उमेदवारी माघारीसाठीच्या राजकारणाला गती 

उमेदवारी माघारीसाठीच्या राजकारणाला गती 

कऱ्हाड - पालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीची अंतिम मुदत अद्यापही सहा दिवस आहे. त्या कालवधीत उमेदवारी मागे घेण्यासाठीचे राजकारण गतीत आले आहे. अनेक ठिकाणी दबावतंत्राने, अनेक ठिकाणी चर्चेतून अर्ज मागे घेण्याच्या वाटाघाटी सुरू आहेत. काही ठिकाणी पैसे देवून लोक "मॅनेज' केले जात आहेत. त्या वाटाघाटी पदरात कशा पाडून घेता येतील, याचेच राजकारण आघाड्यांसह नेत्यांच्या पातळीवर सुरू आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जनशक्ती, आमदार बाळासाहेब पाटील यांची लोकशाही व भाजप पुरस्कृत माजी आमदार उंडाळकर यांच्या आघाड्यांचे नेते त्यावर लक्ष ठेवून आहेत. तर आघाड्यांसह नेत्यांच्या हालचालीवर पोलिसांसह शासन "वॉच' ठेवून आहे. अर्ज माघारीसाठी मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी वापरला जाणारा पैसा कसा पकडता येईल, यासाठी पोलिस व आचारसंहिता कक्षाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काल पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी "कोम्बिंग ऑपरेशन' राबवले आहे. 

पालिकेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी स्थापन झाली आहे. सत्ताधारी आघाडीतून फुटून आलेले ज्येष्ठ नगरसेवक व माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव व जनशक्तीचा गट एकत्रित निवडणुकीला सामोरा जात आहे. त्याउलट स्थिती आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाची आहे. त्यांनी एकटा चलो रे करत लोकशाहीच्या माध्यमातून रणशिंग फुंकले आहे. भाजपने त्यांचे काही उमेदवार रिंगणात चिन्हावर उतरवले आहेत. अन्य ठिकाणी माजी आमदार उंडाळकर यांच्या आघाडीशी एकमत केले आहे. मात्र, अर्ज भरून झाल्यानंतरच्या स्थितीतही राजकारण अद्याप गती घेताना दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक आघाडी आपापल्या उमेदवाराच्या शोधात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जनशक्तीकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तेथे सावळागोंधळ दिसतो आहे. त्या आघाडीत उमेदवारी मागे घेण्याचे राजकारण अधिक गतीत आले आहे. उमेदवाराने अर्ज माघारी घेतला तरी तो विरोधकांच्या हाती लागता कामा नये, याची व्यूव्हरचना जनशक्ती आघाडीच्या नेत्यांकडून आखली जात आहे. त्यासाठी आघाडीच्या नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. त्या सगळ्या स्थितीवर लोकशाही व भाजपप्रणीत आघाडी लक्ष ठेवून आहे. त्यातून निसटणारा गळाला कसा लागेल, याचे राजकारण गतीत आले आहे. त्यासाठी नाराज गटाशी ते संपर्क साधत आहेत. लोकशाहीला सात वॉर्डात उमेदवार नाहीत. ती संधी साधून ते नाराजांना आपल्या बाजूला खेचून अंतिम क्षणाला त्यांना पुरस्कृत घोषित करण्याची खेळी आखण्याच्या प्रयत्नात आहेत. 

उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होणार आहे. त्याशिवाय रिंगणात राहणारा उमेदवार पुरस्कृत करण्यासाठीही मोठ्या पैशाच्या उलाढाली होणार आहेत. माघार न घेणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही किमतीवर आपल्याकडे वळवण्याची खेळी केली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यात सारा पैशाचाच खेळ होणार आहे, याची कल्पना शासकीय पातळीवरही आली आहे. त्यामुळे त्या सगळ्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. 

"कोम्बिंग ऑपरेशन' मोहीम तीव्र करणार 

आचारसंहिता कक्षाच्या पथकाला स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनाही त्याबाबत स्पष्ट आदेश आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येथे पोलिसांनी वाहनांची तपासणीसह शहरातील विविध भागांत "कोम्बिंग ऑपरेशन' राबवले आहे. ती मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. शहरात बाहेरून पैसा येणार नाही, मात्र शहरातील शहरातच जास्त उलाढाल होणार आहे. त्यामुळे शहरातच जास्त गस्ती घातल्या जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com