महिन्यातील ७१ आणि कालचे ९०, अशी १६१ रुपयांची वाढ झाली. गॅसचा वापर कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून आहे. किमान एक टाकी महिनाभर जायला हवी, अशी प्रत्येकाची धारणा असते. स्वयंपाकासाठी तरी गॅसला पर्याय नाही. पूर्वी चुलीसाठी जळण आणण्यासाठी गृहिणींची धावपळ व्हायची. काळाच्या ओघात गॅस आला, त्यामुळे जळण आणणे बंद झाले. गॅसचे वाढते दर पाहता पूर्वीची चूलच बरी, असे म्हणण्याची वेळ आता अनेक कुटुंबांवर आली आहे.
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांनी गॅसवरील अनुदान सोडावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले होते. त्यास कमी प्रतिसाद मिळाला.  

टाकी दारात आली की द्या ७८७ रुपये 
एका सिलिंडरमागे २८२ रुपये ८४ पैसे इतके अनुदान बॅंक खात्यावर जमा होते. त्यामुळे  अनुदानित एक सिलिंडर ५०५ रुपयांना पडतो. अनुदान जमा होईल तेव्हा होईल; मात्र टाकी दारात आली की तातडीने ७८७ रुपये द्यायचे कोठून? असा प्रश्‍न निर्माण होतो. घरगुती गॅसची ही अवस्था, तर व्यापारी वापरासाठीच्या गॅसची महागाईही मोठी आहे. १२९० रुपयांचा गॅस १४४५ रुपयांवर पोचला आहे. हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणारी ही दरवाढ आहे. एकदा गॅस वाढला की खाद्यपदार्थ महाग होत जातात. त्याची झळ हॉटेल मालक व पर्यायाने लोकांना बसते.

सिलिंडरचा दर ७८७ रुपये

१६१ रुपयांची महिन्‍यात वाढ

व्यापारी वापराचा गॅसही महागला

बॅंक व्यवहारांवर शुल्कविरोधात संताप

कोल्हापूर - खासगी बॅंकांतील व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याने शहरवासीयांतून संताप व्यक्‍त होत आहे. महिन्यात चारहून अधिक व्यवहारांवर दीडशे रुपये शुल्क आकारून ग्राहकांवर भुर्दंड कशासाठी, अशी विचारणा होऊ लागली आहे. ‘कॅशलेस’ व्यवहाराकडे जाताना ‘मनीलेस’ 
नको, असाही सूर ग्राहकांकडून उमटू लागला आहे. 

कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठीचा हा मार्ग योग्य नाही. आपल्या हक्कांच्या पैशावर शुल्क आकारून बॅंकांना मालामाल करण्याचा हा प्रकार आहे. बॅंकांनी असे पाऊल उचलण्यापूर्वी ग्राहकांच्या हिताचा विचार करायला हवा होता. या निर्णयाने बॅंकांकडे पाहण्याचा ग्राहकांचा दृष्टिकोन बदलेल. 
- प्रमिला मारुती माने (पद्मा हाऊसिंग सोसायटी)

कॅशलेस व्यवहार समाजाभिमुख करायचे असतील, तर ग्राहकांना सवलतीचा मार्ग मोकळा केला पाहिजे. चार व्यवहारानंतर पाचव्या व्यवहारावर शुल्क आकारून ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार होऊ नये. सार्वजनिक बॅंकांनी शुल्क आकारण्याचे पाऊल उचलू नये.  
- शुभांगी विलास सोयम (इंगळेनगर)

कॅशलेस व्यवहाराची टुम काढायची आणि ग्राहकांच्या खिशाला कात्री लावायची, हे धोरण चुकीचे आहे. खासगी बॅंकांनी पाचव्या व्यवहारावर पाच ते दीडशे रुपये शुल्काची आकारणी करू नये. कॅशलेस व्यवहाराचा हा मार्ग योग्य नाही. आपलेच पैसे आपण काढू नये, यासाठीचा हा प्रयत्न आहे. 
- सुजाता विकास पाटील (टिंबर मार्केट)

बिझनेसचा हा बॅंकांचा जुनाच फंडा आहे. एखादी सेवा सुरवातीला मोफत द्यायची आणि नंतर एका मर्यादेनंतर शुल्क आकारायचे. बॅंक व्यवहारातील ही शुल्क वाढ अन्यायकारक आहे. भविष्यात ही वाढ आणखी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
- स्नेहल सुरेंद्र उपरे (गोकुळ शिरगाव)

कॅशेलस प्रणाली नागरिकांच्या हिताची आहे. ती स्वीकारण्याची मानसिकता प्रत्येकाची आहे. पण या प्रणालींतर्गत कर सवलत मिळणे आवश्‍यक आहे. बॅंक व्यवहार कॅशलेस करताना बॅंकांनी ग्राहकांचे हित लक्षात घ्यावे. 
- अश्‍विनी नितीन पाटील (राजारामपुरी आठवी गल्ली)

 एटीएमवर कितीही वेळा पैसे काढता येत होते. मात्र त्यालाही मर्यादेचे कुंपण घालण्यात आले आहे. आता खासगी बॅंकांनी तर पाच रुपयांपासून दीडशे रुपये इतके शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ग्राहकांनाच मानसिक त्रास होणार आहे.  
- अनिरुद्ध संकपाळ (जवाहरनगर)