बंडखोरी टाळण्यासाठी रोखल्या उमेदवार याद्या

congress-ncp
congress-ncp

सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस उरले असताना उमेदवारांची निश्‍चिती करण्यासाठी राष्टवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेसह इतर पक्ष, संघटनांतील नेते, पदाधिकाऱ्यांनी आज दिवसभर मॅरेथॉन बैठका घेतल्या. उमेदवारांची निश्‍चिती बऱ्यापैकी झाली असली, तरी बंडखोरी, पक्षीय स्थलांतर रोखण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून इच्छुकांना "गॅस'वर ठेवले जात आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीमुळे जिल्हाभर राजकीय रणधुमाळी आहे. सर्वच पक्षांनी स्वबळाची ताकद आजमविण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषदेत चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उमेदवारी निश्‍चित केल्यास बंडखोरी अथवा पक्षीय स्थलांतराचा परिणाम उद्‌भवणार असल्याचे सर्वच पक्षांनी दक्षता घेतली आहे. अर्थातच अर्ज दाखल करण्यास आता केवळ तीन दिवस उरले असल्याने ठराविक मतदार संघातील नावे जाहीर करण्याचीही पक्षीय पातळीवर चर्चा सुरू आहे.

जिल्हा बॅंकेच्या येथील मुख्य कार्यालयात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, शेखर गोरे, सत्यजित पाटणकर आदींची दिवसभर बैठकही झाली. त्यामध्ये अनेक गटांतील नावेही निश्‍चित झाली असली, तरी तसे घोषित केले गेले नाही. शनिवारी दुपारपर्यंत पहिली यादी जाहीर करणार असल्याचेही सुनील माने यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, नारायण राणे, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील आदींची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मुंबई येथे बैठक झाली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत नावे निश्‍चित केली जात असून, शनिवारी दुपारपर्यंत पहिली यादी जाहीर करणार असल्याचे आनंदराव पाटील यांनी सांगितले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे उद्या जिल्ह्यात येणार असून, त्यांच्याशी चर्चा करून दुसरी यादी निश्‍तिच केली जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले. शिवसेनेतील इच्छुकांची यादी निश्‍चित करण्यासाठी पक्षीय पातळीवर काम सुरू असून, लवकरच नावे निश्‍चित केली जातील, असे जिल्हा प्रमुख हर्षल कदम यांनी सांगितले.

रामराजेंविरोधात विरोधक एक?

फलटण तालुक्‍यातील रामराजेंच्या प्राबल्याला लढत देण्यासाठी कॉंग्रेसचे रणजित निंबाळकर, भाजपचे सुशांत निंबाळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भगत, राष्ट्रीय समाज पक्षाचे खंडेराव सरक आदींनी एकत्रित लढण्यासाठी आज फलटणमध्ये बैठक घेतली, तसेच स्वाभिमानी संघटनेने साताऱ्यात उदयनराजे, कोरेगावमध्ये कॉंग्रेस, खटाव, कऱ्हाडला स्बळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत त्यासाठी प्रचारात उतरणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com