'बीएस 3' दुचाकींच्या खरेदीसाठी झुंबड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

पाच ते 15 हजारांची सवलत देऊन एजन्सींनी केला स्टॉक मोकळा

पाच ते 15 हजारांची सवलत देऊन एजन्सींनी केला स्टॉक मोकळा
सातारा - बीएस 3 मानकांच्या वाहन विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने एक एप्रिलपासून बंदी आणल्याने जिल्ह्यातील विविध ऑटोमोबाईल एजन्सींनी आपल्या स्टॉकमध्ये उपलब्ध असलेल्या या श्रेणींच्या वाहनांची तब्बल पाच ते 15 हजार रुपये सवलत देऊन आज विक्री केली. त्यामुळे सवलतीत दुचाकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. ज्यांनी पाडव्याला मूळ किमतीवर गाडी खरेदी केली होती, त्यांची मात्र, आज निराशा झाली.

प्रदूषण पसरविणाऱ्या वाहनांना रस्त्यावर धावण्याची परवानगी देता येत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने जिल्ह्यातील विविध ऑटोमोबाईल डीलर्सनी त्यांच्याकडे स्टॉक असलेल्या बीएस 3 श्रेणीच्या दुचाकी गाड्या किंमत कमी करून विक्रीस सुरवात केली. ही माहिती शहरासह ग्रामीण भागात पोचल्यानंतर पाडव्याला गाडी खरेदी करता न आलेल्यांनी या सवलतीत मिळणाऱ्या गाड्यांच्या खरेदीसाठी विविध ऑटोमोबाईल शोरूममध्ये गर्दी केली होती. यामध्ये सुझुकी, हिरो, होंडा या कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश होता. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल तेथून पैसे उपलब्ध करून अनेकांनी हा अनोखा मुहूर्त साधला. सुझुकी ऍक्‍सेस, होंडा शाईन, ऍक्‍टिव्हा, युनिकॉर्न, हॉर्नेट, हिरो स्प्लेंडर, स्प्लेंडर प्लस, सीबीएक्‍स व्ही आदी जास्त मागणी असलेल्या दुचाकींच्या मॉडेलची ग्राहकांनी अक्षरशः लयलूट केली. काहींनी पुण्यातून आणखी सवलतीत गाड्या खरेदी केल्या. पाडव्याच्या मुहूर्तावर ज्यांनी दुचाकी खरेदी केली होती. त्यांची मात्र, आजच्या या सवलत योजनेने निराशा झाली. दोन दिवसांपूर्वी दोन ते पाच हजार रुपये जादा देऊन दुचाकी खरेदी केलेल्यांच्या मनाला मात्र चटका लागल्याचे दिसून आले.

एजन्सीधारकांच्या "नाकी नऊ'
दोन दिवसांपूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी ऑटोमोबाईल शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होती. व्यावसायिकांना थोडी उसंत मिळतेय, तोच बीएस 3 श्रेणीचा निर्णय आला आणि सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तोंड देताना एजन्सीधारकांच्या नाकीनऊ आले.

Web Title: bs-3 two wheeler purchasing rush